दयाळू चेहर्‍यामागचे पाताळयंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |

निवडणुकीच्या माध्यमातून या क्षेत्रात राष्ट्रवादी शक्ती बळकट झाल्यास आपले खरे रूप समोर येईल. याचमुळे आता चर्चने भाजप व रा. स्व. संघाविरोधात अशाप्रकारे लोकशाहीविरोधी फतवा जारी केला. लोकांनी आपल्या आवाहनावरून भाजपविरोधी मतदान करावे आणि भाजपने पराभूत व्हावे, ही त्यांची इच्छा.


 स्वतःची खोटेपणा मिरवणारी दुकानदारी बंद होण्याची वेळ आली की भल्याभल्यांचा जीव कासावीस होतो. सत्याचा पुरस्कार करणार्‍यांकडे आकृष्ट होणार्‍या बहुसंख्यांना आपल्यामागे उभे करण्यासाठी अशा लोकांकडून मग निरनिराळे डावपेच खेळले जातात. याचे ताजे उदाहरण नागालँडमधील कट्टर ख्रिस्ती मत मांडणार्‍या बाप्टिस्ट चर्चने दाखवून दिले. नागालँडमध्ये येत्या २७ फेब्रुवारीला विधानसभेसाठी मतदान होत आहे. लोकशाहीतला अपरिहार्य घटक म्हणजे निवडणुका. निवडणुका या जात-पात-धर्मविरहित, खुल्या वातावरणात व्हाव्यात, असे आपली घटना सांगते. निवडणुकीची प्रक्रियादेखील घटनेने घालून दिलेल्या मूल्यांच्या आधारे पार पडते आणि त्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट होत जाते. पण, आता नागालॅँडमधील बाप्टिस्ट चर्चने या धारणेलाच सुरुंग लावण्याचा चंग बांधल्याचे दिसते. बाप्टिस्ट चर्चने येथे होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर इथल्या जनतेला भारतीय जनता पक्षाचा विरोध करण्याचे आवाहन केले. ‘‘भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक भाग असून केंद्रातील भाजप सरकारमुळे हिंदुत्वनिष्ठ शक्ती बळकट होत आहेत. भाजपच्या मागे जाणार्‍या नागा लोकांमुळे प्रभू येशू नक्कीच रडत असेल. हे लोक भारतातून ख्रिश्चन धर्माला नष्ट करू इच्छितात. त्यामुळे भाजपचा विरोध करा,’’ अशा आशयाचे पत्र बाप्टिस्ट चर्चने प्रसिद्ध केले. मुळात चर्चला असे आवाहन करण्याची वेळ का आली, याचा विचार करणे गरजेचे आहे. कारण, गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारने पूर्वोत्तरातील राज्यांकडे विशेष लक्ष देण्याचे कामकेले. त्याचमुळे आतापर्यंत आकाशातल्या बापाच्या नावाने लाखो लोकांचे धर्मांतर करणार्‍या चर्चला आपल्या भानगडींचा बुरखा फाटतो की काय, या भयाने ग्रासले व त्यातूनच अशाप्रकारे पत्र पाठवून लोकांपुढे हात जोडण्याची वेळ आली. युरोपात ख्रिस्ती धर्माच्या उदयापासूनच त्या धर्माने राजसत्तेला आपल्या मुठीत ठेवण्याचे कामकेले. भारतातही चर्चने अगदी ब्रिटिश काळापासून अफाट संपत्तीच्या जोरावर इथल्या गरिबांचा धर्म विकत घेण्याचा बाजार मांडला. मिशनर्‍यांनी जे लोक संपत्तीला भुलून धर्मांतरित होत नाहीत, त्यांच्यावर अत्याचार, हिंसक हल्ले करत जबरदस्तीने धर्म लादण्याचा क्रूरपणा केला. त्यांच्या या क्रौयाचे पुरावे आजही इन्क्विझिशन पोलच्या रूपात पाहायला मिळतात, पण गेल्या काही काळातील घटनांकडे पाहता चर्चने आता देशातल्या राजकारणातही पाय पसरण्याचे उद्योग सुरू केल्याचे स्पष्ट होते. मागील वर्षी गुजरातमध्ये आर्च बिशप थॉमस मॅक्वान यांनी राष्ट्रवादी शक्तींच्या पराभवासाठी मानवतावादी शक्तींना मतदान करण्याचे आवाहन केले. गुजरातच नव्हे तर गेल्यावर्षी गोव्यात झालेल्या निवडणुकांआधीही गोव्यातील चर्चच्या अधिकृत नियतकालिकाने मनोहर पर्रिकरांना पराभूत करण्याचे आणि देशव्यापी फॅसिझमच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. आपल्या काळ्या-निळ्या व्यवहारांची सद्दी तशीच सुरू राहावी म्हणूनच चर्चने असे आवाहन केले, हे कोणीही सांगू शकेल. शिवाय २०१४ साली मुंबईतल्या सेंट झेवियर्स कॉलेजचे प्राचार्य फादर फ्रेझर मस्कर्‍हान्स यांनी लोकसभा निवडणुकीवेळी असेच ईमेल पाठवले होते. आता नागालॅँडमधील निवडणुकांतही चर्चने आपल्या धर्मप्रसारासाठी अनुकूल असणारेच सत्तेवर यावेत म्हणून हस्तक्षेप करण्याचा उपद्व्याप केला. म्हणजेच ही चर्चा वेगवेगळ्या राज्यातली असली तरी भाजप आणि संघद्वेषाची एकच भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होते.

भारत पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांनी आपल्या शासनकाळात देशातल्या वनवासी, गिरिवासी भागात ख्रिश्चन मिशनर्‍यांना धर्मप्रसारासाठी मोकळे रान करून दिले. परिणामी देशात चर्चने वेगाने आपले हातपाय पसरले पण होता-नव्हता तो सगळा जोर लावूनही त्यांना देशातील बहुसंख्य भाग क्रॉसच्या छायेखाली आणता आला नाही. नागालॅँडमध्येही तसेच झाले. सरकारी आकडेवारीनुसार इथल्या लोकसंख्येपैकी ८८ टक्के ख्रिश्चन, ९ टक्के हिंदू आणि २ टक्के मुस्लीमआहेत, पण सत्य हे आहे की, नागा समाज आजही अंगामी, आओ, चखेसंग आदी जातींमध्ये आणि आपल्या टोळीच्या पारंपरिक रितीरिवाजांचे पालन करत विभागलेला आहे. नागा समाजाकडून पाळले जाणारे हे सर्वच रितीरिवाज अखंड हिंदू धर्माचेच अंग मानले जातात. त्याचमुळे डिसेंबर महिन्यात झालेल्या ‘हॉर्नबिल फेस्टिव्हल’ या नागा बांधवांच्या मूळ संस्कृतीशी नाते सांगणार्‍या उत्सवाला ख्रिस्ती चर्चने विरोध केला. पण, धर्मांतर होऊनही नागांनी त्यावेळी ख्रिस्ती चर्चच्या विरोधाला भीक न घालता आपली मूळ संस्कृती जपणारा हा उत्सव साजरा केलाच.

दुसरीकडे पूर्वोत्तरातील राजकारण व प्रशासकीय व्यवस्थेत चर्चचा अत्याधिक हस्तक्षेप असल्यामुळे नाताळच्या दिवशी आपल्या घराबाहेर चांदणी आणि क्रॉसची सजावट करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला तिथे ख्रिश्चनच मानले जाते. पण, हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णु आणि सर्वांना आपले समजणारा आहे. त्याचमुळे लाखो लोक हिंदू असूनही नाताळसह अन्य धर्मीयांचे सणदेखील साजरे करतात. चर्चने मात्र त्याचा विपरित अर्थ काढून त्या सर्वच लोकांना इथे ख्रिश्चन ठरवले. जर ते सर्वच खरोखर ख्रिस्ती असते तर त्यांनी आपली मूळ संस्कृती नक्कीच सोडून दिली असती, पण तसे झाले नाही. म्हणूनच चर्चला आता भीती सतावते आहे की, निवडणुकीच्या माध्यमातून या क्षेत्रात राष्ट्रवादी शक्ती बळकट झाल्यास आपले खरे रूप समोर येईल. याचमुळे आता चर्चने भाजप व रा. स्व. संघाविरोधात अशाप्रकारे लोकशाहीविरोधी फतवा जारी केला. लोकांनी आपल्या आवाहनावरून भाजपविरोधी मतदान करावे आणि भाजपने पराभूत व्हावे, ही त्यांची इच्छा.

नागालँडमध्ये संघाचे कार्य त्या राज्याच्या स्थापनेच्याही आधीपासून सुरू आहे, पण ९० च्या दशकानंतर इथे संघकार्याचा वेगाने प्रसार झाला. संघाने इथे ‘भारत माझे घर’ या नावाने एक अभियानदेखील चालवले होते. सुरुवातीला संघाबद्दल माहिती नसणारे लोक आता संघच आमच्या भल्यासाठी, आम्हाला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी कार्य करत असल्याचा विश्वास व्यक्त करतात, पण संघकार्यामुळे दयाळू आणि प्रेमळपणाचा दिखावा करणार्‍या चर्चला आपला पाताळयंत्री कावा समोर येण्याची भीती वाटत असावी. म्हणूनच बिथरलेल्या चर्चने इथल्या लोकांना निवडणुकीमध्ये भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले. दुसरी गोष्ट म्हणजे जर असे आवाहन एखाद्या हिंदू मठ-मंदिरातील वा धर्मपीठातील संतमहंताने केले असते तर आतापर्यंत देशातल्या पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी टोळधाडीने मोठाच हल्ला-कल्ला केला असता, पण चर्चने असे आवाहन करूनही या ढोंगी लोकांच्या तोंडून एक शब्दही निघालेला नाही. म्हणजेच चर्चने केलेले आवाहन आणि त्यामागचे राजकारण तिथल्या भल्यामोठ्या घंटांच्या आवाजात दबले असावे, असे स्पष्ट होते.

@@AUTHORINFO_V1@@