मार्चपासून एकात्मिक तिकिट प्रणालीच्या कामास सुरूवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2018
Total Views |




मुख्यमंत्र्यांची आढावा बैठकीत निर्देश

मुंबई : दि. १ मार्चपासून एकात्मिक तिकिट प्रणालीच्या पहिल्या टप्प्याच्या कामास सुरूवात करण्यात येणार आहे. मुंबई एम.एम.आर प्रदेशासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली असून शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टप्प्याच्या कामास मार्चपासून सुरूवात करण्याचे आदेश दिले.


प्रवाशांच्या सोयीसाठी एकात्मिक तिकिट प्रणालीची सुरूवात करण्यात येत आहे. याद्वारे प्रवाशांना मुंबईत कोणत्याही ठिकाणी एकाच तिकिटाद्वारे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवास जलद होणार असून प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे. दरम्यान, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एकात्मिक तिकिट या प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान, सहआयुक्त संजय देशमुख, के. विजयालक्ष्मी यांच्यासह रेल्वे, मेट्रो, परिवहन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी ही तिकीट प्रणाली उपयुक्त असून यामुळे वेळ व पैसा वाचणार आहे. या प्रणालीचे काम लवकरात लवकर सुरू करावे. तसेच फक्त मुंबई महानगरापुरतेच स्मार्ट कार्ड न ठेवता राज्यातील कुठल्याही शहरात सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी वापरता येण्याजोगी व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


दोन टप्प्यांमध्ये प्रणाली कार्यरत होणार
बेस्ट, रेल्वे, मोनो व मेट्रो, मुंबई तसेच आसपासच्या प्रदेशातील ठाणे, मिरा भाईंदर, नवी मुंबई येथील परिवहन सेवांसाठी एकच तिकीट प्रणाली असणार आहे. ही तिकीट प्रणाली अकाऊंटबेस स्मार्ट कार्डच्या रुपात असून त्यामध्ये कुठूनही रिचार्ज करता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून सार्वजनिक वाहतुकीस चालना मिळणार आहे. या प्रणालीच्या कार्यचालनासाठी विशेष उद्देश वहन कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बेस्ट, मोनोरेल व रेल्वेसाठी ही तिकीट प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात नवीन मेट्रो लाईन, इतर सार्वजनिक वाहतूक सेवांचा समावेश होणार असून याबरोबरच नंतर वाहनतळ, टोल, टॅक्सी, रिक्षा यांचाही समावेश या प्रणालीत करण्यात येणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@