मुलाखत चांगलीच झाली, पण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2018
Total Views |
 
 

 
 
महाराष्ट्रातल्या जातीय वातावरणाची फार चिंता पवार साहेबांना वाटते. मात्र,लाल महालातून दादोजींचे शिल्प हलविण्यापासून आजतागायत जे जातीय राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे, त्यावर पवारांनी काही भाष्य केल्याचे आठवत नाही. ही मुलाखत ‘सांस्कृतिक इव्हेंट’ नक्कीच नव्हती. जमलेली, न जमलेली राजकीय गणिते चाचपण्याचा हा एक डाव होता.

 
 
राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बहुचर्चित मुलाखत काल पुण्यात पार पडली. राजकीयदृष्ट्या सध्या पूर्णपणे बेरोजगार असलेल्या या दोन नेत्यांना एक गोष्ट उत्तम समजते आणि ती म्हणजे, सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून चर्चेत कसे राहायचे. कला, साहित्य या समाजाला स्पर्श करणार्‍या घटकांवर ताबा ठेवून आपण आपल्या फसलेल्या गोष्टींवर पडदा कसा घालून ठेवायचा, याची कला या दोन्ही नेत्यांना उत्तम अवगत आहे.
 
 
आपण जे बोलतो ते करायचे असतेच असे नाही, अशी भावना राजकारण्यांबाबत लोकांमध्ये रुजली. त्यालाही अशी मंडळीच कारणीभूत आहेत. पुन्हा पुन्हा संयुक्त महाराष्ट्र, तोच तो मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, तेच तेच यशवंतरावांचे राजकारण, नेहरूंचे आकर्षण, इंदिरा गांधी आणि बाळासाहेब ठाकरेंची मखलाशी. पवार आणि राज ठाकरेंमध्ये साधर्म्य असे की, बाळासाहेबांना या दोघांपेक्षा अन्य कुणीही अधिक मनस्ताप दिला नाही. छगन भुजबळ, गणेश नाईक हे बाळासाहेबांच्या उमेदीच्या काळातले नेते पवारांनी फोडले आणि शिवसेना दुबळी केली. राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हयातीतच त्यांचा पक्ष फोडला आणि मनसे स्थापन केली. बाळासाहेबांच्या शेवटच्या भाषणात ही दादरची जागा हरल्याची खंत होती. या सार्‍याचे पाप कुणाच्या माथी? आणि शेवटी राज का उद्धव असा प्रश्न हेच विचारणार. या असल्या गोष्टी पवार आणि राज ठाकरेच करू शकतात.
 
 
महाराष्ट्रात वाढत असलेल्या जातीय वातावरणावर पवार साहेब आसवंगाळत होते. याची सुरूवात नेमकी कधी झाली हे पवारसाहेबांना सोईस्कररित्या आठवणार नाही. त्याची सुरूवात पुण्याच्या लाल महालातून दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलविण्यावरूनच झाली होती. छत्रपतींच्या आयुष्यात अनेक लोक आले, त्यात एक दादोजी कोंडदेव. पण, ते केवळ ब्राह्मण होते, या कारणास्तव लाल महालातून दादोजींचा पुतळा मध्यरात्री हलवला गेला. त्यानंतर लाल महालाला काटेरी तारांच्या कुंपणाचा वेढा पडला तो कायम स्वरूपी. महाराष्ट्रात जातीजातींमध्ये तेढ निर्माण व्हायला सुरूवात झाली ती इथूनच आणि जातीयवादी मंडळींना खत पाणी मिळाले ते ही इथूनच! पवारांनी या घटनेवर सूचक मौन पाळले होते. या सगळ्यातून त्यांना जो जातीय कप्पा निर्माण करायचा होता, तो त्यांनी केला. तो त्यांच्याबरोबर गेला की नाही ते माहीत नाही, पण भाजपच्याविरोधात तो जाईल याची काळजी मात्र त्यांनी नक्की घेतली. ‘एक विरूद्ध दुसरा’ हा जातीय संघर्ष तेव्हा पासून चालूच आहे. मराठा मोर्चाला कोपर्डी घटनेची पार्श्वभूमी होती. दादोजींचा पुतळा काढण्यामागचे राजकारण केवळ आणि केवळ जातीयच होते. लाल महालातून पुतळा काढण्यापासून ते जितेंद्र आव्हाडांनी सतत जातीयवादी गरळ ओकण्यापर्यंत हा सिलसिला चालूच आहे. यापैकी कुणालाही पवारांनी चार खडे बोल सुनावल्याचे ऐकीवात नाही. राज ठाकरे या प्रश्नाचा जाब विचारणार नाहीत यात शंका नाही. कारण, त्यांना कुठलाही ‘इव्हेंट’ फक्त रंगवायचा असतो. नंतर त्याचे काय होते याच्याशी त्यांना काहीच देणे घेणे नसते. पवारांनी का होईना त्यांच्याबाबत दोन-चार शब्द चांगले काढले की राज ठाकरे खुश. ऐवढीच यांची राजकीय यशापयशाची कल्पना!
 
 
महाराष्ट्राचे दुर्दैव असे की, महाराष्ट्राच्या नशिबी हे असेच नेते आहे. स्वत:ला ‘महाराष्ट्रवादी’ म्हणविणार्‍या या नेत्यांनी स्वत:चे स्थान कधीही बळकट केले नाही. याचे मुख्य कारण लोकांमध्ये स्थान बळकट करण्यासाठी लागणारी विश्वासार्हता या मंडळींनी कधी कमावली नाही. सत्ता दिसताच पवार सोनियांचा विदेशी मुद्दा विसरले होते आणि राज ठाकरे टाळीसाठी हात पुढे करून फिरत होते. आज मुंबई तोडण्याचा आरोप या दोन्ही मंडळींनी पुन्हा वाजवून घेतला आणि वरून कोणी आले तरीही ती तोडता येणार नाही, असा आवाज पवार साहेबांनी दिल्यावर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रादेशिक पक्षांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व दाखविण्यासाठी असले मुद्दे काढावे लागतात. मुंबई फोफावत आहे ती इथे मिळणार्‍या रोजगारामुळे. ज्या पश्चिम उपनगरांचा उल्लेख त्यांनी केला तो उल्लेख अशाच फोफावणार्‍या महानगरांचा आहे. नोएडा दिल्लीला येऊन ठेपले. सगळीच महानगरे फोफावत आहेत. मात्र, त्या ठिकाणी कुणीही ही शहरे तोडून नेण्याचे आरोप करीत नाही. मुंबईच्या बाबतीत मात्र कुठलेही राजकारण चालेनासे झाले की हा आरोप ठरलेला असतो. भाई ठाकूर, पप्पू कलानी यावर पवारांनी भाष्य केले नाही. वसई-विरार त्यांच्या हातात सोपविण्याचे काम पवारांनी केले नाही का? राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे महाराष्ट्रातले राजकीय वातावरण ढवळून निघाले नव्हते का? पवारांच्या या सपशेल चुकलेल्या राजकीय गणितांची किंमत महाराष्ट्रालाच मोजावी लागली. महाराष्ट्रात राजकीय पर्याय निर्माण झाले ते यामुळेच. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारखे सक्षम पर्याय उभे राहिले. मुलाखतीची जी काही शीर्षके दाखविली गेली, त्यात कुठे ‘शोध पवारांच्या मनाचा’, तर ‘शोध महाराष्ट्राचा’ असा होता.
 
 
शेतकर्‍यांच्या आत्महत्यांविषयी पवारांनी जे उत्तर दिले ते इतके चकवे देणारे होते की, त्याला दाद नाही. त्यांच्याच काळात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. या दोन राजकीय अतृप्त आत्म्यांनी घेतलेला ‘परस्परांचा शोध’ हे शीर्षक खरे तर या मुलाखतीला शोभले असते. एका बाजूला हनमंत गायकवाड यांचे उदाहरण मराठी तरूणांना द्यायचे आणि दुसर्‍या बाजूला मराठी तरूणांची माथी भडकविणार्‍या राज ठाकरेंकडून भविष्यातील राजकारणाच्या अपेक्षा व्यक्त करायच्या हा खेळ फक्त आणि फक्त पवारच खेळू शकतात. एकमेकांच्या पाठी खाजविण्याचा उद्योग असलेली ही मुलाखत रंगली असली तरी यांच्या विटलेल्या राजकारणामुळे लोकांवर कुठलाही परिणाम होणार नाही. ठाकरे आणि काँग्रेस व्यतिरिक्त कुठल्याही अन्य महाराष्ट्राच्या नेत्याचा यात उल्लेख नव्हता. महाराष्ट्रातून मुसंडी मारून दिल्लीच्या राजकारणावर आपला प्रभाव निर्माण करणार्‍या प्रमोद महाजनांचा उल्लेख नसलेलीही मुलाखत ‘सांस्कृतिक इव्हेंट’ नक्कीच नव्हती. जमलेली, न जमलेली राजकीय गणिते चाचपण्याचा हा एक डाव होता.
@@AUTHORINFO_V1@@