४८ वर्षे विरुद्ध ४८ महिने...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2018   
Total Views |
 

 
काँग्रेसने स्वच्छ नजरेने आपल्या कारकिर्दीकडे पाहिल्यास आपल्या ४८ वर्षांच्या राजवटीत देशाची आपण कशी वाताहत केली ते त्यांच्या लक्षात येईल आणि मोदी सरकारने गेल्या ४८ महिन्यांच्या अल्प कालावधीत जे कार्य केले, त्याने त्यांचे डोळे दिपून जातील.
 
सध्या देशाच्या काही राज्यांत विधानसभा निवडणुकांचे वारे वेगाने वाहत आहेत. त्रिपुरामध्ये ९० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आता तेथील जनता निकालाच्या प्रतिक्षेत आहे. मेघालय आणि नागालँड या पूर्वांचलातील राज्यात आज मतदान होत आहे. या तिन्ही राज्यातील निवडणुकांचे निकाल ३ मार्च रोजी लागणार आहेत, तर मध्य प्रदेशात झालेल्या दोन पोटनिवडणुकांचे निकाल उद्या, म्हणजे २८ फेब्रुवारी रोजी लागतील. याचप्रमाणे कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातही आगामी काळात निवडणुका होत आहेत. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. निवडणूक कार्यक्रम घोषित होणे बाकी आहे. त्या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस यांनी जोरदार प्रचार आघाडी उघडली आहे. तेथील सिद्धरामय्या यांचे ‘कमिशन सरकार’ पाडायचेच या निर्धाराने भाजप कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दक्षिणेत सध्या कर्नाटक आणि पाँडिचेरी या दोन ठिकाणीच काँग्रेसची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांपूर्वी पॉंडिचेरीच्या दौर्‍यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी, ’’कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारची जनतेने उचलबांगडी केल्यानंतर केवळ पाँडिचेरीतच काँग्रेसची राजवट बाकी असेल. दक्षिणेत काँग्रेस राजवटीचा नमुना म्हणून फक्त पाँडिचेरीच बाकी असेल,’’ असे आत्मविश्वासाने सांगितले. आपल्या तेथील भाषणात, देशात एकाच घराण्याची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सत्ता ४८ वर्षे होती. आमचे सरकार यंदाच्या मे महिन्यात ४८ महिने पूर्ण करणार आहे. एका घराण्याच्या ४८ वर्षांच्या राजवटीत देशाने काय मिळविले व गमाविले याचा लेखाजोखा जनतेने मांडावा आणि आमच्या सरकारच्या ४८ महिन्यांच्या राजवटीत आम्ही काय केले, यावर जनतेने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. एका घराण्याने आपल्या हाती सत्ता ठेऊन देशाची कशी वाट लावली हे पंतप्रधानांना तेथील जनतेच्या निदर्शनास आणून द्यावयाचे होते. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांनंतर केवळ पॉंडिचेरी हेच नमुन्यादाखल राहणार असल्याने आपण त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करीत आहोत, असे सांगण्यासही पंतप्रधान विसरले नाहीत. भारतासमवेत स्वतंत्र झालेले काही देश विकासास प्राधान्य दिल्याने कोठे पोहोचले आणि आपण कोठे राहिलो, याकडे लक्ष वेधून एका घराण्याच्या राजवटीमुळे देशाची अत्यंत वाईट स्थिती झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
कर्नाटकमधील निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सत्ता हातची जाऊ नये म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी त्या राज्याचा दौरा करीत आहेत. कर्नाटकमधील जनतेच्या हाती फारसे काही न देणारे सिद्धरामय्या यांच्यासाठी आणि काँग्रेससाठी जनाशिर्वाद यात्रा काढून ते मतांचा जोगवा मागत आहेत. राजीव गांधी यांचा केवळ एककलमी कार्यक्रमत्यांच्या प्रचारातून दिसून येतो आणि तो म्हणजे केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या राजवटीवर टीका करणे. त्या पक्षाने अनेक चांगल्या योजना आखल्या, अनेक चांगले निर्णय घेतले, गरिबांच्या कल्याणाच्या योजना आखल्या. यापैकी काहीही त्यांना दिसत नाही. मोदी यांच्यावर टीका करणे आणि कर्नाटकमधील विविध मंदिरांना भेटी देणे, असा त्यांचा कार्यक्रमअसतो. संधी मिळेल तेथे मोदी यांचा अवमान कसा होईल हे ते पाहत असतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या पकोडेवाल्याकडे पकोडे खाऊन मोदी यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि त्यांच्या सभोवती असलेले कोंडाळे करीत असल्याचे जनतेला पाहण्यास मिळत आहे. गुजरातमध्ये विविध मंदिरांना भेटी दिल्याने मतदार आपल्या बाजूला वळला असल्याचे लक्षात घेऊन मंदिरांना, मठांना भेटी देणे त्यांनी चालू ठेवले आहे. हिंदू समाजाबद्दल राहुल गांधी आणि त्यांच्या समस्त परिवारास किती आस्था आहे, हे देशातील जनतेने पदोपदी अनुभवले आहे. सातत्याने अल्पसंख्याक समाजाचे लांगुलचालन करण्यात ज्या घराण्याच्या पिढ्या खर्ची पडल्या त्या घराण्यास एकदमअशी उपरती कशी काय झाली? एकदम राहुल गांधी ‘जनेऊधारी’ असल्याचा साक्षात्कार काँग्रेसजनांना कसा काय झाला?
 
कर्नाटकमध्ये ७ फेब्रुवारी रोजी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘‘पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नव्हे, तर महात्मा बसवेश्वर यांनी लोकशाहीचा पाया घातला होता,’’ असे म्हटले होते. महात्मा बसवेश्वर यांनी केलेल्या कार्याची मोदी यांनी प्रशंसा केली होती. राहुल गांधी यांना बसवेश्वर कोण होते याची कर्नाटक राज्यात येईपर्यंत कल्पना होती की नाही ते देव जाणे! पण, मोदी यांच्याविरुद्ध प्रचार करण्यासाठी आणि तेथील लिंगायत समाजाला खुश करण्याच्या हेतूने, राहुल गांधी यांनी बसवेश्वर यांच्या तत्त्वज्ञानाचा आश्रय घेतला आणि त्या आधारे मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांनी बसवेश्वर यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला असेल, असे त्यांच्या एकंदरीत व्यवहारावरून वाटत नाही, पण भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी राहुल गांधी यांना भाषणासाठी मुद्दे पुरविणार्‍या सल्लागारांनी तो केला असावा, असे दिसून येत आहे. अलीकडे जे विविध घोटाळे उघड होत आहेत त्याबद्दल भाजप सरकारला जबाबदार धरण्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा प्रयत्न म्हणजे अपप्रचाराचा कळस झाला! बरे, या घोटाळ्यांची सखोल चौकशी करण्यात येईल आणि कोणालाही दयामाया दाखविली जाणार नाही, असे पंतप्रधानांनी सांगूनदेखील यांचे आपले तुणतुणे चालूच! भाजपवर आरोप करण्याआधी आपल्या पायाखाली काय जळत आहे, याचा विचार करण्याचा शहाणपणा काँग्रेसजन कधी दाखविणार?
 
कर्नाटकमधील सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याकडे लक्ष वेधून घेताना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी सिद्धरामय्या सरकारचा नाकर्तेपणा दाखवून दिला. कर्नाटक सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील असल्याचे सांगून काँग्रेस राजवटीत ३,७८१ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, पण काँग्रेस सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. ते सरकार लांगूलचालन करण्याच्या राजकारणातच मग्न. इतके बेजबाबदार सरकार आपण पाहिले नाही, अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांच्याकडून होत असलेल्या टीकेला भाजपच्या एका खासदाराने जोरदार उत्तर दिले. राहुल गांधी यांच्या पणजोबांपासून देशात अनेक वर्षे काँग्रेसची राजवट होती. त्या काळात विकासकामे का झाली नाहीत? याची उत्तरे खरे म्हणजे राहुल गांधी यांनीच द्यायला हवीत, असे भाष्य त्यांनी केले. कर्नाटकमध्ये सध्या असे वातावरण आहे. निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्य आपल्या हातून जाता कामा नये, यासाठी काँग्रेसची धडपड चालू आहे. केंद्रातील सरकार अनेक चांगल्या योजना आखत असताना, विकासावर भर देत असताना, भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध असताना राहुल गांधी यांना, त्यांच्या काँग्रेस पक्षाला ते सरकार खुपत आहे. काँग्रेसने स्वच्छ नजरेने आपल्या कारकिर्दीकडे पाहिल्यास आपल्या ४८ वर्षांच्या राजवटीत देशाची आपण कशी वाताहत केली ते त्यांच्या लक्षात येईल आणि मोदी सरकारने गेल्या ४८ महिन्यांच्या अल्प कालावधीत जे कार्य केले, त्याने त्यांचे डोळे दिपून जातील!
 
 
 
 
- दत्ता पंचवाघ 
 
@@AUTHORINFO_V1@@