शिक्षणाचीच पुनर्रचना करण्याची गरज : डॉ. माशेलकर यांचे प्रतिपादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2018
Total Views |
 

 
 

नाशिक : “तंत्रज्ञानाच्या प्रगतीने शिक्षणाचे भवितव्य काय? याचाच विचार करण्याची वेळ आली आहे. शिक्षणातून समाजाचे भवितव्य काय? याचा आतापर्यंत आपण विचार करत असताना तंत्रज्ञानाने सर्वच परिस्थिती बदलली आहे. या परिस्थितीत आपणा सर्वांसमोर शिक्षणाच्या भविष्याचा विचार करण्याची वेळ आली असल्याने भविष्यात शिक्षणाचीच पुनर्रचना करण्याची गरज आज निर्माण झाली आहे,’’ असे प्रतिपादन प्रख्यात वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
 
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतकपूर्ती सोहळ्याचा समारोप आर. एच. सपट इंजिनिअरिंग कॉलेजच्या भव्य शामियान्यात झाला. सोहळ्याच्या व्यासपीठावर संस्थेचे प्राख्यात वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, अणुवैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर, आंतरराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, उत्तरकाशीचे स्वामी जनार्दनदासजी व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. महोत्सवाची सुरुवात एसएमआरके महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी ईशस्तवन व सोसायटी गीताने झाली.
 
यावेळी डॉ. माशेलकर म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या प्रगतीने शिक्षण पद्धतीत मोठे बदल झाले आहेत. पूर्वी गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणात सर्वांना शिक्षण घेण्याची संधी नव्हती. आज तंत्रज्ञान ग्लोबल झाल्याने शिक्षण सर्वांना खुले झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. पूर्वी ज्ञानार्जनासाठी ग्रंथालय, शाळा-महाविद्यालयात पायपीट करावी लागत असे. आता मात्र सर्व काही तुमच्या हातात आहे, असे डॉ. माशेलकरांनी नमूद केले. राईट एज्युकेशनबरोबर राईट वे ऑफ एज्युकेशनचा विचार आता करावा लागणार आहे. उद्या काय होईल हे आता सांगता येत नाही. म्हणून समाज, देश आणि जगाच्या भवितव्याबरोबरच शिक्षणाची पुनर्रचना करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
यानंतर डॉ. काकोडकर म्हणाले, “शिक्षणातील विषमतेची दरी दूर करा. आपल्या देशात विषमता विविध स्वरूपात आहे. शहरी-ग्रामीण, सधन-निर्धन, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित अशा विविध दर्‍या लवकरात लवकर भरून काढण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षणसंस्थांनी प्रयत्न करावेत,’’ अशी सूचना अणू वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांनी केली. समाजातील विषमतेच्या दर्‍या भरून काढण्यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीसारख्या शिक्षणसंस्थांनी पुढाकार घेऊन देश आणि जगाला एक नवीन मॉडेल द्यावे, अशी सूचना डॉ. काकोडकर यांनी केली. शहरी-ग्रामीण अशी दरी निर्माण होऊ नये म्हणून नवे तंत्रज्ञान ग्रामीण भागात उशिरा पोहोचता कामा नये, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याची सूचना त्यांनी केली.
 
या समारोपप्रसंगी प्रसिद्ध लेखिका इंद्रायणी सावकार, चारुदत्त आफळेंनी मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर सात दिवस कीर्तनमाला चालविणारे चारुदत्त आफळे यांना उत्तर काशीचे स्वामी जनार्दनानंद यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य जनतेच्या हितासाठीच नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी होते. अखिल हिंदू संस्कृती, परंपरा यासाठी स्वराज्य स्थापन करण्यात आले. म्हणूनच,रयतेचे हितरक्षण, संस्कृती रक्षण यासाठीचे राज्य म्हणजे रामचंद्रांच्या आयोध्येतील सिंहासनानंतर भव्य सिंहासन शिवरायांचे होते, असे आंतरराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे महाराज यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@