पालखेड कालवा बंधारे भरण्याचे आदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |

शेतकऱ्यांमध्ये उत्साह

 

 
 
नाशिक : येवला तालुक्यातील पालखेड कालवा लाभक्षेत्रातील वितरिका नंबर ४६ ते ५२ वरील संपूर्ण बंधारे जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील प्रासंगिक कोठ्यातील पाण्याने भरून देण्याचे आदेश पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना दिले आहेत.
 
वितरिका ४६ ते ५२ ला फक्त पावसाळ्यात ओव्हरफ्लोचे पाणी दिले जाते. त्यासाठीही पण शेतकर्‍यांना सततचा संघर्ष करावा लागतो. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या पाण्याकरिता बाबा डमाळे नेतृत्व करत पाणी आणतात. यावर्षी त्यांनी नागपूर, जामनेर, जळगाव, नाशिक व मुंबई अशा फेर्‍या मारत २०० शेतकर्‍यांना बरोबर घेत पालकमंत्र्यांकडे यशस्वी पाठपुरावा केला.
 
सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या समोरच पालकमंत्र्यांकडे भाजपचे नेते बाबासाहेब डमाळे यांनी तक्रार केली की, ‘‘मागील दोन वर्षे २०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानादेखील पिण्याचे पाणी दिलेले आहे. मात्र, यावर्षी ३५० दशलक्ष घनफूट प्रासंगिक कोठ्यातील शिल्लक असताना जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व अप्पर जिल्हाधिकारी रामदास खेडकर हे पाणी देण्यास नकार देतात.’’
 
ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास बाबा डमाळे यांनी आणून दिली असता पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना बजावले की, आपणास पाणी सोडता येत नसेल तर मी माझ्या अधिकारातील पाणी सोडण्याचे आदेश देत आहे, असे स्पष्ट करून महाजन म्हणाले की, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक राजेश मोरे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, कार्यकारी अभियंता राघवेंद्र भाट, पालकमंत्र्यांचे शासकीय सचिव संदीप जाधव, वैभव भागवत तुम्ही एकत्रित बसून नियोजन करा व दोन दिवसांत याबाबतचे आदेशाचे पालन करा, असा आदेश दिल्यानंतर दि. १४ व १५ फेबु्रवारी रोजी यावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन काल दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी वितरिका ४६ ते ५२ वरील सर्व बंधारे पाण्याने भरून देण्याचे पाटबंधारे अधिकार्‍यांना निर्देश दिले.
 
याबद्दल अंदरसूलपासून पूर्व भागातील शेतकर्‍यांमध्ये आनंद व उत्साह संचारला असून पालकमंत्री गिरीश महाजन व भाजपनेते बाबा डमाळे-पाटील यांच्या अभिनंदनाचे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@