राष्ट्रीय सुरक्षेसाठी एकत्र येण्याची गरज - डॉ. जी. डी. बक्षी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
 
 
राष्ट्रीय सुरक्षेसाठी एकत्र येण्याची गरज -  डॉ. जी. डी. बक्षी 
 
जळगाव, २७ फेब्रुवारी
देशाच्या इतिहासातील घटनांपासून बोध घेऊन राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असली तरी समाजात एकतेची भावना व जागरुकता यांचा अभाव आहे आणि हेच राष्ट्रीय सुरक्षेसमोरील प्रमुख आव्हान असल्याचे प्रतिपादन मेजर जनरल (सेवानिवृत्त) डॉ. जी. डी. बक्षी यांनी केले.
 
 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेपुढील नवीन आव्हाने’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन मेजर जनरल डॉ. जी. डी. बक्षी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात झाले. यावेळी ते बोलत होते. या चर्चासत्राचा समारोप २८ रोजी होत आहे.
 
 
व्यासपीठावर उद्घाटन सत्राचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या संचालिका डॉ. अर्चना देगांवकर, कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक डॉ. तुकाराम दौड, चर्चासत्राचे समन्वयक प्रा. तुषार रायसिंग उपस्थित होते.
डॉ. बक्षी म्हणाले की, १० व्या शतकापासून देशावर बाह्य आक्रमणे होत आहेत. आक्रमकांनी आपली शहरे उद्ध्वस्त केली, मंदिरे लुटली, नालंदासारखी पुस्तकालये जाळली पण इतिहासातील या घटनांपासून भारतीय बोध घ्यायला तयार नाहीत. समाजात अजूनही जात-पात, भेदभाव आहेत. आपण एक होऊ शकत नसू तर बाह्य शत्रूशी कसे लढणार? असा प्रश्‍नही डॉ. बक्षी यांनी उपस्थित केला. आजच्या १० हजार वर्षानंतरही काश्मीर भारतातच राहील. मात्र, यासाठी ‘हम सब भारतीय है’ ही देशक्तीची चेतना प्रत्येकाच्या हृदयात कायम धगधगत राहिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी देशापुढे दहशतवाद, हिंसाचार, जाती-धर्मातील वाद-विवाद यामुळे अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ते दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे, असे मत व्यक्त केले.
 
 
पाोलीस अधीक्षक अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बाह्य सुरक्षेच्या बरोबरीने अंतर्गत सुरक्षा महत्त्वाची असल्याचे सांगितले. धर्मांधता, जातीयता यातून उद्भवणार्‍या संघर्षापासून सुजाण नागरिकांनी लांब राहावे. अति डावी विचारणसरणी, नक्षलवाद देशासाठी घातक ठरत आहे. या शक्तींना देशातून मिळणारी मदत थांबायला हवी. सोशल मीडियाचे अंतर्गत सुरक्षेपुढे आव्हान असल्याचा मुद्दाही कराळे यांनी मांडला. सूत्रसंचालन डॉ. उस्मानी यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@