मेघालयमध्येही भाजपाचे कमळ फुलणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
त्रिपुरा विधानसभेची निवडणूक आटोपल्यावर आता सगळ्यांचे लक्ष २७ फेब्रुवारीला होणाऱ्या मेघालय आणि नागालॅण्ड विधानसभेच्या निवडणुकीकडे लागले आहे. ही तीन राज्ये मिळून विधानसभेच्या १८० जागा तर लोकसभेच्या फक्त ५ जागा आहेत. प्रत्येक राज्यात विधानसभेच्या ६० जागा आहेत. त्यामुळे या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा देशाच्या राजकारणावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही, तरीसुद्धा भाजपा, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या तीन राज्यातील निवडणुका अतिशय गांभीर्याने घेतल्या आहेत. कारण सध्या त्रिपुरात डाव्या पक्षांची, मेघालयमध्ये काँग्रेसची तर नागालॅण्डमध्ये भाजपाच्या मित्रपक्षाची सत्ता आहे. या प्रत्येकासमोर आपल्या राज्यातील सत्ता कायम ठेवत दुसऱ्याच्या राज्यातील सत्ता हिसकवण्याचे मोठे आव्हान आहे.
 
मेघालयमध्ये १५ वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. देशातील अनेक राज्यातून काँग्रेसला आपला बोऱ्याबिस्तरा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ताब्यात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी राज्ये उरली आहेत. हिमाचल प्रदेशमधील आपली सत्ता काँग्रेसने नुकतीच गमावली आहे, त्यामुळे मेघालयमधील सत्ता कायम ठेवण्याचे मोठे आव्हान काँग्रेससमोर उभे ठाकले आहे. कारण यानंतर लगेच काँग्रेसशासित कर्नाटकमध्येही विधानसभा निवडणूक आहे. ख्रिश्चनबहुल मेघालयमध्ये काँग्रेसला आपली सत्ता कायम राखता आली नाही तर त्याचा परिणाम कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या मनोधैर्यावर होणार आहे. त्यामुळे मेघालय जिंकण्यासाठी काँग्रेसने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मेघालयमध्ये रोड शो करत आहे.
 
काँग्रेस राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ६० जागा लढवत आहे. भाजपाने ४७ मतदारसंघात आपले उमेदवार उतरवले आहे. नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट (पीडीएफ) हे भाजपाच्या नेतृत्वातील नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्सचे (नेडा)चे सदस्य आहेत. स्थानिक राजकारणामुळे त्यांनी भाजपाशी निवडणूकपूर्व युती करण्यास नकार दिला, मात्र भाजपा आणि या पक्षांची निवडणुकीनंतर आवश्यकता पडली तर युती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २९ तर युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला (युडीएफ) ८ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने युडीएफशी आघाडी करत मेघालय युनायटेड फ्रंटच्या नावाने राज्यात सरकार स्थापन केले होते. मात्र या वेळी युडीएफनेही काँग्रेससोबत निवडणूक करण्यास नकार दिला. युडीएफने हिल स्टेट पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट (एचएसपीडीएफ) सोबत युती करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा यांचे पुत्र कोनार्ड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीनेही ५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. गारो पर्वतीय प्रदेशातील २३ मतदारसंघात संगमा यांच्या पक्षाचा प्रभाव आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा मेघालयचे होते, त्यांच्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व आहे. नंतर संगमा यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस सोडत आपला नवा पक्ष स्थापन केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील अस्तित्व कायम राहिले. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात २ जागा जिंकल्या होत्या. या वेळीही राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रिंगणात आहे.
 
१९७२ चा अपवाद वगळता आतापर्यंत झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकांत काँग्रेस राज्यात सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष राहिला आहे. आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. कॉंग्रेसचे मुकुल संगमा १५ वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अ‍ॅण्टिइन्कमबन्सी मोठ्या प्रमाणात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी उपमुख्यमंत्री लिंगडोह यांच्यासह काही आमदारांनी राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्वकाही ठीक नाही, असा संदेश गेला. विशेषत: म्हणजे याची जाणीव मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनाही झाली आहे, त्यामुळे कधी नव्हते त्यांनी या वेळी दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र यातून काँग्रेस पक्षासाठी चुकीचा संदेश जनमानसात गेला आहे.
राज्यात काँग्रेसची स्थिती अडचणीची असल्याचे काँग्रेसचे नेतेही मान्य करतात. काँग्रेसला या वेळी सर्वाधिक आशा मुख्यमंत्री मुकुल संगमा आणि मतविभागणीतून आहे. भाजपा, संगमा यांची नॅशनल पीपल्स पार्टी आणि प्रादेशिक पक्षांच्या दोन-तीन आघाड्या यात होणाऱ्या मतविभागणीचा फायदा आपल्याला मिळेल, अशी काँग्रेसला आशा आहे. मुख्यमंत्री संगमा यांनी याआधी अनेक वेळा काँग्रेसला संकटातून बाहेर काढले, तसे ते या वेळीही काढतील, अशी काँग्रेसला आशा आहे.
 
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासूनच मेघालयसह ईशान्य भारतातील अन्य राज्यातून काँग्रेसची घसरण सुरू झाली. ईशान्य भारतातील लोकसभेच्या २५ पैकी १३ जागा काँग्रेसने २००९ मध्ये जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये काँग्रेसला फक्त ८ जागा जिंकता आल्या.
 
राज्यात १९९८ चा अपवाद वगळता भाजपाला कधीच आपले खाते उघडता आले नाही. १९९८ मध्ये भाजपाचे ३ आमदार विजयी झाले होते. २०१३ मध्ये तर भाजपाला एकही जागा मिळाली नव्हती. आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाने सरकार स्थापन केल्यामुळे भाजपाचा उत्साह बळावला आहे. त्यामुळे त्रिपुरा, मेघालय आणि नागालॅण्डमध्ये भाजपाला खूप अपेक्षा आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपली पूर्ण ताकद मेघालयमध्ये लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभाही मेघालयमध्ये भाजपाने घेतल्या आहेत. शाह यांनी भाजपासाठी मिशन ४० दिले आहे. भाजपाने मेघालयसाठी व्हिजन डॉक्युमेंट जारी केले आहे. त्यात सरकारी कर्मचाऱ्याना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तिवेतन देण्याची घोषणा केली आहे.
 
१५ वर्षांपासून काँग्रेसचे मुकुल संगमा राज्याचे मुख्यमंत्री असले तरी त्यांनी राज्यात विकासाचे कोणतेच काम केले नाही. मेघालयाची गणना आजही देशातील सर्वांत गरीब राज्य म्हणून होते. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या यादीत मेघालयचा क्रमांक खालून आठवा आहे. यावरून मेघालयच्या स्थितीची कल्पना करता येते. राज्यात एकही सरकारी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालय नाही, त्यामुळे उच्च शिक्षणासाठी येथील मुलांना अन्य राज्यात जावे लागते. रोजगाराच्या संधीचाही राज्यात अभाव आहे. राज्यात रस्ते आणि रेल्वेसारख्या पायाभूत सुविधांचीही वानवा आहे.
 
पंतप्रधान मोदी यांची विकासाभिमुख प्रतिमा आणि लोकप्रियता ही भाजपाची जमेची बाजू आहे. भाजपाचा पूर्ण भर विकासाच्या मुद्यावर आहे. मुकुल संगमा यांच्या कार्यकाळात राज्याला विकासापासून वंचित राहावे लागले, असा आरोप अमित शाह आणि अन्य भाजपा नेते करत आहेत. राज्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरही भाजपा आक्रमक आहे. भाजपाचा भर प्रामुख्याने युवा मतदारांवर आहे. राज्यात युवा मतदारांची संख्या १ लाख आहे. त्यातही ४५ हजार तरुण पहिल्यांदाच आपला मताधिकार बजावणार आहेत. विकासाच्या मुद्यावर युवा मतदार भाजपासोबत आहे, त्याचा फायदाही भाजपाला मिळू शकतो.
वाजपेयी सरकारच्या काळात काही प्रमाणात विकासाची कामे मेघालयमध्ये झाली होती. मोदी सरकार आल्यापासून मेघालयच्या विकासावर भर देण्यात आला. राज्यात रेल्वेची तसेच महामार्गाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. याचा फायदा या वेळी भाजपाला मिळण्याची आणि राज्यात भाजपाचे कमळ फुलण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७
@@AUTHORINFO_V1@@