बेजबाबदार लोकसमन्वय प्रतिष्ठानला शासकीय कामे मिळतात तरी कशी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2018
Total Views |

बेजबाबदार लोकसमन्वय प्रतिष्ठानला शासकीय कामे मिळतात तरी कशी?
पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांचा सवाल


 
 
जळगाव-
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील (एन.एच.आर.एम) नंदुरबार जिल्ह्यातील कामांमध्ये लोकसमन्वय प्रतिष्ठानने दाखवलेल्या बेजबाबदारपणाबद्दल या संस्थेची सर्वंकष चौकशी व्हावी, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात सामूहिक वनहक्क संवर्धन आणि व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे काम रद्द करावे त्याचसोबत जळगावच्या सिद्धार्थनगरमधील आदिवासी वसतिगृहात याच प्रतिष्ठानच्या बेनिपाडा बचत गटाने केलेल्या भोजन ठेक्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करून या संस्थेला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आदिवासी विभागाच्या सचिवांकडे एका निवेदनाद्वारे जिल्ह्यातील पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.
 
 
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात एन.एच.आर.एम. अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा आणि अक्कलकुआ तालुक्यातील कामांच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रतिभा शिंदे यांच्या लोकसमन्वय प्रतिष्ठान या संस्थेला देण्यात आली होती. परंतु त्यांनी केवळ निधी लाटून ‘साथी’ या सहयोगी संस्थेचीही फसवणूक केल्याबद्दल शहादा न्यायालयाने प्रतिभा शिंदे यांना ३ लाख ११ हजार रुपयांची रक्कम तातडीने जमा करण्याचा निकाल नुकताच दिला आहे. या संदर्भात जनार्थ आदिवासी विकास संस्थेच्यावतीने विक्रम पुरुषोत्तम कान्हेरे आणि रंजना विक्रम कान्हेरे यांनी शहादा येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता.
 
 
महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जारी केलेल्या जीआरनुसार सामूहिक वनहक्क संवर्धन आणि व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याचे काम लोकसमन्वय प्रतिष्ठानला मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यातील कर्जाणे, छळावूर, पाल, गारखेडा, अंधारमडी या पाच आणि नंदुरबार जिल्ह्यातील २० गावांचे काम या भ्रष्ट संस्थेस देण्यात आले आहे. या संस्थेचा गोंधळ अनेकदा शासनासमोर येऊनही त्यांना शासनाच्या योजनेत कसे सहभागी केले जाते. याविषयी कुणाचा दबाव आहे का? असा सवालही करण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती सर्व संबंधित शासकीय खात्यांकडे पाठविल्या आहेत. या निवेदनावर अभय उजागरे (न्यू कॉन्झर्वर), राजेंद्र नन्नवरे (पर्यावरण शाळा), राजेश ठोंबरे (जिल्हा मानद वन्यजीव रक्षक), वासुदेव वाडे (वन्यजीव संरक्षण संस्था), इम्रान तडवी (अग्निपंख), सुरेंद्र चौधरी (उपज संस्था), बाळकृष्ण देवरे, अमन गुजर, राहुल सोनवणे (वन्यजीव संरक्षण संस्था), सुरेंद्र चौधरी (उपज संस्था, भुसावळ) जितेंद्र वाणी (गरुडझेप, अमळनेर), अश्विन पाटील (उडान-अमळनेर) यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
 
 
जळगावच्या कामाचा ठेका नंदुरबारकडे कसा?
जळगावातील सिद्धार्थनगर येथील वसतिगृहातील १०० आदिवासी विद्यार्थ्यांनी भोजनासाठी यावल प्रकल्प कार्यालयापर्यंत रात्रभर पायी प्रवास केला होता. या वसतिगृहाचा ठेका प्रतिभा शिंदे यांच्या केनिपाडा बचत गटाकडे आहे. विशेष म्हणजे, जळगाव जिल्ह्यातील गट सोडून नंदुरबार जिल्ह्यातील बचत गटांकडे हा ठेका कसा देण्यात आला? याची प्रशासनाने चौकशी करण्याची गरज आहे. जिल्ह्याबाहेरील संस्था आणि संघटनांना आदिवासी आणि दुर्गम भागात दिले जाणारे ठेके रद्द करण्यात यावे आणि त्या संस्थेला कोणत्याही शासकीय कामात सहभागी करू नये, असे आवाहनही या निवेदनात केले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@