मी महाराष्ट्रापेक्षा देशाला महत्व दिलं : शरद पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
 
पुणे : मी नेहमी महाराष्ट्रापेक्षा देशाला महत्व दिले आहे अशी स्पष्ट माहिती राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि देशांतील मुरब्बी नेते शरद पवार यांनी दिली आहे. आज पुणे येथील बीएमसीसी महाविद्यालयाच्या पटांगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि रोखठोक राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात झालेली ही सगळ्यात मोठी आणि कुतूहल निर्माण करणारी मुलाखत ठरली असून २७ वर्षांचा ‘जनरेशन गॅप’ असून देखील एका नव्या पिढीने जुन्या पिढीची घेतलेली ही मुलाखत ठरली आहे.
 
जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी समूह यांच्या विद्यमाने ही मुलाखत आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही अभूतपूर्व मुलाखत ठरली आहे.
 
राज ठाकरे : यशवंतराव चव्हाण यांना वारसदार मानता काय? 
 
शरद पवार : हो, नक्कीच यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा सामाजिक वसा, सांस्कृतिक जाण आणि महाराष्ट्राप्रती आदर असणारा नेता वारसदार नक्कीच असू शकेल. त्यांचे वैचारिक मतभेत असले तरी देखील त्यांनी दुसऱ्यांच्या विचारांचं स्वागत केलं. 
 
 
राज ठाकरे : नेहरूंच राष्ट्रव्यापी योगदान याबद्दल तुमचे विचार? 
 
शरद पवार: जवाहरलाल नेहरू याचं देशासाठी फार मोठं योगदान आहे. त्यांनी देखील पहिले देशाचा विचार केला. मात्र त्यावेळी गांधी-नेहरू घराण्यावर व्यक्तिगत हल्ले करण्यात आले होते. नेहरूंची विचारधारा सोडली नाही मात्र, काही बाबतीत मतभेद झालेत. 
 
 
राज ठाकरे : महाराष्ट्राच्या नेत्यांनी पहिले देशाला महत्व दिले? म्हणून महाराष्ट्र मागे राहिला काय? 
 
शरद पवार : महाराष्ट्रातील नेत्यांनी पहिले देशाचाच विचार केला, तसेच मी देखील पहिले देशाचाच विचार करतो कारण जात, धर्म, वंश आणि भाषा महत्वाची असली तरी देखील प्रथम देशाच महत्वाचा आहे. मात्र महाराष्ट्राचा अभिमान नेहमीच राहील.
 
 
राज ठाकरे : मोदींनी गुजरात पेक्षा देशाकडे लक्ष द्यावे याद्द्ल तुमचे मतं? 
 
शरद पवार : आपण जेव्हा मुख्यमंत्री असतो तेव्हा आपल्यावर केवळ राज्याचा भार असतो. मात्र जेव्हा आपण देशाचे नेतृत्व करतो तेव्हा संपूर्ण देशाचा भार आपल्यावर असतो त्यामुळे प्रथम देशाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 
 
 
राज ठाकरे : मुंबई स्वतंत्र करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे काय? अहमदाबाद ते मुंबई मेट्रो निर्माण होत आहे त्या आधारावर प्रश्न? 
  
शरद पवार : मेट्रो सुरु करायची असेल तर नागपूर ते मुंबई आणि दिल्ली ते मुंबई अशी सुरु करा. वेगळ्या राज्यातील लोक मुंबईत येवून इथे स्थायिक होण्यासाठी हा कट आहे. आता मुंबईमधून तर लोक अहमदाबादला जाणार नाहीत, त्यामुळे लोकं मुंबईतच येतील या मागील उद्देश संपूर्ण देशात मुंबईला केंद्र स्थानी करायचे आणि त्या माध्यमातून तिच्यावर राज्य करायचे असा आहे.
 
 
 
 
 
 
  
राज ठाकरे : शाहू, फुले यांचा महाराष्ट्र असे म्हणतात, मग शिवाजी महाराज यांचा का नाही म्हणत? 
 
शरद पवार : शाहु, फुले, आंबेडकरांनी महाराष्ट्राला एकत्रित केलं. जात, पात, धर्म विसरून राज्याला एकत्र करणारे नेते दिले. आज त्याच विचारांची गरज आहे. महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचाच आहे, त्याबद्दल कोणालाही शंका नाही. आता सध्या जात-पात विसरून महाराष्ट्र मजबूत ठेवला पाहिजे. 
 
 
राज ठाकरे : नरेंद्र मोदींबद्दल तुमचं आधी आणि आता मत काय? 
 
शरद पवार: नरेंद्र मोदींकडे कष्ट करण्याची वृत्ती आहे. परंतु देश चालवणं आणि राज्य चालवणं यात फरक असतो. देश चालवण्यासाठी संघ लागतो. मीच करेल अशी वृत्ती नको. देश चालवायला ही वृत्ती बरी नाही. 
 
 
राज ठाकरे: काँग्रेसचं भविष्य काय आणि राहुल गांधींबाबत तुमचं मत काय?
 
शरद पवार: पूर्वीसारखी काँग्रेस आता राहिली नाही. काँग्रेसची अनेक ठिकाणी पीछेहाट होत आहे. मात्र, राहुल गांधींमध्ये बदल होत आहे. त्यांच्यात शिकण्याची वृत्ती आहे. ज्यामधलं आपल्याला समजत नाही ते समजून घेण्याचा राहुल गांधींचा सध्या प्रयत्न सुरू आहे, ही चांगली गोष्ट आहे. देशाच्या तरुण पिढीने साथ दिली आणि प्रोत्साहन दिल तर काँग्रेस टिकेल. 
 
 
राज ठाकरे: महाराष्ट्रात आधी गरिबी होती पण शेतकरी आत्महत्या करत नव्हते. आज आत्महत्येचं प्रमाण महाराष्ट्रात वाढत आहे? 
 
शरद पवार: केवळ कर्जमाफी हे उत्तर नाही तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या मालाला भाव दिला तरच परिस्थिती बदलेल. कर्जबाजारीपणा हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं मुख्य कारण आहे. मात्र त्यांना आता प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. 
 
 
या प्रकारे राज ठाकरे यांनी शरद पवार यांना महाराष्ट्रापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रश्न विचारले. राज ठाकरे यांनी त्यांना क्रिकेट, शिक्षण, राजकारण आणि घोटाळे या सगळ्यांवर प्रश्न विचारले. शेवटी त्यांनी एक ‘रॅपिट फायर’ देखील घेतला. 
 
मुलाखतीतील काही महत्वाचे मुद्दे: 

माझ्यावर ‘जनरेशन गॅप’चं मोठ प्रेशर आहे- राज ठाकरे 
 
देशात सकारात्मक राजकारण उरलेले नाही- शरद पवार 
 
मोदी यांनी गुजरात पेक्षा देशाकडे लक्ष द्यावे-राज ठाकरे 
 
पायात पाय घालायचे उद्योग बंद करा- शरद पवार 

मुंबई स्वतंत्र करण्याच षडयंत्र रचलं जात आहे- राज ठाकरे 
 
मुल्याधीष्टीत राजकारण उरले नाही-शरद पवार 
 
बाळासाहेबांचा नेहमीच आदर आहे, त्यांच्याशी राजकारणापेक्षा मित्रत्वाचे संबंध होते- शरद पवार 
 
दिल्लीत कान भरणारे बरेच लोक आहेत- शरद पवार
 
अहमदाबादला जावून काय ढोकले खायचे काय?- राज ठाकरे 
 
मराठी नेते होवू नये म्हणून दिल्लीत एक लॉबी काम करते-शरद पवार 
 
मराठी माणसाने एकत्र राहून महाराष्ट्र निर्माण करायला हवा-शरद पवार 
 
‘रॅपिट फायर’
 
इंदिरा गांधी की यशवंतराव चव्हाण 
 
उत्तर- एकाच नेतृत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्वाच आहे तर एकाच नेतृत्व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र पातळीवर महत्वाच आहे. 
शेतकरी की उद्योगपती 
 
उत्तर- शेतकरी 
 
अमराठी उद्योगपती की मराठी उद्योगपती
 
उत्तर- उद्योगपती 
 
दिल्ली की महाराष्ट्र 
 
उत्तर- दिल्ली 
 
काँग्रेस की भाजप 
  
उत्तर- काँग्रेस
 
शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न 
 
राज ठाकरे की उद्धव ठाकरे 
 
उत्तर- ठाकरे कुटुंब 
 
@@AUTHORINFO_V1@@