विद्यार्थ्यांच्या हाताला चव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2018
Total Views |


'रोस्ट अँड कोस्ट' खाद्य महोत्सवाला देशविदेशातील खवय्यांची पसंती

 

मुंबई दि. २ फेब्रुवारी : तुम्हाला भारतातल्या समुद्रकिनारी भागातील मेजवानी, त्यातही रोस्टेड मेजवानी चाखायची असेल तर पावलं अंधेरीतल्या कोहिनूर कॉंटिनेंटलकडे वळवावीच लागतील. कारण १७ तारखेपासून २५ फेब्रुवारीपर्यंत इथलं सॉलिटेअर रेस्टॉरंट आपल्या ताब्यात घेतलं आहे ते कोहिनूर इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या ३० विद्यार्थ्यांनी 'रोस्ट अँड कोस्ट' खाद्य महोत्सवासाठी. महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून देशी-विदेशी खवय्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने विद्यार्थी भारावून गेले आहेत, पण सोबतच पाठीशी कोणताच अनुभव नसताना इतक्या लोकांना सेवा पुरविताना मुलांचा कसही लागत आहे.

या महोत्सवात पदार्थ शिजवण्यापासून ते वाढणं अशी सर्व जबाबदारी किमीचे विद्यार्थी पार पाडत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे, मेन्यूमधील एकही पदार्थ यू ट्यूबवर किंवा इंटरनेटवर सापडणार नाही कारण मुलांनी वेगळी वाट चोखाळत आपल्या आजीआजोबांची मदत घेत, त्यांच्या काळातील पारंपरिक चवीचे पदार्थ तयार केले आहेत. त्यामुळे या महोत्सवाला भेट देणं म्हणजे जुन्या काळात जाऊन आपल्या आजीच्या हातचे पदार्थ चाखण्याची संधी ठरेल, तेही एकाच वेळी विविध राज्यांतील आजींच्या हातची चव!

 

महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी १७ तारखेला, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाव शेफ सतीश अरोरा यांच्या हस्ते झाले तेव्हा या मुलांचा आत्मविश्वास आणि प्रयोगशीलता पाहून त्यांनीही प्रभावित झाल्याचे नमूद केले. या खाद्य महोत्सवात भारताच्या पूर्व ते पश्चिम किनारपट्टीवरील शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल आहे.

सुरणाची कोशिंबीर, खेकड्याची उकड, भोपळा-खोबर्‍याचे सूप, काखारू फुला भाजा, मँगलोरिअन पट्टी समोसा, चक्ककुरा वडा (भोपळ्याच्या बियांपासून बनलेला वडा), अँग्लो इंडियन पोहा भुजिंग (चिकन रेसिपी), रोस्टेड पापलेट, रोस्टेड पोर्क विंदालू, उंधीयो, हिरवा दम दम, शिवल्या अटकोलचा रस्सा, सल्ली मुर्गी, कोशा मनशॉ (बंगाली रेसिपी) यांसारखे विविध राज्यांतील विभिन्न पदार्थ येथे चाखायला मिळतील. एकूण ९ दिवसांत मिळून विद्यार्थी सुमारे २५० पदार्थ तयार करणार आहेत त्यापैकी प्रत्येक दिवशी ३० पदार्थ चाखता येतील.

 

याशिवाय 'स्पीन द व्हील' हा गेम खेळून खवय्यांना बिलात सवलत मिळवता येईल किंवा गुडी बॅग, बिअर, मॉकटेल, कॉकटेल, बेकरी हॅंपर, केसी फूड व्हाउचर आणि एका बुफेवर २५, ५०, ७५ ते १००% पर्यंत सवलतही मिळवता येईल. या महोत्सवाला भेट देण्यासाठी 08830616342 / 022 67693603 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@