स्वागत सोहळ्याच्या तोंडावर शिवसेनेत सुंदोपसुंदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Feb-2018
Total Views |

सातमकर, चेंबूरकर यांचे स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामे घेतले
सहा नगरसेवकांचे जल्लोषात स्वागत
 

 
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि विद्यमान स्थायी समितीचे सदस्य मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामे देण्यास भाग पाडण्यात आले.
 
 
या राजीनाम्यानंतर नगरसेवकांच्या चेहऱ्यावर नाराजी असताना मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांनी आज सभागृहातप्रवेश केला. शिवसेनेने भगवे फेटे बांधून वाजतगाजत जल्लोषात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मनसेच्या सहा नगरसेवकांनी वेगऴा गट स्थापन करून शिवसेनेत प्रवेश केला. त्याला कोकण विभागीय आयुक्तांची मान्यता मिळणे आवश्यक होते. याचवेळी या सहा नगरसेवकांच्या गटाला मान्यता देऊ नका, पद रद्द करा तसेच त्यांना कोणत्याही समित्यांच्या बैठकांना बसू देऊ नका, अशी मागणी केली. चार महिने यावर सुनावणी सुरु होती. काही दिवसांपूर्वी या सहाही नगरसेवकांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला. त्यानंतर दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, हर्षला मोरे, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी गुरुवारी सभागृहात चार महिन्यानंतर सत्ताधारी शिवसेनेसोबत वाजत गाजत भगवे फेटे बांधून प्रवेश केला. सभागृहातील शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या आता वाढली आहे. गुरुवारी शिवसेनेने शक्तीप्रदर्शन करत ढोल-ताशांचा गजरात भगवे फेटे बांधून नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला. या नगरसेवकांच्या प्रवेशामुऴे शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ आता ९३ वर पोहचले आहे.
 
 
तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मंगेश सातमकर यांची वर्णी लागणार होती परंतु अंतिम क्षणी रमेश कोरगांवकर यांची स्थायी समिती अध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षनेतृत्वाने सातमकर यांना धक्का दिला. सातमकर यांच्या प्रमाणेच ज्येष्ठ नगरसेवक आशिष चेंबूरकर यांचेही नाव स्थायी अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. त्यांनाही त्यावेळी अध्यक्ष पद मिळालेले नव्हते. स्थायी समिती अध्यक्षपद हुकल्याने सातमकर, चेंबूरकर नाराज होते. सातमकर व चेंबूरकर यांना स्थायी समिती सदस्यपदी वर्णी लावून बोळवण करण्यात आली होती. स्थायी समितीच्या बैठकीत अनेकवेळा या दोघांनी रोखठोक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले होते. परंतु त्यांनाच राजीनामा देण्यास भाग पडल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान मंगेश सातमकर यांना शिक्षण समिती अध्यक्ष तर आशिष चेंबूरकर यांना बेस्ट समिती अध्यक्षपद दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@