’सहज बिजली’चा लाभ परिमंडलातील ५८ हजार कुटुंबांना मिळणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Feb-2018
Total Views |

दुर्गम भागात सौरउर्जेचा उपयोग

 

 
नाशिक : केंद्र सरकारच्या ’सहज बिजली’ योजनेंतर्गत नाशिक परिमंडळात या योजनेचा आराखडा अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यातील जवळपास ५८ हजार कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 
ग्रामीण व शहरी भागातील एकही घर विना वीजजोडणी राहणार नाही, याची दक्षता ‘सौभाग्य’ योजनेतून घेण्यात येणार आहे. याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेतून गोरगरिबांना (दारिद्य्र रेषेखालील कुटुंब) मोफत वीजजोडणीसोबतच एक एलईडी बल्ब आणि एक पिनपॉईंट फिटिंग विनाशुल्क करून देण्यात येणार आहे तर वीजजोडणीपासून वंचित असलेल्या इतर नागरिकांना (दारिद्य्र रेषेवरील कुटुंब) अवघ्या ५०० रुपयांमध्ये वीजजोडणी मिळणार आहे. हे शुल्कही नियमित वीज बिलासोबत दहा समान हप्त्यांत भरावयाचे आहे. आतापर्यंत विद्युतीकरण न झालेल्या देशभरातील चार कोटी ग्राहकांच्या घरापर्यंत वीज पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली असून त्यासाठी १६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
 
अतिदुर्गम भागातील घरांचे विद्युतीकरण करण्यासाठी सौरऊर्जेचा उपयोग करण्यात येणार आहे. नाशिक परिमंडळात कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक सतीश करपे आणि मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता, सुनील पावडे यांच्या हस्ते नुकताच योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते सुरगाणा तालुक्यातील आदिवासीबहुल हनुमंतमाळ व सुभाषनगर येथील विद्युतीकरणापासून वंचित असलेल्या कुटुंबीयांना वीजजोडणी देण्यात आली. यावेळी नाशिक ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता अनंत झोले, सहायक अभियंता एन. आर. भोर, व्ही. टी. वाझे यांच्यासह लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
 
दारिद्य्र रेषेखालील २५ हजार कुटुंबीयांना विनाशुल्क तर दारिद्य्र रेषेवरील ३३ हजार कुटुंबीयांना नाममात्र शुल्क भरून वीजजोडणी मिळविता येणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@