भारतीय मुसलमानांचे आदर्श कोण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2018
Total Views |

 

 

 
 
 
 
मुसलमान जितक्या लवकर त्यांचे नेतृत्व निश्चित करतील तितकेच ते त्यांच्यासाठी उत्तम असेल. ओवेसी आपला आदर्श आहे की अब्दुल कलाम हे मुसलमानांनी कधीतरी ठामपणे सांगितले पाहिजे. म्हणजे मुसलमानांच्या नावावर असल्या बांगा मारण्यालाच चाप बसेल.
 
 

‘‘शहिदांचा कुठलाही धर्म नसतो. त्यांच्या बलिदानाला आम्ही धार्मिक रंग देत नाही. शहिदांच्या धर्मावर भाष्य करणार्‍यांना सैन्याची पुरेशी माहिती नसावी,’’ अशा शब्दांत काल लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी असदुद्दीन ओवेसींना भर पत्रकार परिषदेत सुनावले. जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेले जवान मुस्लीम असल्याचे विधान ओवेसींनी केले होते. वस्तुत: देशभरातील तमाम भारतीय मुस्लिमांचे नेतृत्व आपल्याकडेच असावे, अशा अपेक्षेने ओवेसी बंधू अधूनमधून अशी विधाने करीत असतात. जंग जंग पछाडूनही त्यांना अद्याप ते नेतेपद मिळालेले नाही. याचे कारण त्यांचे त्यांनी शोधावे, मात्र देशासाठी शहीद झालेल्यांमध्ये धर्म शोधणार्‍याला जोड्यानेच मारले पाहिजे. ओवेसीसारखे नेते मोठे होतात, कारण भारतीय मुसलमान त्यांना आपले नेते मानतात. ओवेसी जे काही बोलतात त्यामागे त्यांना मिळत असलेल्या मुस्लिमांची साथ, हे मुख्य कारण आहे. भारतीय मुसलमानांनी कधीतरी ठरविले पाहिजे की आपले नेते कोण? आपले आदर्श कोण? त्यांनी बहुसंख्य हिंदूंच्या नेत्यांना आपले मानावे, असा आग्रह मुळीच नाही. किंबहुना, काँग्रेसवर विश्वास ठेवल्यानेच आज भारतीय मुसलमानांची ही अवस्था आहे. काँग्रेसने त्यांना जितके वापरता आले तितके वापरले आणि वापर झाल्यावर फेकून दिले.

 
 
 

मुस्लिमांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांवर कधीही लक्ष दिले गेले नाही. धार्मिक मागण्यांचे लाड पुरवित मुसलमान जितके मागास राहतील तितकेच ते ‘मतपेढ्या’ म्हणून वापरायला उत्तम, ही त्यामागची काँग्रेसची भूमिका होती. ‘तिहेरी तलाक’सारखा विषय या देशात कितीतरी वर्षे गाजत राहिला आहे. अनेक सुधारणावादी मुसलमानांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला. महाराष्ट्रात हमीद दलवाई यांनी याबाबत मोठे काम केले. प्रसंगी मारही खाल्ला. हमीद दलवाईंचे मित्र महाराष्ट्रातील पुरोगाम्यांचे शिरोमणी शरद पवार. पवारांनी आपले पुरोगामित्व कायम ठेवण्यासाठी हमीद दलवाईंचा पुरेपूर वापर केला, आपल्या मैत्रीचे किस्से पसरविले. मात्र, ज्या हेतूसाठी दलवाई काम करीत होते त्यासाठी कधीही काहीही भरीव पवारांनी केले नाही.

 
 
 

मुस्लीम सुधारणांच्या चळवळी भरपूर झाल्या. मात्र, केंद्रात हिंदुत्व विचार मानणार्‍यांचे सरकार आल्यावरच या सुधारणेला मुहूर्त सापडला. ही घटना वरवर सहज वाटत असली तरी त्यामागे लांगूलचालनाचे मोठे राजकारण दडले आहे. मूळ मुद्दा या राजकारणाचा नाही. मूळ मुद्दा भारतीय मुसलमानांनी कोणते प्रवाह ‘त्यांचे’ मानायचे हा आहे. ओवेसींनी आज शहिदांचा धर्म काढला. १९६५ सालच्या युद्धात अब्दुल हमीद नावाच्या भारतीय सैनिकाने अलौकिक साहसाचे प्रदर्शन घडविले होते. अब्दुल हमीदना भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार असलेले ‘परमवीरचक्र’ यावेळी देण्यात आले. त्यांच्या नावाने आजही देशभरात ठिकठिकाणी रस्ते, वाचनालये व अन्य स्मृतिस्थळे आहेत. १९८८ साली दूरदर्शनने भारतीय जवानांवर साकारलेल्या मालिकेत अब्दुल हमीद यांची भूमिका प्रसिद्ध नट नसरुद्दीन शाह यांनी साकारली होती. हा सारा सन्मान हमीदना ते मुसलमान म्हणून दिला गेला नव्हता, तर त्यासमयी ते भारतमातेच्या रक्षणासाठी पराक्रमाचा परमोच्च बिंदू गाठणारा सेनानी होते. जी गोष्ट हमीद यांची, तीच गोष्ट अब्दुल कलाम यांची. अणुशास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती म्हणून सदैव डॉ. कलाम देशवासीयांच्या स्मरणात राहतील. इथेही ते मुसलमान म्हणून नाही, तर देशातील तमाम भारतीयांना भविष्यातल्या भारताचे स्वप्न दाखविणारे राष्ट्रपुरुष म्हणून!

 
 
 

या देशाला मुसलमानांचे वावडे नाही. अन्य देशातल्या विशेषत: मुस्लीम देशातल्या अल्पसंख्याकांपेक्षा भारतातील अल्पसंख्याकांना अधिक चांगले हक्क व अधिकार आहेत. प्रश्न हा उरतो की, मुसलमान कुणाला मानतात? ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक मुझफ्फर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले. समान नागरी कायद्याबाबत त्यांच्या भूमिका ठाम होत्या. ‘अल्पसंख्याकवाद एक धोका’ हे त्यांचे पुस्तक चांगलेच गाजले होते. मुसलमानांनी हिंदूंशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले पाहिजे, असे ते ठामपणे मांडत. मात्र, मुस्लीम समाजातल्या नेतृत्वाकडे पाहिले की, नेमके काय चालले आहे ते कळायलाच मार्ग नसतो. हा देश इस्लामी राज्यकर्त्यांनी आपल्या टाचेखाली ठेवला होता. इंग्रजांनीही हा देश इस्लामी राज्यकर्त्यांकडूनच आपल्याकडे घेतला. त्यामुळे इस्लामी राज्यकर्तेच या देशाचे मूळ राज्यकर्ते आहेत, अशी मांडणी करणारा झाकीर नाईक इथल्या मुसलमानांच्या गळ्यातला ताईत का बनतो? ‘तिहेरी तलाक’च्या बाबतीत विरोधाचे सूर उमटतात. त्यावर मुस्लीम समाजातून काहीच भाष्य होत नाही. शरद पवार ‘‘तिहेरी तलाक हा अल्लाचा आदेश असून कुठल्याही राज्यकर्त्याला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही,’’ असे म्हणतात, तेव्हा मुस्लीम समाजातून विशेषत: महिलावर्गातून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसते. मात्र, तसे घडताना दिसत नाही. मुस्लिमेतर समाजातील लोकांनी मुस्लिमांमध्ये सुधारणेच्या अपेक्षा ठेवल्या, तर त्या मुसलमानांना कधीच मान्य होणार नाहीत. पर्यायाने मुस्लीम समाजामधूनच नेतृत्व उभे राहावे लागेल. ते जितक्या लवकर होईल तितके चांगले. कारण, सुधारणांपेक्षा सुरक्षिततेचा आणि अन्य लोकांच्या अस्तित्वाचाच प्रश्न आता बिकट होऊ लागला आहे. कालपर्यंत शाळा-कॉलेजात जाणारा मुस्लीम तरुण अचानक गायब होतो आणि नंतर तो ‘इसिस’च्या प्रभावाखाली येऊन कुठल्यातरी इस्लमी देशात जाऊन पोहोचल्याची माहिती मिळते, हे धक्कादायक आहे. इशरत जहॉं प्रकरण घडले तेव्हा इथल्या ढोंगी पुरोगाम्यांनी त्याचा वापर हिंदुत्व विचार मानणार्‍यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासाठी केला होता. मात्र, ती मुलगी तिच्याबरोबर मारल्या गेलेल्या संशयास्पद साथीदारांबरोबर काय करीत होती, याचे उत्तर शोधावे असे कुणालाही वाटले नाही. मुसलमान जितक्या लवकर त्यांचे नेतृत्व निश्चित करतील तितकेच ते त्यांच्यासाठी उत्तम असेल.

 

ओवेसी आपला आदर्श आहे की अब्दुल कलाम हे मुसलमानांनी कधीतरी ठामपणे सांगितले पाहिजे. म्हणजे मुसलमानांच्या नावावर असल्या बांगा मारण्यालाच चाप बसेल.

@@AUTHORINFO_V1@@