नशीब! यंदा लक्तरे फाटली नाहीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |


 

  
 
सक्षम आणि निकोप अशा पर्यायी साहित्य संमेलनाचे आयोजन हाच आता एकमेव पर्याय उरला आहे. नव्या उमेदीच्या लेखकांची मोट बांधून यासाठी उभे राहावे लागेल.


९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात पार पडले. डॉ. लक्ष्मीकांत देशमुख या संमेलनाचे निवडून आलेले अध्यक्ष होते. लक्ष्मीकांत देशमुखांची जी काही साहित्यनिर्मिती आहे तिच्या आधारावर ते ‘साहित्यिक’ म्हणून ओळखले जातात. गेली काही वर्षे साहित्य संमेलने त्यातल्या साहित्यिक चर्चांपेक्षा त्यातील वाद-विवादांमुळेच अधिक गाजली आहेत. यंदाही साहित्य संमेलन त्याला जागले. ज्यांना साहित्य संमेलनाविषयी कणव आहे, त्यांनी हल्ली साहित्य संमेलनात काय दर्जेदार ऐकायला मिळेल यापेक्षा ते कसे पार पडेल याचीच अधिक चिंता असते. साहित्य संमेलनातल्या वादांची नांदी खरेतर यापूर्वीच झाली होती. निमंत्रितांनी साहित्य परिषदेला येण्यासाठी मानधन मागू नये,अशी मागणीच पदाधिकार्‍यांनी केली होती. यातून जी नाराजी निर्माण झाली त्यातून कितीतरी उत्तम साहित्यिकांनी या संमेलनाकडे पाठ फिरविल्याचे लक्षात आले. यापेक्षा मोठा वाद झाला तो विद्यमान अध्यक्षांच्या भाषणामुळे. ‘‘राजा तू चुकतो आहेस,’’ असे एक मोघम विधान लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. आपण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहोत. त्यामुळे काहीतरी खणखणीत विधान केले पाहिजे, हा त्यांचा पवित्रा संमेलन संपल्यावर पूर्णपणे बदलला. ‘‘आपण सर्वच पक्षातील लोकांना संबोधून असे म्हणालो होतो,’’अशी बुळचट विधाने करीत त्यांनी भाषणावर सारवासारव केली. आता देशमुख ठरले माजी सनदी अधिकारी. या मंडळींचे कधी, कसे आणि काय बाहेर पडेल हे काही सांगता येत नाही.

 
विश्वास पाटील हे मराठीतले उत्तम कादंबरीकार. पण मागे त्यांचेच रणांगण इतके रंगले की, ते आवरता आवरता मुश्कील होऊन बसले आहे. लक्ष्मीकांत देशमुखांविषयी अशी काहीच बाब नाही ही रसिक मराठी जनांसाठी भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल. ज्या पदावर आज लक्ष्मीकांत देशमुख विराजमान झाले आहेत, तिथे कधीतरी दुर्गाबाई भागवत, पु.ल. देशपांडे यांसारखे दिग्गज लोक विराजमान झाले होते. कुठल्याही दडपणाला बळी न पडता त्यांनी आपले विचार ठामपणे मांडले आणि त्यातून माघार कधीच घेतली नाही. या दोन्ही साहित्यिकांना महाराष्ट्र त्यांनी घेतलेल्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखतो. मात्र गेल्या काही वर्षात साहित्य संमेलनात ज्या गोष्टी सुरू आहेत त्या कुठल्याही रसिक मनाला वेदना देणार्‍याच आहेत. समाजात साहित्याचे स्थान दिशादर्शनाचे. मूल्य निर्मितीसाठी साहित्याची गरज मोठी असल्याचे कुणीही नाकारू शकत नाही. मात्र ज्यांनी मूल्यांची पायमल्ली करायची त्यांच्याकडून समाजाने मूल्यांची अपेक्षा कशी करायची? हाच मोठा प्रश्न आहे. साहित्य संमेलनाचे फक्त सोहळे उरले आहेत. त्यातून आता सृजनाची अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरावे.
 

याचा अर्थ मराठीत कसदार साहित्य निर्माण करणारे साहित्यिक शिल्लक नाहीत, असे मुळीच नाही. लोक आहेत, उत्तमोत्तम लोक आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अशी मंडळी आपली साहित्यनिर्मिती करीत आहेत. मात्र त्यांना या साहित्य संमेलनाच्या गचाळ राजकारणात मुळीच रस नाही. श्रीपाल सबनीस नावाच्या इसमाने महाराष्ट्रात जो काही गोंधळ उडवून दिला होता तो पाहिला तर आधीच्या साहित्य संमेलनात ज्यांनी संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले होते त्यांना लाजच वाटली असेल. नंतर वर्षभर हे महाशय सतत काहीतरी बरळतच होते. आता आता कुठे माध्यमांना त्यांच्या विदुषकी चाळ्यात रस उरलेला नसल्याने त्यांच्या बातम्या येणे बंद झाले आहे. गेल्यावर्षी अक्षयकुमार काळे अध्यक्ष झाल्यानंतर यांचे साहित्य कोणते? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी रसिकांना पुस्तकाची दुकाने गाठावी लागली होती. काहींना ती मिळालीसुद्धा परंतु साहित्याच्या प्रभावाचा आणि त्यातून समाजात घडून येणार्‍या मूल्यनिर्मितीचा प्रश्न अनुत्तरितच राहिला.

 
लक्ष्मीकांत देशमुख ज्या राजाविषयी बोलले तो नेमका कोणता? महाराष्ट्राच्या राजकारणातला त्याच्याच पित्तूनी संबोधलेला ‘जाणता राजा’ तर नाही ना असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला होता. मात्र खुद्द देशमुखांनीच या प्रश्नातली हवा काढून घेतली. ‘जाणत्या राजा’ची साहित्य वर्तुळातली ऊठबस सर्वश्रुत आहे. इथे काही फायद्याची पदे नसली तरी कितीही उद्योग केले तरीही साहेब कसे सुसंस्कृत आहेत, हे सांगणार्‍या साहित्यिकांची फौज साहेबांच्या नेहमीच कामी येते. त्यामुळे सरकार कुठलेही असले तरी साहेब ज्येष्ठ नेते म्हणून हजर असतात. इथल्याही उमेदवारांसाठी साहेब मतांची बेगमी कशी करतात याच्या कथा अत्यंत चवीने पुण्यात सांगितल्या जातात. श्रीपाल सबनीससुद्धा खाल्ल्या मिठाला जागून नुकतेच साहेबांच्या एल्गार मोर्चाला जाऊन पोहोचले होते. यंदाच्या संमेलनाध्यक्षांनी असले काही केले नाही तरी खूप झाले. मराठी साहित्य संमेलनाला लागलेल्या या राजकीय किडीला हा ‘जाणता राजाच’ जबाबदार आहे. अस्ताला चाललेल्या त्यांच्या राजकारणाप्रमाणेच साहित्य संमेलनाच्या लोकप्रियतेला व रसिकमान्यतेला आता क्षय झाला आहे. आठ–-नऊ वर्षात साहित्य संमेलनाला १०० वर्षे पूर्ण होतील. तोपर्यंत या भाषाप्रभूंनी तारांकित केलेली हे साहित्य संमेलन कसे झालेले असेल याची कल्पनाही न केलेली बरी.
 

साहित्य संमेलनासमोरचे सगळ्यात मोठे आव्हान असेल ते मुक्तमाध्यमांवर अभिव्यक्त होणार्‍या नव्या लेखकांचे. त्यांचा बाज निराळा आहे. त्यांची शैली निराळी आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी स्वत:चा असा विशिष्ट वाचकवर्ग कमावला आहे. त्यांच्यामागे छत्रचामरे घेऊन कुणीही उभे नाही. व्यासपीठावरच्या खुर्च्यांसाठीची तडफड त्यांच्यात नाही. कुणा पुढार्‍याने काही विचारले नाही तरी चालेल. त्यांचे त्यांचे उत्तम चालले आहे. त्यांचे दिवाळी अंक निघतात. त्यावर चर्चादेखील होतात. भोजनभाऊ संमेलनांना त्याचे काही घेणेदेणे नाही आणि या मंडळींनाही त्यांना हिंग लावून विचारावेसे वाटत नाही. आजच्या घडीला तुषार दामगुडे, अक्षय बिक्कड, शेफाली वैद्य, अक्षय जोग, प्रतीक कोसके अशी नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील. खरेतर आता विद्रोही, आदिवासी अशी साहित्यसंमेलने होतात तसे पर्यायी साहित्य संमेलन घेणे आवश्यक झाले आहे. त्याशिवाय ही कोंडी फोडता येणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@