एकदिवसीय मालिकेत भारताची विजयी आघाडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2018
Total Views |

पाचव्या सामन्यात आफ्रिकेचा ७३ धावांनी पराभव 




पोर्ट एलिझाबेथ :
भारत आणि आफ्रिका यांच्यात पोर्ट एलिझाबेथ येथे झालेला पाचवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना भारताने ७३ धावांनी जिंकला असून सहा सामन्यांच्या मालिकेतील हा भारताचा चौथा विजय ठरला आहे. भारताच्या रोहित शर्मा याच्या झुंजार शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने दिलेले २७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिका संघ २०१ धावांवरच कोलमडून पडला. त्यामुळे सहा सामन्यांच्या या मालिकेत आता भारताकडे ४-१ अशी विजयी आघाडी आली असून हि मालिका देखील भारताच्या खात्यात जमा झाली आहे.

भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी द.आफ्रिकेकडून हाशीम अमला आणि कर्णधार अॅडेन मॅर्क्रम हे दोघे मैदानात उतरले होते. भारतीय संघाप्रमाणेच आफ्रिका संघाने देखील आपल्या चांगल्या प्रक्रारे सुरुवात केली होती. या जोडीने पहिल्या बळीसाठी एकूण ५२ धावांची भागीदारी रचली परंतु बुमराह कर्णधार मॅर्क्रम याला कोहलीकडून झेलबाद करत भारताला पहिला बळी मिळवून दिला. यानंतर आलेल्या खेळाडूंपैकी डेविड मिलर (३६) आणि हॅनरिच क्लासन (३९) या दोघांनाच चांगली कामगिरी करता आली. हाशीम अमलाने देखील आपल्या दमदार खेळीचे प्रदर्शन करत ७१ धावांची खेळी केली. परंतु अमला बाद झाल्यानंतर आफ्रिका संघ पूर्णपणे कोसळला आणि परिणामी आफ्रिकेला आपला डाव २०१ धावांवरच गुंडाळावा लागला. या बदल्यात भारताकडून कुलदीप यादव यांनी सर्वाधिक चार बळी घेतले. तर त्यापाठोपाठ यजुवेन्द्र चहल आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

सेंट जॉर्ज पार्क येथे पार पडलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारताकडून सलामीसाठी म्हणून मैदानात आलेल्या रोहित शर्माने आपल्या नेहमीच्या आक्रमक खेळीचे प्रदर्शन करत ११५ धावांची खेळी करत भारताचा पाया रचून दिला. तर त्याच्या बरोबरीला शिखर धवन (३४), विराट कोहली (३६) आणि श्रेयस अय्यर (३०) यांनी भारताच्या पुढील डावाला आकार दिला होता. या सामन्यात कामगिरीसाठी रोहित शर्मा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@