पुण्यातला पर्यावरणप्रेमी उद्योजक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Feb-2018
Total Views |

भारतात रद्दी विकत घेऊन प्रक्रिया करणारे उद्योग अनेक आहेत, पण प्रत्यक्ष दारात जाऊन कागदांचा चुरा करून देणारी कैवल्य बेहरे याची ‘एमटेक’ ही एकमेव कंपनी आहे. त्याविषयी...

पर्यावरणवादी दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे विकासाला, आधुनिकतेला एकतर्फी विरोध करणारे आणि दुसरे म्हणजे आधुनिकता स्वीकारून, तंत्रज्ञानाचाच उपयोग करून प्रदूषण आणि पर्यावरणर्‍हास कसा कमी करता येईल यावर संशोधन आणि कृती करणारे. पुण्याचा कैवल्य माधव बेहरे हा युवक दुसर्‍या प्रकारचा पर्यावरणवादी. पुण्यात त्याने ’एमटेक’ नावाची स्वत:ची ‘पेपर श्रेडिंग’ कंपनी सुरू केली, जी टाकाऊ कागदांचा बारीक चुरा करून पुनर्चक्रीकरणासाठी पाठविण्याची सेवा पुरवते. अशा प्रकारचा उद्योग करणारी ही भारतातील एकमेव कंपनी आहे.


पुण्याचाच रहिवासी असलेल्या कैवल्यने सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून भूगोल विषयात बी.एस्सी. पदवी घेतली. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून पर्यावरण विषयात एम.एस्सी. केले. थोडे दिवस नोकरी करून पाहिली, पण त्यात मन रमले नाही. पर्यावरणाची मुळातच आवड असल्याने त्यात प्रत्यक्ष काहीतरी कामकरावं या ध्येयाने प्रेरित होऊन त्याने नुकतीच ‘एमटेक’ नावाची कंपनी सुरू केली आहे. ‘श्रेडर्स इंडिया’ या कंपनीकडून त्याने एक कागदांचा चुरा करणारं यंत्र घेतलं. शहरात बर्‍याच कार्यालयांमध्ये जुनी कागदपत्रे, पाकिटे, फाईल्स निघत असतात. गोपनीय मजकूर उघड होऊ नये म्हणून ती जाळून टाकली जातात. ‘एमटेक’ या कंपनीतर्फे हे यंत्र टेम्पोतून कार्यालयांपर्यंत नेले जाते आणि त्यांच्याकडची रद्दी विकत घेऊन त्यांच्यासमोरच त्याचा चुरा केला जातो आणि तो पुनर्चक्रीकरणासाठी कागद कारखान्यांकडे पाठवला जातो. भारतात रद्दी विकत घेऊन प्रक्रिया करणारे उद्योग अनेक आहेत, पण प्रत्यक्ष दारात जाऊन कागदांचा चुरा करून देणारी ही एकमेव कंपनी आहे. यामुळे माहितीच्या गोपनीयतेबाबत काही प्रश्न राहत नाही. कंपनी सुरू होऊन सहाच महिने झालेले असताना पुण्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.


‘‘कागद जाळण्याचे तुम्हाला कोणी पैसे देत नाही, पण आम्ही तुमचे जुने कागद विकत घेऊन तुमच्यासमोरच त्याचा चुरा करतो आणि माहितीची गोपनीयताही राखतो,’’ अशा शब्दांत कैवल्य याचं महत्त्व पटवून देतो आणि ऑर्डर्स मिळवतो. कागद न जाळल्यामुळे कमी होणारं प्रदूषण आणि पुनर्चक्रीकरणामुळे कमी होणारी वृक्षतोड असे याचे दुहेरी फायदे आहेत. पुणे शहरात आणि आजूबाजूला याचा जास्तीत जास्त विस्तार करण्याचं कैवल्यचं ध्येय आहे. आजकाल सर्व कंपन्यांचं ‘ग्रीन रेटिंग’ केलं जातं. म्हणजे एखादा उद्योग किती पर्यावरणपूरकरित्या चालवला जातो त्याची तपासणी करून त्याला ’हरित मानांकन’ दिले जाते. कैवल्यने सुरू केलेल्या या उद्योगामुळे कचर्‍याची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्याची संधी उद्योगांना उपलब्ध करून दिली गेली आहे, ज्यामुळे त्यांचं ‘ग्रीन रेटिंग’ वाढण्यास मदत होते. पेपरलेस व्यवहारांना उत्तेजन देण्यासाठी ‘डिजिटल डेटा मॅनेजमेंट’ ची सेवा पुरविणारी कंपनी सुरू करण्याचं कैवल्यचं कामप्रगतिपथावर आहे. हाही एक अभिनव उपक्रमआहे. कार्यालयीन वा वैयक्तिक कागदपत्रांचा संगणकीय डेटाबेस तयार करून देण्याचं कामया कंपनीमार्फत करून दिलं जाणार आहे. याशिवाय प्लास्टिक रिसायकलिंगवरही कैवल्यचं संशोधन सुरू आहे. शहरात आणि शहरांच्या आजूबाजूला खासगी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभे करणं हेच आपलं करिअर असल्याचं कैवल्य सांगतो. त्याच्या या पेपर श्रेडींग कंपनीच्या पहिल्या प्रयत्नात त्याला चांगलं यश मिळालं आहे. पर्यावरणरक्षणात वृक्षलागवड, जीवनशैलीतले बदल, कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, प्रदूषण नियंत्रण अशा अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. यातली कुठलीही एक गोष्ट निवडून त्यात झोकून देऊन कामकरणारी, नवीन कल्पना लढवणारी कैवल्यसारखी तरुण ‘माणसं’ तयार होण्याची जरूर आहे.
 
- हर्षद तुळपुळे 
@@AUTHORINFO_V1@@