तरूणांच्या जोरावरच देश महासत्ता बनणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

पुणे : आपल्या देशात सर्वाधिक संख्या ही तरूणांची आहे आणि तिच आपली मोठी शक्ती आहे. तरूणांच्याच जोरावर आपला देश महासत्ता होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे येथील सिंबायोसिस लॉ स्कूलच्‍या 'सिम्‍भव 2018' या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.


देशाला महासत्ता बनवण्यासाठी भविष्यातील बदलांना तयार रहा, मात्र आपली संस्‍कृती विसरू नका, असे आवाहन मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी केले. यावेळी सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळे, खा. अनिल शिरोळे, आ. जगदीश मुळीक, सिम्‍बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)चे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार, सिम्‍बॉयसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)च्‍या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, सिम्‍बॉयसिस लॉ स्‍कूलच्‍या संचालक डॉ. शशिकला गुर्पूर आदी उपस्थित होते.


“वसुधैव कुटुंबकम” ही आपल्या देशाची संस्कृती आहे. शिकागोमध्ये झालेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरूवात “भगिनींनो आणि बंधूंनो” अशी करून आपल्या संस्कृतीची ओळख जगाला करून दिली होती. आपल्या देशावर ग्रीक, शक, इंग्रज, पोर्तुगीज, डच, मुघल अशा अनेकांनी आक्रमणे केली. मात्र या आक्रमणानंतरही आपल्या देशाची संस्कृती टिकून असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आपल्या देशात असणाऱ्या ज्ञानामुळेच आपले जगातील स्थान टिकून आहे. अनेक नद्या एकत्र येवून ज्या प्रमाणे सुंदर समुद्र तयार होतो, त्याच प्रमाणे विविध श्रध्दा, संस्कृतींच्या मिश्रणाने आपली भारताची संस्कृती तयार झाली आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या नाविन्यपूर्ण सृजनशीलतेमुळे मोठे आर्थिक केंद्र म्हणून महाराष्ट्राचा विकास होणार आहे. भारतात तरुणांची संख्या मोठी आहे. हीच आपल्या देशाची शक्ती आहे. या लोकसंख्येला कौशल्यतेची जोड देण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून आपण आर्थिक क्षेत्रात मोठा विकास करू शकणार आहोत, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.


 
कृत्रिम बुद्धीमत्ता ही नवसंकल्पना
कृत्रिम बुध्दीमत्ता ही नवी संकल्पना जगासमोर आली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आपण पाऊल टाकले आहे. या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे भविष्याचा वेध घेणारेच पुढील काळात टिकणार आहेत. त्यामुळे भविष्यातील संधीसाठी तयार राहण्याची आवश्यकता आहे. या बदलांसाठी तयार राहण्यासाठी आपल्या कृत्रिम बुध्दीमत्ता क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. येत्या काळात न्यायिक क्षेत्रात मनुष्यबळाची मोठी आवश्यकता भासणार आहे. समाजात वाढणाऱ्या सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती असणारे कायदेतज्ज्ञ निर्माण होण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@