फरार आर्थिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी नवे विधेयक !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
फरार आर्थिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी नवे विधेयक !
* विजय माल्या, नीरव मोदी सारख्यांना बसणार वचक
* खटल्याला तोंड देणे टाळण्यासाठी देशाबाहेर पलायन
* फरार आर्थिक गुन्हेगारांची मालमत्ता जप्तीचे अधिकार
* उन्हाळ्यात वीजेची टंचाई जाणवणार!
 
 
आर्थिक गुन्हे व घोटाळे करुन देशाबाहेर फरार झालेल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकार लवकरच नवे सुधारित विधेयक आणणार आहे. या विधेयकातील तरतुदींमुळे या फरार आर्थिक गुन्हेगारांनी अपहार केलेल्या पैशाची वसुली करण्याचे दृष्टिने विशेष न्यायालयांची स्थापनाही करण्यात येणार आहे. तसेच पंजाब नॅशनल बँकेतील एलओयु घोटाळ्याद्वारे प्रचंड रकमा लाटणारा घोटाळेबाज नीरव मोदी व हजारो कोटी रुपयांची कर्जे बुडवून इंग्लंडमध्ये पसार झालेला विजय माल्या यांच्यासारख्यांना वचकही बसणार आहे.
 
 
गेल्या सप्टेंबरात केंद्रीय कायदा मंत्रालयाने अर्थमंत्रालयाने तयार केलेल्या फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१७ च्या कच्च्या मसुद्याला मंजुरी दिली होती. आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी ते येत्या ६ मार्च रोजी सुरु होणार्‍या संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या उत्तरार्धात सादर केले जाणार आहे. त्यात आर्थिक गुन्हेगारीची सुस्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार म्हणजे अशी व्यक्ती की जिच्याविरुद्ध आर्थिक गुन्ह्यासंदर्भात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले असून ती खटल्याला तोंड देण्याचे टाळण्यासाठी भारताबाहेर निघून गेलेली असून भारतात परतण्यास नकार देत आहे.
 
या विधेयकाच्या मसुद्यात जाणून-बुजून कर्ज बुडविणे, फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये खाडाखोड करणे, बनावट किंवा चुकीच्या इलेक्ट्रॉनिक नोंदी असलेली कागदपत्रे बाळगणे, कर बुडविणे आणि ठेवी परत न करणे अशा अनेक गुन्ह्यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास फरार आर्थिक गुन्हेगारांची कुठलीही मालमत्ता विनाअडथळा जप्त करण्याचे अधिकार चौकशी यंत्रणांना मिळणार आहेत. अशी व्यक्ती जर एखाद्या कंपनीची प्रवर्तक किंवा व्यवस्थापकीय संचालक किंवा मोठ्या प्रमाणावर कंपनीचे शेअर बाळगणारी असेल तर तिला कंपनीच्या वतीने कुठलाही मालकी हक्काचा किंवा भरपाईचा दावा करता येणार नाही. त्यामुळे या फरार गुन्हेगारांचा आपली अडकलेली मालमत्ता सोडवून ती ताब्यात घेण्याचा मार्ग खुंटणार आहे.
 
 
पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर हा प्रस्तावित कायदा करण्यात येत आहे. या प्रकरणी हिरे व्यापारी नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चौकशी हे प्रमुख आरोपी आहेत. सुमारे ९००० कोटी रुपयांची बँक कर्जे बुडवून विदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय माल्यासारख्या आर्थिक गुन्हेगारांच्या यादीत आता मोदी व चोकसीचा समावेश झालेला आहे.
 
 
भारताने २०११ मध्ये मंजुरी दिलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या भ्रष्टाचार विरोधी ठरावाशी सुसंगत अशा या विधेयकातील तरतुदी आहेत. त्यानुसार भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणी संशयित आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार याद्वारे देण्यात आले आहेत. देशातील न्यायालयांमध्ये अशा प्रकारची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर पडून राहू नयेत म्हणून १०० कोटी रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त रकमेचा गैरव्यवहार केले असल्याच्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी मनी लॉंड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष न्यायालये स्थापन करण्याची तरतुद या विधेयकात आहे.
 
 
मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुन्हे करुन भारतातील न्यायालयांमधील कायदेशीर कारवाईला तोंड देण्याचे टाळण्यासाठी देशाबाहेर पलायन करणार्‍यांमुळे भारतातील कायद्यांचे उल्लंघन होत असते. अशा प्रकारांना आळा घालण्याचे दृष्टिने एक प्रभावी व घटनात्मक दृष्टया प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध करुन देणे आवश्यक झाले आहे. या हेतूपुर्तीसाठी हे विधेयक असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. तसेच देशात आर्थिक गुन्हे करुन दुसर्‍या देशातील कायद्यांचा वापर करुन आपले प्रत्यार्पण टाळण्याच्या या आरोपींचा प्रयत्न विफल करण्यासाठी कायद्यातील त्रुटी व पळवाटाही या विधेयकाद्वारे बुजविण्यात येणार आहे.
 
 
कोळशाच्या टंचाईमुळे या वर्षीच्या उन्हाळ्यात वीजेची मोठी कमतरता भासणार आहे. केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार ४६ औष्णिक उर्जा केंद्रांमधील कोळशाचा साठा संपत आलेला आहे. सहा केंद्रांमध्ये एक दिवस पुरेल एवढाही कोळसा उरलेला नसून आठ केंद्रात एकच दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे तेथील वीजनिर्मिती लगेच बंद पडणार आहे. तसेच ऐन उन्हाळ्यात वीजेचा तुटवडा जाणवणार असल्याने देशातील वीज ग्राहकांना चांगलाच घाम फुटणार आहे!
 
 
शेअर बाजारात पुन्हा घसरण
सतत दोन दिवसांपर्यंत शेअर बाजारातील तेजीनंतर आज मंगळवारी २७ रोजी बाजारात पुन्हा घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) सोमवारच्या बंद ३४हजार ४४६बिंदूंच्या तुलनेत आज सकाळी ३४ हजार ५५९ बिंदूंवर उघडून ३४ हजार ६११ बिंदूंच्या उच्च व ३४ हजार ३२० बिंदूंच्या खालच्या तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक(निफ्टी) कालच्या बंद १० हजार ५८३ बिंदूंच्या तुलनेत आज सकाळी १० हजार ६१५ बिंदूंवर उघडून १० हजार ६३२ बिंदूंच्या उच्च तर १० हजार ५३७ बिंदूंच्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन आला होता. दिवसअखेरीस सेन्सेक्स व निफ्टी हे अनुक्रमे ३४ हजार ३४६ व १० हजार ५५४ बिंदूंवर बंद झाले.
 
@@AUTHORINFO_V1@@