मुख्यमंत्री दिल्लीत, राणेही दिल्लीत, राजकीय चर्चांना उधाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |



मुंबई  : 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकरिता नवी दिल्ली येथे रवाना झाले. याचबरोबरीने, माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणेही नवी दिल्ली येथे रवाना झाले आहेत. राणे यांची राज्य मंत्रीमंडळातील समावेशासाठी सुरू असलेली प्रतीक्षा पाहता निरनिराळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण राणे हे आज संध्याकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या केंद्रीय बैठकीकरिता आज दुपारनंतर दिल्लीला रवाना झाले होते. ही बैठक भाजपच्या नव्या केंद्रीय मुख्यालयात होत आहे. मात्र, याच दरम्यान राणेही दिल्लीत पोहोचले असल्याने दिल्लीतील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नारायण राणे यांच्या व्यक्तिगत कर्मचाऱ्यांपैकीही एका महत्वाच्या व्यक्तीने राणे दिल्लीत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, राणे भाजप श्रेष्ठींची भेट घेणार अथवा नाही, यावर कोणतीही माहिती मिळू शकली नाही. तसेच, स्वतः राणे यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.


काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवा पक्ष स्थापन करून नारायण राणे भाजपप्रणीत एनडीएमध्ये सामील झाले आहेत. मात्र, राज्य मंत्रीमंडळात सामील होण्याची त्यांची इच्छा अद्याप पूर्ण झालेली नाही. याशिवाय, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ६ जागांचीही निवडणूक लवकरच होणार असून यातील भाजपच्या ३ जागा निवडून येणार आहेत. त्यामुळे राज्यसभेत भाजपच्या कोट्यातून राणे यांना खासदार म्हणून पाठवले जाणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राणे यांच्या या दिल्लीभेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह वा अन्य वरिष्ठ नेत्यांशी मंत्रीमंडळातील समावेशाबाबत किंवा राज्यसभेच्या खासदारकीबाबत काही चर्चा होते का व झाल्यास त्यातून काय निष्पन्न होते, याबाबत राज्यातील व दिल्लीतील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.
@@AUTHORINFO_V1@@