आचार्य अविनाशी सेवा पुरस्काराचा वितरण सोहळा रविवारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |
 
 
आचार्य अविनाशी सेवा पुरस्काराचा वितरण सोहळा रविवारी
 
जळगाव, २७ फेब्रुवारी
केशवस्मृती सेवासंस्था आणि जळगाव जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.डॉ. अविनाशदादा आचार्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार वितरण सोहळा रविवार ४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वा. बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
 
 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची उपस्थिती राहील. प्रमुख वक्ते औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे (डॉ. हेडगेवार रुग्णालय) सचिव डॉ. अनंत पंढरे राहतील, अशी माहिती जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी मंगळवारी झालेल्या पत्रपरिषदेत दिली.
 
 
समाजाप्रती समर्पित भावनेने केलेल्या सेवेबद्दल संस्था आणि व्यक्तिगत स्तरावर हा पुरस्कार देण्यात येतो. अशा व्यक्तींचे कार्य समाजासमोर यावे आणि यातून इतरांना प्रेरणा मिळावी या हेतूने गेल्या चार वर्षापासून या पुरस्काराचे वितरण केले जाते.
 
 
यावर्षी गेल्या २० वर्षापासून आसाममध्ये विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून मुलांचे शिक्षण, संस्कार, योगा आणि तरूणांमध्ये राष्ट्रभक्ती जागरणाचे कार्य करीत असलेल्या मूळ जळगाव येथील मीरा रघुनाथ कुळकर्णी यांना व्यक्तिगत स्तरावरील पुरस्कार दिला जाणार आहे. ५१ हजार रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असा तो आहे.
 
 
संस्थात्मक पुरस्कारासाठी यवतमाळ येथील पारधी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी काम करणार्‍या दीनदयाळ बहुद्देशीय प्रसारक मंडळ संस्थेची निवड करण्यात आली आहे.हा पुरस्कार १ लाख १ हजार रुपये सोबत मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असा आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार समितीने वर्ष २०१६-१७ साठी या पुरस्कारार्थीची निवड केली. या समितीमध्ये सहकार भारतीचे राष्ट्रीय संरक्षक सतीश मराठे, धुळे येथील विख्यात तत्वज्ञ व सनदी लेखापाल प्रकाश पाठक सदस्य आहेत, अशी माहिती देण्यात आली. पत्रपरिषदेला केशवस्मृती सेवासंस्था समुहाचे प्रमुख भरतदादा अमळकर, केशवस्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील, जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक सतीश मदाने आदी उपस्थित होते.
 
 
पुरस्काराचे पाचवे वर्ष
गेल्या चार वर्षापासून वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील तसेच समर्पित भावनेेने सेवाकार्य करणार्‍या व्यक्ती आणि संस्थेला डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार देण्यात येतो. त्यात प्रथम वर्षाचा व्यक्तिगत पुरस्कार विजय जाधव तर संस्थात्मक पुरस्कार स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी, द्वितीय वर्षः व्यक्तिगत रामेश्‍वर नाईक, संस्थात्मकः उमेद परिवार,पुणे, तृतीय वर्षः व्यक्तिगत भारतबाई देवकर, संस्थात्मकः अहिल्या महिला मंडळ, पेण, चौथे वर्षः नरसिंग झरे, संस्थात्मक शबरी सेवा समिती, कर्जत.जि.रायगड हे या पुरस्काराचे यापूर्वीचे मानकरी आहेत.
 
 
मीरा रघुनाथ कुलकर्णी
व्यक्तिगत स्तरावरील पुरस्कारासाठी मीरा रघुनाथ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. प्रारंभी अरूणाचल प्रदेश आणि सध्या आसामारख्या इतरांना दुर्गम वाटणार्‍या भागात मुलांसाठी, त्यांचे शिक्षण, संस्कार आणि सर्वांगिण विकासासाठी विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून त्या कार्य करीत आहे. त्या मूळच्या अकोला येथील असल्या तरी त्यांचे शिक्षण जळगावच्या एम.जे.कॉलेजमध्ये झाले आहे. १९९६ मध्ये एम.कॉम.ची पदवी घेतांना त्या विद्यापीठात दुसर्‍या आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आयसीडब्ल्यूएआयचा पहिला भाग पूर्ण केला.
 
 
१९९७ मध्ये त्यांचा विवेकानंद केंद्राशी संबंध आला आणि त्यांनी कार्य सुरू केले. प्रारंभ झाला तो अरूणाचल प्रदेशमधून. १९९८ मध्ये आसाममधील गोलाघाट येथे त्यांनी काम सुरू केले. बघता बघता त्या आसामी भाषा आणि संस्कृतीशी एकरूप झाल्या. विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांच्या सहयोगाने त्यांनी तेथे शाळांची संख्या ३ वरून २२ वर नेली आहे. तसेच कार्यकर्त्यांचीही फळी मजबूत केली. शिक्षणापासून वंचित असलेल्या चहामळ्यातील मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी आनंदालय ही संकल्पना रूजवली. त्याद्वारे मुलांना शिक्षणाची गोडी लावली. येथे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण गुरू-शिष्य परंपरेनुसार दिले जाते. कन्याकुमारी येथे तरुणांसाठी सुरू असलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या त्या प्रमुख आहेत.
 
 
दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळ, यवतमाळ
संस्थात्मक पातळीवर यावर्षी यवतमाळ येथील दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाची निवड करण्यात आली आहे. पारधी समाजाच्या सर्वांगिण विकास, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन, शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय आणि कृषीक्षेत्राचा शाश्वत विकास हे प्रमुख उद्देश दृष्टीसमोर ठेवून १९९७ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली.
 
 
संस्थेद्वारे विवेकानंद छात्रावास, बालसंस्कार केंद्र, केशव आर रक्षक योजना, स्वयंरोजगार कार्यक्रम आणि पारधी समाजासाठी विकासात्मक उपक्रम राबविले जातात. कुटुंब आधार योजना, शैक्षणिक व शिष्यवृत्ती प्रकल्प, समुपदेशनासह शेतीविकासासाठीही अनेक उपक्रम राबविले जातात. निळोणा, यवतमाळ येथील दीनदयाल प्रबोधिनीत कृषी संशोधन व प्रशिक्षण केंद्रही आहे. संस्थेने ४०० आत्महत्याग्रस्त परिवारांचे पालकत्त्व स्वीकारले आहे. यवतमाळ, वाशीम आणि बीड जिल्ह्यातील २३४ परिवारांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.
 
 
मुलांच्या शिक्षणाची सोयही संस्था करते. दरवर्षी ५० विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थसाह्य केले जाते. पाथरी, ता.केळापूर येथे जलभूमी विकास प्रकल्प आहे. त्यामुळे येथे पाणी साठवून ते जमिनीत मुरवले गेल्याने परिसरात पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे कधी पाऊस कमी पडला तरी उत्पन्न चांगले येण्याची हमी शेतकर्यांाना मिळाली आहे. शेळीपालन, गांडूळ खतासाठीही शेतकरी आणि ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी संस्था गावोगावी शिबिरे आणि मेळावे आयोजित करून समाजप्रबोधन करते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@