मालमत्ता सर्वेक्षणाचा अहवाल घरपोच मिळणारसर्वेक्षणावर मालमत्ताधारकांनी हरकत नोंदवल्याने प्रशासनाने घेतला निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2018
Total Views |

मालमत्ता सर्वेक्षणाचा अहवाल घरपोच मिळणार
सर्वेक्षणावर मालमत्ताधारकांनी हरकत नोंदवल्याने प्रशासनाने घेतला निर्णय


 
 
 
 
जळगाव, २३ फेब्रुवारी ः
महापालिका प्रशासनाकडून शहरातील मालमत्तांचे मॅन्युअली सर्वेक्षण केले जात आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल माहितीसाठी जाहीर केला जाणार असून तो मालमत्ताधारकांना घरपोच मिळणार आहे.
या अहवालातून मालमत्ताधारकांना आपल्या जुन्या व नव्या मालमत्तेची परिपूर्ण माहिती होणार आहे. सर्वेक्षणप्रसंगी मोजमापाची माहिती मिळत नसल्याने काही मालमत्ताधारकांनी आपली हरकत नोंदवली होती. त्याची दखल घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
 
 
मालमत्तांच्या सर्वेक्षणाद्वारे कराच्या कक्षेत नसलेल्या मालमत्तांचा शोध घेऊन करचुकवेगिरी करणार्‍या मालमत्ताधारकांकडून करवसुली करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. महापालिका कार्यक्षेत्रात असंख्य मालमत्ता कोणतीही परवानगी न घेताच बांधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशा मालमत्तांची कोणतीही नोंद महापालिका प्रशासनाकडे नाही. नोंद नसल्याने महापालिकेला बेकायदा मालमत्तांची कर वसुली करताना बंधने येत होती. अशा मालमत्ता शोधण्यासाठी महापालिकेने शहरातील सर्वच मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
सुनावणी झाल्यानंतर अंतिम बिलांचे वाटप
मालमत्ता सर्वेक्षणाच्या अहवालावर आलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतरच चालू आर्थिक वर्षातील अंतिम बिलांचे वाटप महापालिकेकडून केले जाणार आहे. या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने यंदा बिलांचे वाटप उशिराने होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरातील सर्वच मालमत्तांचे मॅन्युअली व ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आल्याने मालमत्तांची परिपूर्ण माहिती प्रशासनाकडे असणार आहे. ड्रोनद्वारे घेतलेली मालमत्तांची छायाचित्रे थेट बिलांवर असणार आहेत. त्यामुळे बिले बिनचूक व नियमानुसारच असतील, असा दावाही प्रशासनाने केला आहे.
 
 
अहवाल मिळाल्यानंतर हरकत नोंदवता येणार
मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक मालमत्ताधारकाला त्याच्या मालमत्तेचा अहवाल महापालिकेकडून घरपोच दिला जाणार आहे. त्यात जुन्या मालमत्तेचे क्षेत्रफळ, नव्या मालमत्तेचे क्षेत्रफळ तसेच वाढीव क्षेत्रफळाची माहिती असणार आहे. या अहवालावर हरकत असेल तर मालमत्ताधारकाला प्रशासनाशी संपर्क साधावा लागणार आहे. त्यानंतर प्रशासनाकडून सुनावणी घेऊन हरकती निकाली काढल्या जाणार आहेत.

मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर मालमत्ताधारकांना अहवाल दिला जाणार आहे. त्यावर काही हरकत असेल तर सुनावणी घेऊन ती निकाली काढू. त्यानंतर चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिले वाटप केली जातील.
- लक्ष्मीकांत कहार, उपायुक्त
@@AUTHORINFO_V1@@