राष्ट्रधर्म - छत्रपतींची रणनीती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2018
Total Views |



छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरी होत असते. आपणा सर्वांना शिवाजी महाराजांच्या कथा ऐकायला आवडतात; पण त्यांनी जी शिकवण दिली होती, ती आजच्या परिस्थितीत आपण वापरू शकतो का? छत्रपतींचा गनिमी कावा अतिशय प्रसिद्ध आहे. आजच्या परिस्थितीत त्याचा वापर करता येऊ शकेल का?


आज अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे, त्यांच्या अनुयायांचे, त्याचप्रमाणे देशासाठी लढणार्‍या वीर जवानांची स्मारके अनेक ठिकाणी बघायला मिळतात . नव्या पिढीला त्यांची यशोगाथा समजावी, त्यांच्या शौर्याची माहिती नव्या पिढीला होऊन त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून ही स्फूर्तिस्मारके बांधली जातात. यातून देशभक्तीची मूल्ये रुजावीत आणि राष्ट्रीय एकात्मता राखण्यास मदत मिळावी, हाही त्यामागचा उद्देश आहे. आपला देश बलशाली व्हावा, असे सार्‍याच भारतीयांना वाटते. पण, देशप्रेम ही केवळ सोयीने वापरण्यापुरती किंवा स्वातंत्र्य सैनिकांवर, पोलिसांवर, लष्करांवर सोपविलेली गोष्ट नसावी. आज आपला देश सुरक्षित आहे का? त्यासंदर्भात देशासमोर कोणती आव्हाने आहेत आणि छत्रपतींच्या रणनीतीचा वापर करून ही आव्हाने कमी करू शकतो का? याचा विचार केला पाहिजे.


राष्ट्रधर्म हा सर्वांचा पहिला धर्म पाकिस्तानकडून होत असलेला दहशतवाद असो, चीनकडून होणारा विस्तारवाद असो; युद्धे आधीही झालेली आहेत आणि यापुढेही होत राहतील. देशासाठी जगणे, देशप्रेम करणे, देशासाठी देह झिजवणे यामध्ये परमार्थ आहे. राष्ट्रधर्म हा सर्वांचा पहिला धर्म असला पाहिजे. ‘‘महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त बनायला पाहिजे,’’ असे छत्रपतींचे उद्गार अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण सर्वांनी ‘मी माझ्या देशाला काय देऊ शकतो, देश सुरक्षित राहण्यासाठी मी प्रथम चांगला नागरिक आणि नंतर चांगला सैनिक कशा प्रकारे बनू शकतो,’ याचा विचार केला पाहिजे. छत्रपतींनी वापरलेला गनिमी कावा आजही उपयोगाचा ठरू शकतो. त्याचा वापर करून देशाच्या शत्रूंवर आपण मात करू शकतो. त्यासाठी शत्रूंच्या एक पाऊल पुढे राहणे मात्र आवश्यक आहे.


संशयास्पद हालचालींबाबत सूचना

छत्रपती हे एकमेव राजे होते, ज्यांनी आपले लक्ष समुद्री आरमारावर केंद्रित केले होते. त्यासाठी त्यांनी समुद्र किनार्‍याजवळ किल्ले बांधले आणि समुद्रमार्गे येणार्‍या शत्रूपासून राष्ट्राचे संरक्षण केले होते. ते जलदुर्ग आजही अस्तित्वात आहेत. आज खास करून महाराष्ट्राला समुद्रमार्गाने शिरणार्‍या दहशतवादाचा मोठा धोका आहे. शिवाजी महाराजांची युद्धनीती लक्षात घेऊन आपणही समुद्र किनार्‍यावरून होणारा शत्रूचा धोका रोखू शकतो. त्यासाठी समुद्र किनारी राहणार्‍या कोळी बांधवांनी आणि इतरांनीही आपल्या सुरक्षा व्यवस्थेचे डोळे बनून किनार्‍यावरच्या संशयास्पद हालचालींबाबत ताबडतोब सूचना दिली पाहिजे. अनोळखी बोट किनार्‍यावर येणे, बोटीतून रात्री-बेरात्री अथवा दिवसा संशयास्पद सामानाची ने-आण होणे, अशा गोष्टींकडे लक्ष ठेवले पाहिजे. स्थानिकांच्या मदतीमुळेच आपली किनारपट्टी सुरक्षित राहू शकते.

सक्षम गुप्तहेरांची आज देशाला मोठी गरज
 
शिवाजींच्या काळात आदिलशाही, कुतुबशाही, मुघल याबरोबरच राष्ट्रातील घरभेदींवरही छत्रपतींनी नियंत्रण ठेवले आणि प्रसंगी त्यांना नामोहरमही केले. म्हणूनच त्यावेळी आपले स्वराज्य सुरक्षित राहिले. आजच्या काळात पाकिस्तान, चीन, दहशतवादी, देशांतर्गत हिंसाचार घडविणारे माओवादी आणि पाच-सहा कोटी बांगलादेशी घुसखोर देशांतील आर्थिक व्यवस्थेवर ताण निर्माण करत आहेत. देशाच्या आतील देशद्रोही त्यांच्या देशविरोधी कारवायांना मदत करत आहेत.


शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खाते अतिशय बलशाली होतेे. बहिर्जी नाईक यांनी अतिशय धोकादायक मोहिमा राबवून गुप्त माहिती मिळवली होती. ज्याचा ङ्गायदा राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी झाला. अशा गुप्तहेरांची आज आपल्या देशाला मोठी गरज आहे. त्याद्वारे आपण देशावर होणारे दहशतवादी हल्ले रोखू शकतो. प्रत्येक नागरिकाने आपले कान आणि डोळे उघडे ठेवून सतर्कता बाळगली आणि सुरक्षा व्यवस्थांना वेळोवेळी मदत केली तर त्याचा ङ्गायदा दहशतवादी हल्ले रोखण्यास नक्कीच होऊ शकतो. दहशतवादी कसे शिरतात, त्यांच्या हालचाली कशा असतात, माओवाद्यांचे देशांतर्गत काम कसे चालते. तसेच माध्यमांद्वारे दहशतवादी विचार कसे पसरविले जातात, याची माहिती प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे.
छत्रपतींचे गुण अंगिकारले, तर देश सुरक्षित

शिवाजी हा एक मंत्र आजही सार्‍यांना प्रेरणा देऊ शकतो. इतिहास हा भूतकाळाचा साक्षीदार आणि भविष्यासाठी वाटाड्याचे कामही करतो. म्हणूनच छत्रपतींचे गुण अंगिकारले तर नक्कीच आपल्या देशाला सुरक्षित ठेवता येऊ शकते. चीन सीमेवर किंवा पाकिस्तानी सीमेवर भारताचे सैन्य शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे. परंतु, चीन आणि पाकिस्तानने जे अपारंपरिक युद्ध भारताविरुद्ध सुरू केले आहे, त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. आज अंतर्गत सुरक्षेची चार मोठी आव्हाने भारतासमोर आहेत. १) जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेले छुपे युद्ध, २) माओवाद/ डावा दहशतवाद ३) इतर भारतात पसरलेला दहशतवाद ४) बांगलादेशी घुसखोर आणि त्यापासून होणारा त्रास होय


काश्मीरमध्ये शांतात आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी भारतीय सैन्य उत्कृष्ट काम करत आहेत. त्यामुळे काश्मीरची काळजी भारतीय नागरिकांनी करू नये, मात्र सैन्याविरुद्ध माध्यमांद्वारे कोणी आरोप करीत असतील तर देशप्रेमी नागरिकांनी असे आरोप खोडले पाहिजेत.


वैचारिक दहशतवादाला उत्तर

दुसरा मोठा धोका म्हणजे मध्य भारतात पसरलेला माओवाद. माओवाद्यांची संख्या दोन-तीन हजार असण्याचा अंदाज आहे. मात्र, मोदी सरकार आल्यापासून माओवाद्यांच्या कारवायांवर बरेच नियंत्रण आलेले आहे. माओवादी तरुणांना आपल्या युद्धात सामील करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर आंदोलन करून ते भारताची प्रगती रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या वैचारिक दहशतवादाला आपण उत्तर द्यायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोणी अशा वैचारिक दहशतवादाला कोणी बळी पडत असेल, तर त्याला त्यापासून प्ररावृत्त करून देशप्रेमाकडे वळवले पाहिजे. काही तज्ज्ञ किंवा माध्यमे देशाला तोडण्याबाबत चर्चा करत असतील, तर त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे.


बांगलादेशी घुसखोरांना पकडा
 
सध्या पाच ते सहा कोटी बांगलादेशी भारतात घुसलेले आहेत. महाराष्ट्रात ते मुंब्रा, कल्याण, औरंगाबाद, भिवंडी आणि पुण्यात सुद्धा लाखोंनी घुसलेले आहेत. त्यांना ओळखण्याची खुण म्हणजे बहुतेक बांगलादेशी आसाम किंवा प. बंगालचे निवडणूक कार्ड किंवा आधार कार्ड घेऊन येतात. त्यांच्या ओळखपत्रांवर मुजिबुर रहेमान, मालदा, पश्चिम बंगाल अशा प्रकारची माहिती असू शकते. परंतु, त्यांना स्थानिक गावांविषयी आणि नातेवाईकांविषयी माहिती विचारल्यास ती व्यवस्थित सांगता येत नाही किंवा त्याची शहानिशा केल्यास ती खोटी असल्याचे आढळते. असे बांगलादेशी ङ्गुटपाथ, झोपडपट्टी किंवा बांधकाम चालू असणार्‍या ठिकाणी दिसतात. अशा लोकांची माहिती नागरिकांना मिळाल्यास ती पोलिसांना देता येऊ शकते. तरुणवर्गाने सतर्क राहावे.


दहशतवादी हल्ल्यांना प्रसिद्धी देणे हे सुद्धा अयोग्यच आहे, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नये. तसेच इंटरनेट वापरणार्‍या तरुणवर्गाने सतर्क राहून त्यांना ‘इसिस’ सारख्या संघटनांची एखादी लिंक अथवा ब्लॉग आढळल्यास ताबडतोब त्यांची माहिती पोलिसांना द्यावी. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यांकडून आपण अशा प्रकारे प्रेरणा घेऊ शकतो.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धेे आणि आजची युद्धेे यामध्ये ही बरेच साम्य आहे. छत्रपतींनी बहुतेक युद्धे ही सह्याद्रीच्या डोंगरामध्ये केली. आजही भारतीय सैनिक काश्मीरमधल्या किंवा ईशान्य भारताच्या पर्वतरांगामध्ये दहशतवाद्यांविरुद्ध लढत आहेत. मुंबई-पुणेसारख्या शहरांवर आजही दहशतवाद्यांचे सावट आहे. समुद्र किनार्‍यापासून काही प्रमाणात धोका सतावत आहे. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात साडेतीनशेपेक्षा जास्त किल्ले बांधले आहेत आणि त्या किल्ल्यापेक्षा अधिक मजबुत अशी अनुयायांची फौज तयार केली होती. गरज आहे, देशप्रेमी नागरिकांची


प्रत्येक नागरिकांनी देशांचे सैनिक आणि गुप्तहेर बनून देशाला सुरक्षित ठेवण्यास मदत केली पाहिजे. त्यासाठी सीमेवर जाण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या गोष्टी, सोशल मीडियाद्वारे होणारा देशविरोधी प्रचार, भरकटणार्‍या तरुणांना दिशा दाखवणे यासारख्या माध्यमातूनही आपण देशप्रेम व्यक्त करू शकतो आणि देशाची सुरक्षा राखण्यास मदत करू शकतो. काही प्रमाणात आपण शिवाजी महाराज बनण्याचा प्रयत्न करू शकतो. आज देशासमोरच्या शत्रूंचा खातमा करण्यासाठी ज्याप्रमाणे सक्षम बलशाली सरकारची आणि सैन्याची गरज आहे, तेवढ्याच प्रमाणात देशप्रेमी नागरिकांची देखील गरज आहे. छत्रपतींचे इतिहासातील स्थान अढळ आहे. ते अतिशय कर्तृत्वान, असामान्य रणनीती कुशल असे राजे होते. जनतेचे हृदय जिंकणारा तो जाणता राजा होता. ते युगपुरुष होते. त्यांनी शिकवलेल्या मार्गावर वाटचाल करत आपण वर्तमान शत्रुंचा सामना केला, तर नक्कीच त्यांना पराभूत करू शकतो.
 
 
(नि.) ब्रि. हेमंत महाजन 
@@AUTHORINFO_V1@@