पोलिसांना चांगला निवारा देण्याचे प्रयत्न डॉ. रणजीत पाटील यांची ग्वाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : ’’जनतेच्या सुरक्षेसाठी २४ तास काम करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना कामाचे समाधान मिळण्यासाठी चांगला निवारा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत,’’ अशी ग्वाही राज्याचे नगरविकास आणि गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजीत पाटील यांनी दिली. पोलीस मुख्यालय परिसरात आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
 
कार्यक्रमाला आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, उपायुक्त माधुरी कांगणे, लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, मनपा स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, प्रा. सुहास फरांदे, लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.
 
डॉ. पाटील म्हणाले की, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस कर्मचार्‍यांच्या गृहनिर्माण प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. पोलिसांची घरे तयार करण्यासाठी शासकीय लॅण्डबँकेच्या माध्यमातून कमी दरात जागा उपलब्ध करून देण्याबरोबर इमारतींना जास्त एसएफआय देण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. पोलीस कर्मचार्‍यांना घरासाठी मूलभूत गरजांएवढे क्षेत्र देण्यात येणार आहे. तसेच सायबर गुन्हे आणि आर्थिक गुन्हे हे मोठ्या शहरातील प्रमुख आव्हान आहे. अधिक साक्षरतेचे प्रमाण असूनही शहरात आर्थिक गुन्हे घडतात. ’मैत्रेय’ सारख्या प्रकरणात देशातील पहिले इस्क्रो अकाऊंट उघडून समाजाला लाभ देण्याचा स्तुत्य प्रयत्न नाशिक पोलिसांनी केला आहे,’’ असे कौतुगोद्गार त्यांनी काढले.
 
आ. फरांदे म्हणाल्या की, ब्रिटिशकालीन पोलीस वसाहतीत अनेक दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस गृहनिर्माणाला चालना देताना पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनसाठी गतवर्षीच्या अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद केली. पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस वसाहतीच्या पुर्ननिर्माणाबाबतचा आराखडा सादर करण्यात आला असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सिंगल यांनी पोलीस आणि जनतेचे संबंध चांगले असणे महत्त्वाचे असून त्या दिशेने शहर पोलीस प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. अन्यायग्रस्त नागरिकांना तातडीने न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करण्याबरोबरच पोलीस कर्मचार्‍यांना सुविधा देण्याकडेही लक्ष देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी महापौर भानसी यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी-कर्मचारी, पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते.
 
 
पोलीस मुख्यालय परिसरात सुधारणा
 
पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस चाळींची सुधारणा करण्यात येणार असून जुनी कौले काढून पत्रे बसविण्यात येणार आहेत. मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्तीदेखील करण्यात येणार आहे. या परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामावर सुमारे ७० लक्ष रुपये खर्च होणार आहे. तसेच संरक्षक भिंतही बांधण्यात येणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@