नवा बोगदा एप्रिलमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018
Total Views |
 
 
नवा बोगदा एप्रिलमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार
महापौर ललित कोल्हे यांनी केली अधिकार्‍यांसमवेत पाहणी
जळगाव, २६ फेब्रुवारी ः
गणेश कॉलनीजवळ असलेल्या बजरंग बोगद्याला समांतर दोन नवीन बोगदे उभारण्यात येत आहेत. हे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी महापौर ललित कोल्हे यांनी या कामाची पाहणी करून स्थितीचा आढावा घेतला.
 
 
यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक संदेश भोईटे, माजी नगरसेवक नितीन पाटील, महापालिकेच्या बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता सुनील भोळे, रेल्वे प्रशासनाचे अभियंता शशिकांत पाटील यांच्यासह रेल्वेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महापौर कोल्हे यांनी सुमारे दीड तास रेल्वेच्या अधिकार्‍यांशी चर्चा करत कामाचा आढावा घेतला. तसेच काही महत्त्वपूर्ण सूचनादेखील केल्या.
 
 
मार्च अखेरपर्यंत नवीन बोगद्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. हा बोगदा वाहतुकीला खुला करण्यापूर्वी बोगद्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्याचे विस्तारीकरण, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी बोगद्याच्या दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण हटवून विजेचे पोलही स्थलांतरीत करावे लागणार असल्याचे यावेळी रेल्वेच्या अधिकार्‍यांनी महापौर कोल्हे यांना सांगितले. त्यानुसार, महापौरांनी याबाबत महापालिका प्रशासन लवकरच महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून विद्युत पोल स्थलांतरीत करण्याच्या कामाला सुरूवात करेल, असे सांगितले. अतिक्रमण काढण्याच्या सूचनादेखील महापौरांनी केल्याने येत्या आठवडाभरात अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
 
गटारीची समस्याही मार्गी लावणार
जळगाव : नवीन बोगद्याच्या शेजारीच असलेली गटार रस्त्याच्या दुसर्‍या बाजुला स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याची समस्या उद्भवणार नाही, असेही रेल्वेच्या अधिकार्‍यांनी महापौरांना पाहणीवेळी सांगितले.
नवीन बोगद्याच्या दोन्ही बाजुला सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसेच नवसाच्या गणपती मंदिराची भिंत ८ फुट अंतरापर्यंत काढून अशोक बेकरीकडून येणार्‍या रस्त्याची रुंदी वाढविण्यात येणार आहे. जेणेकडून गणेश कॉलनीकडून येणारी वाहने थेट बजरंग बोगद्यापर्यंत जावू शकतील. त्याचप्रमाणे बोगद्याच्या बाजुला म्हणजेच रेल्वे रूळाला समांतर असलेली गटार बंद करून ती रस्त्याच्या विरुद्ध दिशेला तयार करण्यात येईल. या गटारीचे पाणी थेट एसएमआयटी महाविद्यालयाकडे जाणार्‍या मोठ्या नाल्याकडे वळविण्यात येणार आहे. यामुळे पावसाळ्यात बोगद्याजवळ पाणी साचण्याची समस्या  निर्माण होणार नाही.
 
 
जुना बजरंग बोगदा सुरूच राहणार
जळगाव : नवीन बोगदा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर जुना बजरंग बोगदादेखील वाहतुकीसाठी खुलाच राहणार आहे. त्यामुळे येथील वाहतुकीची समस्या लवकरच मार्गी लागणार आहे. पिंप्राळा रेल्वे गेटवरील वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.
नवीन बोगदा वाहतुकीसाठी सुरू करण्याआधी अशोक बेकरी तसेच गणेश कॉलनीकडून येणार्‍या रस्त्याची महापालिकेकडून डागडुजी करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत हा रस्ता खराब झाला असून त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच पिंप्राळा, एसएमआयटी महाविद्यालयाकडील रस्त्याचीदेखील दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे महापौर ललित कोल्हे यांनी सांगितले. नवीन बोगद्यासह जुना बजरंग बोगदा वाहतुकीसाठी सुरू राहणार असल्याने या भागात नेहमी उद्भवणारी वाहतुकीची समस्या आता कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@