अस्मिता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |



महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे आश्वासन

मुंबई : अस्मिता योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन महिला व ग्रामविकास मंत्री पंकाज मुंडे यांनी दिले. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना ५ रुपयांमध्ये ८ सॅनिटरी नॅपकीन देण्याची योजना ग्रामविकास विभागांतर्गत उमेद अभियानामार्फत राबविली जाणार आहे. या योजनेचा लोगो, योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले मोबाईल ॲप आणि डिजीटल अस्मिता कार्ड यांचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य सचिव सुमित मल्लिक, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, महिला – बालविकास सचिव विनीता सिंगल, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, येस बँकेचे अध्यक्ष अमीत सेठ, कार्यकारी उपाध्यक्ष रिमा चॅटर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.


येत्या महिला दिनापासून म्हणजे ८ मार्चपासून अस्मिता योजनोची सुरुवातत करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील फक्त १७ टक्के महिला मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकीनचा वापर करतात. उर्वरीत महिलांना सॅनिटरी नॅपकीनच्या वापराअभावी विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीविषयी समाजात असलेले अनेक गैरसमज दूर करणे गरजेचे आहेत. तसेच मुली आणि महिलांना स्वस्तात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठीच ग्रामविकास विभागामार्फत अस्मिता योजना जाहीर करण्यात आली असल्याचे, पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच मोबाईल ॲप, डिजीटल अस्मिता कार्ड यांच्या माध्यमातून या योजनेत पूर्ण पारदर्शकता राखली जाणार असून योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
 
५० मुलींसाठी मुख्यमंत्र्यांची अस्मिता स्पॉन्सरशीप
यावेळी अस्मिता फंडाचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. https://mahaasmita.mahaonline.gov.in/ या वेबपोर्टलद्वारे ग्रामीण भागातील मुली व महिलांना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होण्यासाठी सर्वांना अस्मिता स्पॉन्सर होऊ शकणार आहेत. या निधीतून ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी नॅपकीन मिळण्यासाठी लोकसहभागातून मोठी मदत उपलब्ध होणार आहे. आज मुख्यमंत्र्यांनी अस्मिता फंडाचा शुभारंभ करताना ५० मुलींना १२ महिने सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन रक्कम देऊन ५० मुलींची अस्मिता स्पॉन्सरशीप स्विकारली. तसेच पंकजा मुंडे यांनी यावेळी १५१ मुलींना १२ महिने सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करण्यासाठी ऑनलाईन रक्कम देऊन या १५१ मुलींची अस्मिता स्पॉन्सरशीप स्विकारली.


पहिल्या टप्प्यात ७ लाख मुलींना अस्मिता कार्ड
अस्मिता योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींना ८ पॅडचे एक पाकीट ५ रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी किशोरवयीन मुलींची आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नोंदणी करुन त्यांना अस्मिता कार्ड देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील साधारण ७ लाख मुलींना अस्मिता कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महिलांनाही माफक दरात सॅनिटरी पॅड
अस्मिता योजनेतून ग्रामीण भागातील महिलांनाही माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. महिलांना ८ पॅडचे एक पाकीट अनुक्रमे २४ रुपयांना २९ रुपयांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@