डिव्हाईन सायक्लोथॉन उत्साहात, दिव्यांगांप्रती स्नेहभाव व्यक्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Feb-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : समाजामध्ये दिव्यांग व्यक्तींप्रती सामान्य नागरिकांमध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, जागृती व्हावी त्यांच्या समस्या जाणून घेता याव्यात या उद्देशाने ’नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ महाराष्ट्र, नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन आणि एसकेडी ग्रुप यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ’डिव्हाइन सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात आले होते.
 
 
नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, गुरू गोविंदसिंग फाऊंडेशनचे गुरदेवसिंग विर्दी, नगरसेविका हेमलता पाटील, प्रियांका घाटे आणि जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत सायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी सामान्य नागरिकांना नेत्रदान, दुचाकी वापरताना हेल्मेट वापरा, रस्ता सुरक्षिततेसाठी नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
 
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या डिव्हाईन सायक्लोथॉनचे सलग तिसर्‍या वर्षी आयोजन करण्यात आले होते. या डिव्हाईन सायक्लोथॉनमध्ये ८० हून अधिक अंध मुले-मुली, अस्थिव्यंग, मतिमंद, सेलेब्रल पाल्सी, बहुविकलांग, डिफ-ब्लाइंड असे दिव्यांग स्त्री-पुरुष सहभागी झाले. महात्मानगर क्रिकेट ग्राऊंड ते भोसला मिलिटरी स्कूल गेट, कॉलेज रोड अशा मार्गावर झालेल्या या डिव्हाइन सायक्लोथॉनमध्ये दोन चाकी सायकल्स, टँडम सायकल्स, लहान मुलांसाठी तीन चाकी सायकल्स, व्हीलचेअर वापरण्यात आल्या. नाशिक सायकलिस्टच्या सदस्यांनी स्वतःच्या सायकल्स यावेळी उपलब्ध करून दिल्या.
 
या सायक्लोथॉन दरम्यान प्रत्येक दिव्यांग सायकलिस्टसोबत २ व्यक्ती पूर्णवेळ साथ देण्यासाठी उपलब्ध होत्या. यावेळी टाळ्या आणि चुटक्या यांच्या दिशेने दिव्यांग सायकलिस्ट सायकल चालवताना दिसत होते. यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते साहसी सायकलिस्ट डॉ. हितेंद्र महाजन आणि महेंद्र महाजन बंधूंचा विशेष सत्कार नाशिक सायकलिस्टच्या वतीने करण्यात आला.
 
@@AUTHORINFO_V1@@