त्रिपुरातील डाव्यांचा गड ढासळणार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2018   
Total Views |


 
देशात एकीकडे, घोटाळ्यांवरून राजकीय पक्ष एकमेकांवर खापर फोडण्यात, चिखलफेक करण्यात, मोदी सरकारची बदनामी करण्यात गर्क आहेत. सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. त्यामुळे काहीशा उपेक्षित राहिलेल्या त्रिपुरातील आणि अन्यत्रच्या निवडणुकांवर प्रकाश टाकण्यासाठी हा लेखनप्रपंच !
 
देशात सर्वत्र नीरव मोदी याने केलेल्या ११ हजार ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चर्चा चालू असतानाच, त्याच दरम्यान त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांत निवडणुकीची धामधूम चालू आहे. त्यातील त्रिपुरा या राज्यातील मतदान रविवारी, १८ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. त्रिपुरामध्ये गेली २५ वर्षे मार्क्सवादी पक्षाचे सरकार असून त्या सरकारपुढे भारतीय जनता पक्षाने जोरदार आव्हान उभे केले आहे. ‘सर्वात गरीब मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा असलेल्या माणिक सरकार यांच्या कारकीर्दीतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने मार्क्सवाद्यांच्या नाकात अक्षरशः दम आणला होता. माणिकबाबू आणि त्यांच्या मार्क्सवादी राजवटीचे कारनामे जनतेसमोर उघड करून भाजपने जनतेला ’चलो पलटाई’ (चला, परिवर्तन घडवूया!) असे आवाहन केले होते. भाजपच्या या आवाहनास जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत होता, हे त्या राज्यात होणार्‍या भाजपच्या सभा, मिरवणुका यावरून लक्षात येत होते. त्रिपुरामध्ये परिवर्तन घडवायचेच, असा ध्यास घेऊन कार्यकर्ते झटून कामकरीत होते. भाजपचे त्या राज्याचे प्रभारी सुनील देवधर, प्रदेशाध्यक्ष बिपल्बकुमार देव यांच्यासह राज्यातील नेते, कार्यकर्ते यांनी प्रचारादरम्यान त्रिपुरा ढवळून काढला.
 
भाजप अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह आदी केंद्रीय नेत्यांनी घेतलेल्या सभांना झालेली अलोट गर्दी पाहता माणिक सरकार यांचे आणि मार्क्सवादी राजवटीचे काही खरे नाही, याचे प्रत्यंतर येण्यास आरंभ झाला होता. त्रिपुरामध्ये गेली २५ वर्षे मार्क्सवादी राजवट आहे. त्रिपुरात आतापर्यंत मार्क्सवाद्यांनंतर काँग्रेसचा प्रभाव होता, पण आता तशी अवस्था राहिलेली नाही. आता भाजपने मार्क्सवाद्यांना आव्हान दिले असून काँग्रेस मागे फेकली गेली आहे. माणिक सरकार जरी, पुन्हा ‘आपणच सत्तेवर येऊ,’ असे म्हणत असले तरी तेथील वातावरण बदलले असल्याचे दिसून येत आहे. माणिक सरकार ’मिस्टर क्लीन’ म्हणून ओळखले जात असले तरी त्यांच्या या प्रतिमेचा फुगा गृहमंत्री राजनाथसिंह यांनी टाचणी लावून फोडून टाकला आहे. माणिक सरकार यांची तुलना त्यांनी, विविध घोटाळे झाले तरी त्याबाबत मौन बाळगणार्‍या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी केली आहे. राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे दुर्लक्ष करून माणिक सरकार गप्प का बसत आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून, या ‘मिस्टर क्लीन’चा बुरखा त्यांनी प्रचारादरम्यान फाडला होता. आपल्या राजवटीत भ्रष्टाचार होत असताना, डोळे मिटून बसणारा मुख्यमंत्री प्रामाणिक कसा म्हणता येईल, असा प्रश्नही राजनाथसिंह यांनी उपस्थित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सभा ८ फेब्रुवारी रोजी आगरतळापासून ८० किलोमीटर अंतरावरील सोनामुरा येथे झाली. या प्रचारसभेत त्यांनी माणिक सरकारचे चांगलेच वाभाडे काढले. ‘‘त्रिपुराला आता कोणतेही ‘माणिक’ नको आहे, तर राज्यास ‘हिरा’ हवा आहे,’’ असे ते म्हणाले. हिरा म्हणजे हायवेज, आय-वेज, रोडवेज आणि एअरवेज यांची गरज असल्याचे त्याची फोड करताना त्यांनी स्पष्ट केले.
 
माणिक सरकार एवढी वर्षे मुख्यमंत्रिपदी असले तरी त्यांचे सरकार हे राज्यातील ३७ लाख जनतेचे मुळीच वाटत नाही. हे सरकार फक्त मार्क्सवादी कार्यकर्त्यांसाठीच असल्यासारखे वागत असल्याची टीका प्रचारादरम्यान प्रदेशाध्यक्ष बिप्लबकुमार देव यांनी केली. निवडणूक प्रचारादरम्यान भाजप विकासाच्या मुद्द्यावर भर देत होता, तर मार्क्सवाद्यांचे आपले नेहमीचेच तुणतुणे वाजत होते. साम्यवादी सरकार प्रतिक्रियावाद्यांना एखाद्या कुसळासारखे टोचत असल्याने ते या सरकारविरुद्ध कटकारस्थान करीत असल्याचा आरोप त्या पक्षाकडून करण्यात आला. अतिरेकी तत्त्वांना राज्यातील शांतता बिघडवायची आहे आणि सरकार अस्थिर करावयाचे आहे, असा आरोपही करण्यात आला. असे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असेच म्हणावे लागेल. माणिक सरकार ‘गरीब मुख्यमंत्री’ म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी राज्यही गरीबच ठेवले, ते श्रीमंत करण्याचा प्रयत्न त्या सरकारने केल्याचे दिसून आले नाही. जनतेने २५ वर्षे मार्क्सवादी राजवटीचा अनुभव घेतला आहे. आता भाजपला एक संधी द्यावी, असे आवाहन राजनाथसिंह यांनी त्रिपुरातील जनतेला प्रचारादरम्यान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह, राजनाथसिंह, अरुण जेटली, योगी आदित्यनाथ आदींच्या त्रिपुरात सभा झाल्या, तर माणिक सरकार यांनी २३ जानेवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान राज्यात ५० सभा घेतल्या. त्रिपुरात निवडणुकीच्या दिवशी मतदानही चांगले म्हणजे ७९ टक्के झाले. निवडणूक रिंगणात उतरलेल्या २९२ उमेदवारांमध्ये २३ महिला उमेदवार होत्या. एका उमेदवाराचे निधन झाल्याने ६० पैकी ५९ जागांसाठी मतदान झाले. त्रिपुरामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांसाठी चांगले मतदान होत असल्याचा इतिहास आहे. विधानसभेसाठी २००८ आणि २०१३ साली अनुक्रमे ९१.२२ आणि ९१.८२ टक्के मतदान झाले होते, तर लोकसभेसाठी २००९ आणि २०१४ साली अनुक्रमे ८४.५५ आणि ८४.९२ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान कमी झाले, असे मानावे लागेल. मतदान झाल्यानंतर सत्ताधारी मार्क्सवादी नेत्यांकडून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबद्दल शंकाकुशंका उपस्थित करण्यास सुरुवात झाली आहे. पराभवाची कारणे शोधण्यास आत्तापासूनच सुरुवात झाली आहे, असे या शंकांवरून वाटू लागले आहे.
 
अन्य राज्यांतही निवडणुका -
 
त्रिपुराप्रमाणेच मेघालय आणि नागलँड या राज्यात २७ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. नागालँडमध्ये चर्चने भाजप आणि संघास विरोध करण्याची भूमिका उघडपणे घेतली आहे. या राज्यांचे निकाल कसे लागतात, हे येत्या ३ मार्च रोजी स्पष्ट होणार आहे. या निवडणुकांप्रमाणेच मध्य प्रदेशात येत्या २४ फेब्रुवारी रोजी दोन पोटनिवडणुका होत आहेत. मुन्गावली आणि कोलारास या मतदार संघात ही निवडणूक होत आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांचे निधन झाल्याने या पोटनिवडणुका होत आहेत. हे दोन्ही विधानसभा मतदार संघ ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गुणा या लोकसभा मतदार संघात येतात. ज्योतिरादित्य शिंदे यांनी या जागा प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. या पोटनिवडणुकांपासून राज्यात भाजपच्या पराभवास प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. मध्य प्रदेशात याच वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. मध्य प्रदेशात भाजपला पराभूत करण्याचा निर्धार त्यांनी केला असला तरी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, यशोधरा राजे यांच्यासह राज्यातील अन्य नेते त्यांचे हे मनसुबे धुळीत मिळविण्यासाठी कार्यरत आहेत. मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकाचे निकाल २८ फेब्रुवारी रोजी लागणार आहेत. त्यावेळी काय होणार हे लवकरच दिसून येईल.
 
 
 
- दत्ता पंचवाघ 
 
@@AUTHORINFO_V1@@