भारत हे अमर राष्ट्र - भागवत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2018
Total Views |



मेरठ :
भारताने जगाला धर्म दिला. जीवन योग्य पद्धतीने चालण्यासाठी धर्माची आवश्यकता असते. त्यामुळे भारताला उदय आणि अस्त नाही. आणि म्हणूनच भारत हे अमर राष्ट्र आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात राष्ट्रोदय या स्वयंसेवकांच्या भव्य एकत्रिकरणाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महामंडलेश्वर अवधेशानंदगिरी महाराज, जैनमुनी १०८ श्री विहर्श सागरजी महाराज, विवेकानंद सरस्वती स्वामी हे उपस्थित होते. संघाच्या मेरठ प्रांतातून आलेल्या अडिच लाखांहून अधिक स्वयंसेवकांनी यावेळी विविध शारीरिक प्रात्यक्षिके केली.


आजच्या या कार्यक्रमाचे नाव राष्ट्रोदय असे असले तरी भारत हे चिरंतन राष्ट्र आहे, त्यामुळे त्याच्या उदय-अस्ताचा प्रश्नच उद्भवत नाही. सूर्य ज्याप्रमाणे आपल्या जागी स्थिर आणि कायम प्रकाशित असतो व पृथ्वीला सूर्याकडे उन्मुख व्हावे लागते त्याचप्रमाणे भारत आपल्या जागी स्थिर आहे आपल्याला आपल्या राष्ट्रीयतेकडे उन्मुख होण्याची आवश्यकता आहे असे भागवत यावेळी म्हणाले. गेल्या दोन हजार वर्षांमध्ये जगाने सुख शोधण्याचे विविध प्रयोग करून पाहिले मात्र सर्व अपयशी ठरले. त्यामुळे आता जग भारताकडे मोठ्या आशेने पाहात आहे असे भागवत यांनी सांगितले.


भारतात उत्पन्न झालेल्या सर्व पंथ संप्रदायांमध्ये समान मूल्य आहेत. दर्शने वेगवेगळी आहेत, सत्याचे वर्णन करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, उपासना व साधना वेगवेगळी आहे मात्र असे असतानाही आचरणाचा उपदेश सर्वत्र समान असल्याचे आढळते. यम नियम समान आहेत. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेय, ब्रह्मचर्य, तप, शौच, स्वाध्याय, संतोष, ईश्वर प्रणिधान हे सर्वत्र समानच आहेत असे सांगत भागवत यांनी हिंदू धर्मातील विविधतेतील एकतेचे सूत्र उपस्थितांना समजावून सांगितले.

 
 
@@AUTHORINFO_V1@@