नवसमाजवादाचा गांजा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Feb-2018
Total Views |



 स्वभावाने पक्के भांडवलवादी शी जिनपिंग नवसमाजवादाची गरज मांडत आहेत. अत्यंत आग्रहाने आर्थिक कार्यक्रमपुढे रेटणारे शी कितीही प्रयत्न केला तरी काही मूल्यांच्या बाबतीत मागे पडतात. प्रश्न हा आहे की हा चिनी कोलाहल सोबत घेऊन जगाची अर्थव्यवस्था ताब्यात घेण्याचे त्यांचे स्वप्न ते कसे पूर्ण करणार?
 
राष्ट्रे कशी घडतात? तर ती घडतात त्यांना लाभलेल्या राष्ट्रपुरुषांमुळे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही भारताचे नाव घेतले तर आठवतात ते महात्मा गांधी किंवा नेहरू. रशियाचे नाव घेतले तर आठवतात स्टॅलिन. अमेरिकेचे नाव घेतले की अमेरिकन राष्ट्र घडविणारे अनेक राष्ट्रपुरुष डोळ्यासमोर यायला लागतात. आजची माध्यमे विद्यमान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांविषयी काहीशी नकारात्मक असली तरी यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांची नावे त्यांच्या निरनिराळ्या प्रकारच्या योगदानामुळे आठवतच राहतात. अर्थात, या सर्वच राष्ट्रप्रमुखांच्या कार्यपद्धतीविषयी मतमतांतरे आहेतच आणि ती असणे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य देखील आहे. आता मात्र अजून एक नवा राजकारणी जगाच्या इतिहासाच्या नकाशावर स्वत:चे नाव कोरण्याचे प्रयत्न करीत आहे. चीनचे राष्ट्रप्रमुख शी जिनपिंग. चीनच्या राष्ट्रप्रमुखपदी दोन खेपेहून अधिक काळ राहाता येत नसे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने नुकताच ठराव करून ती अट काढून टाकली. आता ही पक्षाची मागणी आहेे आणि ती चीनच्या हिताची आहे, अशी साखरपेरणी चीनच्या माध्यमांत जोरात सुरू आहे. हा सगळाच घटनाक्रमशी जिनपिंग यांचा प्रभाव दर्शविणारा आहे. टप्प्याटप्प्याने जिनपिंगनी चिनी माध्यमे, पक्ष, संघटना ताब्यात घेतल्या आहेत. चिनी माध्यमे आता पूर्णपणे हे सारे चीनच्या हिताचे कसे आहे, हे सांगण्यात गुंग झाली आहेत. शी माओचाच दुसरा अवतार असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. चीनमध्ये लोकशाही नाही. जे काही आहे तो चिनी राजकीय संस्कृतीचाच आविष्कार आहे. कुणा बाहेरच्या व्यक्तीने त्यावर भाष्य करणे चीनला रुचणारे नाही, मात्र जिनपिंग जे काही बोलत आहेत, त्याने त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष स्वत:कडे वेधले आहे. जिनपिंग यांनी जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राष्ट्राराष्ट्रात व्यापारी युद्धे झाली तर त्याचा फायदा कुणालाही होणार नाही, असे विधान केले होते. वरवर हे विधान सर्वांचा विचार करणार्‍या जागतिक नेत्याचे वाटावे. मात्र, त्यामागचा चिनी अजेंडा काही केल्या दडत नाही. जिनपिंग यांची एक खासियत म्हणजे ते अत्यंत आग्रही नेते आहेत. ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या मनात त्या विधानामागचे ठोस आराखडे तपशीलांसह तयार असतात. खरेतर आर्थिक महासत्ता म्हणून जगाचा सारा व्यापारउदीम ताब्यात घेण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. जिनपिंग आव काहीही आणत असले तरी त्यांच्या या महत्त्वाकांक्षा काही केल्या लपून राहात नाहीत. जगाला नवसमाजवादाची गरज असल्याचे ते सांगतात. मूळ मुदलातला समाजवाद सपशेल फसलेला असताना आता नवसमाजवाद जिनपिंग यांना हवा आहे, तो त्यांच्या विस्तारवादी भांडवलशाहीला सोनेरी झालर लावण्यासाठी. एकेकाळी साम्यवादी असलेला चीन आता सपशेल भांडवलवादी झाला आहे.


जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर जी उलथापालथ घडली त्याचा सर्वाधिक फायदा अमेरिका आणि त्याच्या खालोखाल चीनने घेतला. युरोपीय राष्ट्रेही यात होती. अमेरिकेकडे अशाप्रकारच्या बदलांना सामावून घेण्यासाठीच्या व्यवस्था चोख होत्या. चीनने बदलत्या काळानुसार अत्यंत काटेकोरपणे स्वत:ला बदलून घेतले. नोकरशाही, व्यवस्थांमधला ढिलेपणा भिरकावून दिला. तंत्रज्ञानाचा विकास, त्याच्या आधारावर निर्माण करण्यात आलेली धोरणे यामुळे चीन पुढे पुढेच जात राहिला. जागातिक ऊर्जा बाजारपेठ, खनिज बाजारपेठ आणि वित्तीय बाजारपेठ या क्षेत्रात चीनला सहभागी केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणे आज शक्य नाही. अर्थात याचे सर्व श्रेय जिनपिंग यांनाच जाते. हूं जिताओ यांच्याकडून सत्तेच्या चाव्या शी जिनपिंग यांच्याकडे आल्या. जिंताओ यांचा कार्यकाळ अत्यंत एकसुरी आणि निष्प्रभ होता. त्याच्या तुलनेत जिनपिंग यांनी चीनमध्ये नवी चेतना आणली. आपण जागतिक राजकारणापेक्षा अर्थकारणावर प्रभाव टाकू शकतो, असा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला. जिनपिंग यांच्या काळात चीनने झपाट्याने केलेली प्रगती आजही निरनिराळ्याव्यवस्थापन संस्थांमध्ये अभ्यासाचा विषय होऊन बसली आहे. शी जिनपिंग यांच्या या खटाटोपामुळे अमेरिकेशी स्पर्धा करण्याची तयारी असलेला चीन हा एकमेव देश समोर येत आहे.


अर्थात अमेरिका व चीन यांच्यातील अर्थव्यवस्था म्हणून असलेले आकड्यांचे अंतर खूप मोठे आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था १९ लाख कोटी डॉलर इतकी आहे, तर चीनची नऊ लाख कोटी डॉलर इतकी. म्हणजेच जवळजवळ निम्मी. मात्र चीन अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग मात्र अफाट आहे. या वेगाची तुलना जगात कशाशीही होऊ शकत नाही. अर्थात, या सगळ्याचे श्रेय जिनपिंग यांचेच आहे. त्यांच्या कर्तृत्वाविषयी शंका घ्यायला जागा नाही. पण, इतक्या मुदलावर चीनप्रमाणे जग ताब्यात घेण्याची त्यांची मनिषा किती फलदूप होते हे पाहाणे रंजक ठरेल. आर्थिक आघाड्यांवर मुसंडी मारण्यात शी वाक्‌बगार आहेतच, पण त्याच्या मूल्यांचे काय हा मोठा प्रश्न आहे? अमेरिकन राष्ट्र जीवनावर व तिथल्या राजकारणावर काही प्रमाणावर टीका करता येऊ शकते. सांस्कृतिक जीवनावरही काही प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात, पण संपूर्ण जगाला मोकळेपणे सामावून घेण्याचा अमेरिकन स्वभाव अनेक प्रवाहांमुळे सिद्ध झाला आहे. चीनच्या बाबतीत असे मुळीच नाही. चीन कितीही मोठा झाला तरीही आशियायी राष्ट्रे त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला तयार नाहीत. अमेरिका लोकशाहीला मूल्य मानते. अन्य कुठल्याही शंभर टक्के लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेल्या देशात ज्या गडबडी होऊ शकतात, त्या अमेरिकेतही होतातच. पण सर्वसमावेशकता हा त्यांचा गुण आहे. भारत आणि अमेरिका परपस्परांचे चांगले मित्र होऊ शकतात. त्याचे मुख्य कारण दोघांमध्येही असलेली लोकशाही मूल्ये. जिनपिन माओप्रमाणे चीनचे भाग्यविधाते आहेत, असा गजर सध्या चीनमध्ये सुरू असला तरीही त्यांची वाटचाल मात्र स्टॅलिनच्या मार्गाने सुरू आहे. १९२२ साली स्टॅलिन कम्युनिस्ट पक्षाचा सरचिटणीस झाला. आपल्याला नवा रशिया घडवायचा आहे, हे त्याने त्याच्या मनाशी पक्के केले होते. लेनिनच्या आजारपणाच्या पार्श्वभूमीवर त्याला मिळालेली सत्ता ही स्टॅलिनने संधी मानली. सोव्हिएत राज्य, कम्युनिस्ट पक्ष आणि शासनयंत्रणा या तिन्हीवर त्याने आपली पकड कायमकेली. लेनिनच्या निधनानंतर आपले विरोधक टप्प्याटप्प्याने पराभूत करण्यात त्याने स्वत:ला पणाला लावले. पुढे सोव्हिएत रशियाचे काय झाले ते जगजाहीर आहे. शी जिनपिंग यांच्या सार्‍या प्रवासातले हे मोठे साधर्म्य आहे की, सनझेंगसाई, बो झिलाई, हुचुनहूआ यासारखे शी यांचे राजकीय विरोधक विजनवासात गेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांचा नवसमाजवादाचा गांजा नक्की कसा चालणार हे पाहावे लागेल.

@@AUTHORINFO_V1@@