बोलीभाषांच्या विनाशातून संस्कृतीचाही विनाश...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2018
Total Views |
 
 
 
बोलीभाषांत साहित्यनिर्मितीही झालेली असते. ऐतिहासिक घटना, कथा, लोकगीते, म्हणी, कविता या स्वरूपात ते साहित्य पुढे चाललेले असते. पण, अशा भाषेचा शेवट झाला की, ती भाषा ज्या समाजात बोलली जाई, त्या समाजाच्या संस्कृतीचाही विनाश होतो. कारण, भाषा ही त्या समाजाची, त्यांच्या संस्कृतीची ओळख, अस्मिता बनलेली असते. त्यामुळे त्या भाषेचा शेवट विशिष्ट समाजगटाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरेचाच शेवट ठरतो.
 
देशातील सुमारे ४२ बोलीभाषा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे धक्कादायक वास्तव केंद्रीय गृहमंत्रालयातील अधिकार्‍यांनी नुकतेच उघड केले. सध्या १० हजारांपेक्षा कमी लोक या भाषा बोलत असून त्या लवकरच लुप्त होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. यामध्ये महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात काही हजारांच्या संख्येत बोलत असलेल्या ‘निहाली’ या भाषेचाही समावेश आहे. ‘‘एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ती व्यक्ती आपल्या अस्तित्वाच्या अनेक खाणाखुणा मागे ठेवते. वस्तू, घरदार, जमीनजुमला. पण, एखाद्या बोलीभाषेच्या शेवटानंतर मात्र कोणतीही चिन्हे तिच्या माघारी उरत नाहीत. जणू ती अस्तित्वातच नव्हती, अशी स्थिती निर्माण होते!’’ भाषातज्ज्ञ डेव्हिड क्रिस्टल यांचे हे शब्द बोलीभाषांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. कारण, एखादी भाषा नष्ट वा मृत होते म्हणजे नेमके काय होते? विशिष्ट भाषा बोलणार्‍या एखाद्या समाजगटातील शेवटची व्यक्ती मरण पावल्यावर ती भाषादेखील संपते. पण, भाषातज्ज्ञांच्या मते, विशिष्ट भाषा बोलणारी एखादीच व्यक्ती जिवंत असली तरीही ती भाषा मृतच झालेली असते. कारण, भाषा ही संवादाचे, संपर्काचे साधन असते आणि एखादीच व्यक्ती ती भाषा बोलत असेल तर त्या एका व्यक्तीने त्याच्या बोलीभाषेत नेमका संवाद साधायचा तरी कोणाशी? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रोजच्या व्यवहारात या भाषेचा वापर न झाल्याने ती भाषा आपोआपच मृत होते. शिवाय, बरेचदा अशा भाषांना स्वतःची लिपीदेखील नसते. केवळ मौखिक परंपरेच्या आधारे त्या भाषा पिढ्यान्‌पिढ्या बोलल्या जातात. या बोलीभाषांत साहित्यनिर्मितीही झालेली असते. ऐतिहासिक घटना, कथा, लोकगीते, म्हणी, कविता या स्वरूपात ते साहित्य पुढे चाललेले असते. पण, अशा भाषेचा शेवट झाला की, ती भाषा ज्या समाजात बोलली जाई, त्या समाजाच्या संस्कृतीचाही विनाश होतो. कारण, भाषा ही त्या समाजाची, त्यांच्या संस्कृतीची ओळख, अस्मिता बनलेली असते. त्यामुळे त्या भाषेचा शेवट विशिष्ट समाजगटाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरेचाच शेवट ठरतो.
 
 
भाषा म्हणजे नेमके काय? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे, प्राणी आणि मानव समूह करून राहतात, त्यामध्ये परस्परांशी संपर्क साधायला, संवादाला, एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवायला जे माध्यम वापरले जाते, ते माध्यम म्हणजे ‘भाषा’ असे म्हणता येईल. त्यात हावभाव, कृती, ध्वनी या सर्वांचा समावेश होतो. या सर्वांत अभिव्यक्तीसाठी ‘बोलीभाषा’ ही अधिक जवळची मानली जाते. एकाच भाषेतील उच्चार, अर्थ, लहेजाच्या दृष्टीने वेगळी, वापरण्यास, अभिव्यक्त होण्यास सहज, सोपी, सुटसुटीत भाषा म्हणजे बोलीभाषा, असे आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. भारतात तर प्रत्येक पाच मैलावर भाषा बदलते, असे म्हणतात. म्हणजेच आता महाराष्ट्रापुरता विचार केल्यास संपूर्ण राज्यात मराठी ही एकच भाषा बोलली जात असली तरी बोलीभाषेनुसार तिचे पुन्हा आणखी उपप्रकार पडतात. त्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, वर्‍हाड, खानदेश, सीमाभाग, विदर्भ या एकाच मराठी भाषिक प्रदेशातील विविध बोलींचा समावेश होतो. जसे की, कोल्हापुरी, अहिराणी, कोकणी, वर्‍हाडी, नागुपरी, मालवणी, तावडी, चंदगडी, देहवाली, गोंड, आगरी या बोलीभाषा. बोलीभाषांत बर्‍याचदा एका प्रदेशातील काही शब्दांचा उच्चार, अर्थ, आशय निराळे असतात, तर दुसर्‍या प्रदेशात त्याच शब्दांचा उच्चार, अर्थ, आशय निराळे असतात, त्यांचा लहेजा निराळा असतो. पण, या सर्वच बोलीभाषांना ‘मराठी’ म्हणूनच संबोधले जाते. पुन्हा इथे आणखी एक मुद्दा पुढे केला जातो, तो म्हणजे बोलीभाषा आणि प्रमाणभाषा. बर्‍याचवेळा बोलीभाषेऐवजी प्रमाणभाषेचा आग्रह धरला जातो. कधीकधी बोलीभाषा बोलणार्‍यांना सामाजिकदृष्ट्या मागासही ठरवले जाते, पण त्या विशिष्ट समाजाची बोलीभाषा हीच अभिव्यक्त होण्याची सर्वात सोपी आणि अर्थपूर्ण पद्धती असेल, तर त्यांना त्याच भाषेत अभिव्यक्त होऊ देणे गरजेचे असते; अन्यथा त्या भाषेचा शेवट त्या समाजाच्या संस्कृतीचा आणि इतिहासाचाही शेवट ठरू शकतो.
 
भारतात इंग्रजी भाषेच्या आक्रमणामुळे इथल्या मूळ भाषांवर गंडांतर आल्याचे नेहमीच बोलले जाते. जे खरेही आहेच, पण इथे फक्त इंग्रजीचेच आक्रमण झाले किंवा होत आहे, असे नाही. इंग्रजीबरोबरच हिंदीचेही भारतीय भाषांवर आक्रमण होतेच आहे. यात बोलीभाषांवरील आक्रमणाचाही समावेश आहे. उत्तर भारताला नेहमीच ‘हिंदी भाषिक पट्टा’ असे संबोधले जाते. पण, इथेही मैथिली, अवधी, भोजपुरी, संथाळी यासारख्या ३० बोलीभाषा बोलल्या जातात. ज्यांचा वापर हिंदीमुळे संकोचत चालला आहे. याकडेही लक्ष दिले पाहिजे. भाषेबद्दल असे चित्र असले तरी आता तरुण पिढी आपल्या भाषांच्या संवर्धन आणि जतनासाठी पुढे येताना दिसते. शिक्षणामुळे जागृत झालेल्या वनवासी समाजातील तरुणांनी आपल्या भाषांच्या जतनासाठी प्रयत्न सुरू केलेत. आपणच आपली भाषा शिकलो नाही तर आपल्या अस्तिवावर, ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशी भीती त्यांना सतावतेय, त्यामुळेच ते पुन्हा आपल्या भाषिक मुळांकडे वळले आहेत. भाषांच्या अस्तित्वासाठी सरकारी पातळीवरही काही उपक्रम, कार्यक्रम, उपाय योजलेले दिसून येतात. व्याकरण, एकभाषक व द्विभाषक शब्दकोश, वर्णमाला, लोककथा संपादन, विश्वकोश निर्मितीच्या माध्यमातून बोलीभाषांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतातली सर्वात जुनी भाषा म्हणजे संस्कृत. गेल्या काही वर्षांत निरनिराळ्या पातळ्यांवर संस्कृतच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे संस्कृतबद्दल सर्वसामान्यांत रुची, आस्था, कुतूहल निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे काही काळापूर्वी ‘मृत’ म्हटली जाणारी संस्कृत आज मोठ्या प्रमाणात अभ्यासली जाणारी भाषा ठरली आहे. शिवाय एखाद्या बोलीभाषेचे अस्तित्व आणि भवितव्य संबंधित समाजगटाच्या भावनेवरही अवलंबून असते. भाषेविषयीची भावना जितकी दृढ, तितकी तिच्या संवर्धनाची ओढ लागते. भाषिक अस्मिता जितकी टोकदार तितकी तिच्या जतनासाठी प्रयत्न करण्याची पराकाष्ठा केली जाते. यात आणखी एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे लिपी. बहुसंख्य बोलीभाषांना लिपी नसते, त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. अशा भाषांसाठी लिपी म्हणून देवनागरीचा विचार करता येईल. कारण ती समजायला आणि लिहायलाही सोपी आहे. सोबतच निरनिराळ्या बोलीभाषांच्या जतनासाठी वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिकांत नियमित लिखाण, सदरेही चालवली जाऊ शकतील. बोलीभाषांच्या वार्षिक संमेलनांचेही आयोजनही करता येईल. ज्यामुळे आपल्या भाषा आपणच अधिक चांगल्या प्रकारे संवर्धित करू शकू.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@