मुंबई-अहमदाबाद हा तर बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2018
Total Views |
 

मार्ग दिल्लीपर्यंत नेणार, नितीन गडकरींची स्पष्टोक्ती

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण मार्च, २०१९ पर्यंत


मुंबई : अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा देशात उभारण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन्सपैकी केवळ पहिला टप्पा आहे. मूळ कल्पना मुंबई-दिल्ली बुलेट ट्रेनचीच असून असून अहमदाबादपर्यंतचा प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. कारण दिल्लीला जाताना वाटेत अहमदाबादमधूनच जावे लागते, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत केली.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमवेत वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी गडकरी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, रस्ते वाहतूक आणि नौकानयन विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत ४ लाख २७ हजार ८५५ कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. माझ्या कार्यकाळात मी ५ लाख कोटींची कामे करण्याचे लक्ष्य ठेवले होते. ते लक्ष्य पूर्ण करून सहा लाख कोटीपर्यंतची कामे आपण करू शकू, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला. राज्यात बंधारे पूलाची १६७ कामे करण्याचा मानस असून त्यातून दुष्काळग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असाही दावा गडकरी यांनी केला.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची जास्तीत कामे या वर्षात पूर्ण करण्याचा निर्धार आपण केला असून त्यासाठी २ लाख ८२ हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला असल्याचे ते म्हणाले. कल्याण - माळसे मार्गासाठीही निधी वितरित केला असून हा मार्ग पुढे थेट विशाखापट्टणमपर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. राजकीय मुद्द्यांवर गडकरी यांनी मोजकेच भाष्य केले. दिल्लीत गेलेल्या मराठी नेत्यांविषयी ते म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली. राजकारणात चढ-उतार येत असतात. त्यामुळे आपली दुसऱ्यांदा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची संधी हुकली असल्याची खंत नाही, मात्र त्यावेळी खोटे आरोप झाले याचे शल्य नक्कीच असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मुंबई-गोवा मार्गाचे चौपदरीकरण २०१९ पर्यंत
बरीच वर्षे प्रतीक्षेत असलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील बहुतेक अडथळे दूर झाले आहेत. मुख्य अडथळा जमिन संपादनाचा होता तोही दूर झाला आहे. त्यामुळे मार्च, २०१९ पर्यंत या मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, अशी माहिती गडकरी यांनी केली. मुंबई - गोवा जलवाहतुसाठीही आपण प्रयत्नशील असून त्यासाठी परदेशी कंपनीला त्याचा आरखडाही तयार करण्यास सांगितले आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@