प्रकल्पांच्या देखरेखीसाठी मुख्यमंत्री वॉर रुम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2018
Total Views |



२१ प्रकल्पांवर थेट देखरेख ठेवली जाणार

मुंबई : मुंबईतील प्रकल्पांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वॉर रूमची सुरूवात केली आहे. यामध्ये २१ प्रकल्पांवर सूक्ष्म देखरेख आणि प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही याद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांनी दिली. आगामी काळात हे प्रकल्प डॅशबोर्डवर घेतले जाणार असल्याचेही ते म्हणाले.


महाराष्ट्राने फिनटेक पॉलिसी तयार केली आहे. या धोरणामुळे ३०० नवे स्टार्टअप्स या क्षेत्रात सुरू झाले असल्याचे धवसे म्हणाले. यावेळी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, कोटक इंडस्ट्रीजचे उदय कोटक, मधुर देवरा, लिओ पुरी, शिखा शर्मा, टी. रामचंद्रन आणि संदीप गुरुमुर्थी आदी मान्यवर उपस्थित होते.


मुंबईचा आगामी विकास आराखडा पुढील दशकासाठी दिशादर्शक
मुंबई ही देशाची आर्थिक, सांस्कृतिक राजधानी आहे. नव्याने सुरु होत असलेले वेगवेगळे प्रकल्प, निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा मुंबईच्या गतिमान विकासासाठी महत्वाच्या आहेत. मुंबईचा विकास आराखडा तयार करण्यात येत असून तो पुढील दशकासाठी दिशादर्शक असेल, असे मत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केले. नवीन विकास आराखड्यामध्ये मुंबईतल्या प्रत्येक बाबींचा अभ्यास करण्यात आला आहे. आगामी काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देणे यावर राज्य शासनाचा भर असणार आहे. आज मुंबई शहरामध्ये विविध ठिकाणी पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@