संघविरोधाचे विखारी तुणतुणे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |
सभोवतालच्या लोकांच्या बदललेल्या वागण्यातून तुमच्या ताकदीचा अंदाज येतो. अकारण ईष्र्या, हेतुपुरस्सर बदनामी, विरोधात शिजणारा राजकारणाचा कट, विरोधात उभे ठाकणारे हवशा-नवशांचे कडबोळे... या साèयाच बाबी तुमच्या शक्तीचा अंदाज, त्यांना आला असल्याचे वास्तव सांगून जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो की भारतीय जनता पार्टी, सरसंघचालक असोत की पंतप्रधान... सदर्हू बाब स्पष्ट व्हायला ही उदाहरणे पुरेशी आहेत. संधी गवसली रे गवसली, की त्याचे ‘सोने करण्याच्या’ इराद्याने पेटून उठलेला हा समुदाय, संघ आणि भाजपाविरुद्ध ज्या त्वेषाने चवताळून उठतो, नको ते बरळतो, ते बघितल्यावर विरोधकांचा पोटशूळ पुरेसा स्पष्ट होऊन जातो.
 
विरोधाच्या या षडयत्रांचे धनी होताना, आपण अनपेक्षितपणे नीच पातळी गाठत असल्याची लाज बाळगण्याचीही मग गरज वाटत नाही इथे कुणालाच. इतरांनी बोललेल्या विधानांचे आपल्याला हवे तसे अर्थ काढायचे, सोशल मीडियावरून ते स्वत:च व्हायरल करायचे. आपल्याला हव्या तशा प्रतिक्रिया त्यावर नोंदवायच्या, त्या नोंदवताना त्याच्याशी आपला संबंध असण्याची, त्या विषयावरचा आपला अभ्यास सखोल असण्याची गरजच काय? उद्धृत विधान आणि प्रसृत माहितीची खात्री करून घेण्याची आवश्यकता तर खुद्द प्रसारमाध्यमांनाही वाटत नाही अलीकडे! अशात, कुठल्याशा विचारांच्या पखाली वाहण्यात धन्यता मानणाऱ्याना तर ती जाणवण्याचे कारणच नाही! लोकशाहीव्यवस्थेने बहाल केलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचा अधिकार प्राप्त झालेले सुबुद्ध नागरिक आहेत ना ते! केलेल्या निंदा-नालस्तीतून कुणाची अब्रू गेली, तरी त्याची जराशी खंत बाळगण्याचीही गरज उरत नाही त्यांच्या लेखी. उलट, तोच हेतू साध्य करण्यासाठी सरसावलेल्या दिसताहेत काही टवाळखोरांच्या टोळक्या सध्या. केंद्र आणि वेगवेगळ्या राज्यांत भाजपाची सत्ता प्रस्थापित झाल्याने त्यांचे पित्त अचानक खवळले आहे. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या रा. स्व. संघाने गेल्या नऊ दशकांत त्याग, बलिदान आणि साधनेतून निर्माण केलेल्या शक्तीचे कौतुक करायला लागणारे नैतिक बळ विरोध करणाऱ्याकडे नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, कशाचीही आशा न ठेवता, राजकीय सत्तेची अपेक्षा न बाळगता, संपूर्ण समाजाची मोट बांधण्याचे उद्दिष्ट साध्य करायला राष्ट्रभक्तीने प्रेरित कार्यकत्र्यांची फळी घराबाहेर पडते, कित्येक कार्यकर्ते त्या यज्ञात स्वत:च्या आयुष्याची समिधा अर्पण करायला सरसावतात, ‘परम् वैभवम् नेतुमे तत् स्वराष्ट्र’चे स्वप्न साकार करण्यासाठी कित्येक पिढ्या नि:स्वार्थपणे घरादारावर तुळशीपत्र ठेवून झिजल्या, कारागृहात गेल्या, निंदा-नालस्ती सहन केली, सामाजिक उपेक्षा अनुभवली, विरोध पत्करला, त्या संघटनेचे मोठेपण मान्य करायला अन् स्वीकारायला धारिष्ट्य लागते. ते आहे कुणाजवळ? इथेतर लोकशाहीच्या नुसत्याच गप्पा हाकणाऱ्या शहाण्यांची गर्दी जमली आहे. त्यांना, संघाचे उद्देश, त्याचे कार्य, तपश्चर्येतून साकारलेले त्याचे आजचे स्वरूप, आज दृश्यस्वरूपात दिसत असलेली त्याची शक्ती, याच्याशी काहीएक घेणेदेणे नाही.
 
त्यासंदर्भातील वास्तव स्वीकारण्याचीही कुणाची तयारी नाही. उलट जमेल तिथे, शक्य तितकी या शिस्तबद्ध संघटनशक्तीची बदनामी करण्याच्या उद्देशानेच झपाटलेले दिसाहेत लोक. त्यासाठी एकत्र येताहेत दीडशहाण्यांची बांडगुळं! सरसंघचालकांची खिल्ली उडविली की, मर्दुमकी गाजविल्याचा आविर्भाव जागतो त्यांच्या मनात. अतिशय खालच्या स्तरावर जाऊन पंतप्रधानांचा पाणउतारा करण्यात आसुरी आनंद मिळतो त्यांना. वैचारिक मतभेदांची वस्तुस्थिती मान्यच आहे. एकवेळ राजकीय विरोधही मान्य होईल. पण, त्यालाही विशिष्ट उंची असावी की नको? की रसातळाला जाऊनच तो व्यक्त व सिद्ध होतो, असा समज झालाय् या लोकांचा? परवा बिहारमधील स्वयंसेवकांच्या एका एकत्रीकरणात उपस्थित स्वयंसेवकांना संघाची ताकद समजावून सांगताना, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेल्या विधानाचा, यावेळी त्यांनी उद्धृत केलेल्या उदाहरणांचा किती बाऊ अन् किती विपर्यास करायचा विरोधकांनी? अर्थाचा अनर्थ करण्यालाही काही मर्यादा असावी की नाही? की दर वेळी नीचांक गाठण्याचा विडाच उचलला आहे इथे सर्वांनी? ‘‘तशीच परिस्थिती उद्भवली तर समाजाला तयार करण्यासाठी सैन्याला जो वेळ लागू शकतो, त्यापेक्षा संघाला अगदीच कमी वेळ लागेल.’ इतक्या स्पष्ट अर्थाच्या त्यांच्या बोलण्याचा अनर्थ करण्याची जणू अहमहमिका लागलीय् इथे सर्वांमध्ये. जो तो आपापल्या तऱ्हेने अकलेचे तारे तोडण्यास सिद्ध झालेला. टर उडविण्यापासून तर अभ्यास न करता त्याचे राजकीय विश्लेषण करण्यापर्यंत, सारा प्रकार लाजिरवाण्या पद्धतीने चालला आहे. सैन्याच्या तुलनेत समाजातील लोकांच्या अधिक संपर्कात असलेल्या, त्यांच्या दैनंदिन व्यवहाराशी, सुख-दु:खाशी एकरूप असलेल्या, त्यात कार्यकत्र्यांच्या माध्यमातून कुठे ना कुठे सहभागी असलेल्या संघाला, हे कार्य अधिक सोपे जाईल, यातून चुकीचा काय अर्थ निघतो? अन् तो कशाला काढायचा? संघच कशाला, समाजाशी एकरूप झालेल्या कुठल्याही शिस्तबद्ध संघटनेला ही किमया सिद्ध करता येईल. हे काम आम्ही करू शकतो असे सांगताना, इतर कुणीही ते करू शकत नाही, अशी भाषा तर मोहनजी बोलले नव्हते, मग त्यांच्या बोेलण्यातून त्यांना अपेक्षित नसलेला अन्वयार्थ काढून तो विरुद्ध अर्थाने लोकांसमोर मांडून समाजात संभ्रम निर्माण करण्याची धडपण नेमकी कुणाची? कशापायी? संघाबद्दल इतका द्वेष व्यक्त करण्याचे कारण तरी कळू शकेल? सरसंघचालक जे काही बोलले, ती तर वस्तुस्थिती आहे.
 
पूर असो की भूकंप, आजवर या देशात जिथे कुठे, जेव्हा केव्हा संकटाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा- अगदी सैन्यासाठीही नागरिकांद्वारे मदत उभारण्याची गरज पडली तेव्हाही-संघाचा स्वयंसेवक गणवेशात मदतीला हजर झाला. इतर जनसमुदाय बघ्याची भूमिका घेत असताना स्वयंसेवक मात्र, लोकांनी आश्चर्याने बोटे तोंडात घालावीत, कौतुकाने नुसते बघत राहावे, अशा पद्धतीने मदत करायला मैदानात उतरले, ही वस्तुस्थिती आहे. शिस्तीत तयार झालेला स्वयंसेवक अशा प्रसंगांशी लढायला कायम तयार आणि तत्पर असतो. स्वयंशिस्तीत विकसित झालेले असे स्वयंंप्रेरित, कार्यतत्पर स्वयंसेवक हीच संघाची ताकद आहे, हे समजावून सांगण्याचा सरसंघचालकांचा प्रयत्न अयोग्य ठरवत त्याची खिल्ली उडविण्याचा, त्यावरून रान माजविण्याचा, स्वत:च्या राजकीय भाकरी भाजून घेण्याचा अश्लाघ्य, अनाठायी अट्टहास कशासाठी चालला आहे? आम्ही सैनिकांसारखे सीमेवर जाऊन लढू शकतो, अशी भाषा तर डॉ. मोहनजी बोललेलेही नाहीत. मग त्यांच्या तोंडी तसल्या अर्थाची वाक्ये घालून त्यावरून संघाला बडविण्याची खुमखुमी नेमकी कुणाला जिरवून घ्यायची आहे? संघाची वाढलेली शक्ती काँग्रेस, कम्युनिस्टांना बघवत नाही, हे तर उघड सत्य आहे. मग? त्यांनी मांडलाय् संघ, भाजपाच्या बदनामीचा हा खेळ? रडीचा हा डाव त्यांची हरलेली प्यादी खेळताहेत? गोबेल्स नीती कधीतरी यशस्वी ठरली होती, हा इतिहास झाला. तसली नीती दर वेळीच यशस्वी ठरेल असे नाही. लोकही आता हुशार झालेत. सजग झालेत. त्यांना कुणीच मूर्ख बनवू शकत नाही. काँग्रेस-कम्युनिस्टांचा पोटशूळ त्यांना कळून चुकलाय्. संघाविषयी त्यांच्या मनात असलेली असूया, त्यापोटी संघ-भाजपाविरुद्ध योजनाबद्ध पद्धतीने ओकली जाणारी गरळ, भ्रम पसरविण्याठी जाणीवपूर्वक होणारा प्रयत्न... गेल्या नव्वद वर्षांत संघाने कृतीतून सिद्ध केलेला चांगुलपणा... पण, तो स्वीकारण्याचीही दानत नसलेली ही भाऊगर्दी. अनुल्लेखाचे धोरण पत्करले तरी पोटं दुखतात यांची. खरंतर उल्लेख करावा एवढीही लायकी अन् कर्तृत्व नसते त्यांचे. दोन्हीच्या अभावात संघाविरुद्ध पोपटपंची करण्यात मात्र आयुष्य खर्ची पडतेय् त्यांचे. दुसरीकडे, संघ मात्र कायम वर्धिष्णू राहिला आहे. कार्याने, कर्तबगारीने, कर्तृत्वाने... सरसंघचालकांच्या बोलण्यातून अभिमान नेमका त्याचबाबत व्यक्त झाला. अर्थात, विरोधकांच्या विरोधाचे विखारी तुणतुणे तरी दुसऱ्या कशासाठी आहे म्हणा!
@@AUTHORINFO_V1@@