लहान माझी भावली मोठी तिची सावली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2018
Total Views |
“आबा, उद्याच्या अमावस्येला सूर्यग्रहण आहे ना?”, सुमीने विचारले.
 
“आहे, पण असून नसल्यासारखे आहे.”, आबा पेपर मधून डोकं बाहेर न काढता म्हणाले.
सुमितने पुन्हा विचारले, “असून नसल्यासारखं? म्हणजे काय?”
“ग्रहण आहे. चंद्राची सावली पृथ्वीवर पडणार आहे. पण भारतावर पडणार नाही.”, आबा म्हणाले.
“म्हणजे, भारतातून दिसणार नाही?”, सुमितने विचारले.
“आपल्या आकाशातला सूर्य अजिबात झाकला जाणार नाही.”, पुन्हा पेपर मध्ये डोकं.
“आबा, हे ग्रहण पाहायचं असेल तर कुठे जायला हवे?”, सुमितने चिकाटी सोडली नाही.
आता मात्र आबांचे डोळे चमकले. पेपर बाजूला ठेवून म्हणाले, “सुम्या, हे ग्रहण पाहायला Antartica ला जायला हवं! येतोस?”
“परवानगी विचारताय, म्हणून सांगते. जा हो! खुशाल! जातांना बरोबर गरम कपडे घ्या, आणि येतांना पेंग्विन आणू नका, म्हणजे झाले!”, दुर्गाबाई हसत म्हणाल्या, “शंकरराव, भारतावर चंद्राची सावली का पडणार नाही?”
“दुर्गाबाई, चंद्राची सावली पण चंद्रासारखीच कमाल करते. चंद्रासारखी तीची पण अनेक रूपे आहेत! कसे ते सांगतो.”, आबा सांगू लागले, “पृथ्वी चंद्रापेक्षा चौपट मोठी आहे, आणि पृथ्वीची umbra सावली सुद्धा चंद्रापेक्षा जवळ जवळ तीन पट मोठी आहे. त्यामुळे, अख्खाच्या अख्खा चंद्र पृथ्वीच्या सावलीत मावतो. सावलीत प्रवेश करतांना दिसतो. काही काळ त्या सावलीत प्रवास करतो. आणि मग सावलीतून बाहेर पडतांना दिसतो.
“चंद्राची सावली अर्थातच पृथ्वीपेक्षा लहान आहे. त्यामुळे ती पृथ्वीचा लहानसा भाग व्यापते. केवळ तेवढ्या भागातच सूर्यग्रहण दिसते. ही पहा चंद्राची सावली -
 

 
 
“दुसरे असे की, चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर महिनाभर बदलत असते. कधी तो पृथ्वीच्या जवळ असतो Perigee ला. तर कधी दूर असतो Apogee ला. आता चंद्र पृथ्वी पासून किती अंतरावर आहे, त्यावर त्याची कोणती सावली पृथ्वीपर्यंत पोचते आणि तिचा आकार केवढा असेल ते ठरते. चंद्र जवळ असेल, तर चंद्राची umbra सावली पृथ्वीवर पडते. त्या भागात सूर्य पूर्ण झाकला जातो. याला खग्रास सूर्यग्रहण किंवा Total Solar Eclipse म्हणतात. चंद्र दूर असेल, तर umbra आधीच विरून पृथ्वीवर Antumbra ही सावली पडते. अशा सावलीत, चंद्राच्या सावलीचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान असल्याने, चंद्राच्या भोवती सूर्याचे अग्निमय कडे दिसते. याला कंकणाकृती सूर्यग्रहण किंवा Annular Solar Eclipse म्हणतात. तर Penumbra सावलीच्या भागात सूर्य अर्धवट झाकला गेल्याने तिथे Partial Solar Eclipse दिसते.”, आबा म्हणाले.
 

 
 
“अगदी क्वचित बरे का, असे सुद्धा होते, की एकच ग्रहण काही ठिकाणी खग्रास दिसते, काही ठिकाणी Partial आणि काही ठिकाणी कंकणाकृती दिसते.”, आबा म्हणाले.
“ओह! म्हणजे जेंव्हा काही ठिकाणी umbra सावली पोचते, आणि काही ठिकाणी antumbra पोचते, तेंव्हा असे होत असणार, नाही का?”, सुमित म्हणाला.
“बरोबर बोललास मित्रा! ”, आबा सुमितची पाठ थोपटून म्हणाले, “हे असे होते -
 

 
 
“हे छानच आहे चंद्राचं! किती तऱ्हा आणि किती नखरे!”, सुमित म्हणाला.
“सांगतो काय तुला, सुम्या! चंद्राचे सरळ साध काही नसतच! तो आपला अदाकारी करत आकाशात बागडत असतो.
“दुर्गाबाई, त्याच्या सावली बद्दल एक सांगायचे राहिले! पृथ्वी गोलाकार असल्याने, कोणत्या भागावर सावली पडते, यावर ती सावली किती मोठी असेल हे ठरते. विषुववृत्ताजवळ चंद्राची umbra सावली १५० किमी रुंद, तर ध्रुवीय भागावर तीच सावली पसरून १,००० किमी रुंद होऊ शकते!
 

 
 
“आबा, उद्याच्या ग्रहणाची सावली पण ध्रुवीय भागावर पडणार आहे, तर ती पण खूप मोठी असेल का?”, सुमितने विचारले.
“Righto! उद्याच्या ग्रहणात चंद्राची Penumbra सावली दक्षिण ध्रुव आणि दक्षिण अमेरिकेचे टोक व्यापणार आहे. चंद्राची umbra सावली मात्र पृथ्वीच्या खालून अवकाशात निघून जाणार आहे. त्यामुळे या पूर्ण भागात फक्त Partial Solar Eclipse दिसणार आहे. ती सावली अशी पसरली असेल -
 

 
 
“अरेरे! हे ग्रहण तर निर्जन स्थानी आहे. कोणीच नाही पाहायला.”, सुमित खट्टू होऊन म्हणाला.
“होय! बर ते असो. आपण आतापर्यंत फक्त स्थिरचित्राचा विचार केला. सावलीच्या बाबतीत अजून एक लक्षात घ्यायला हवे. ते असे की पृथ्वी स्वत: भोवती फिरते, आणि चंद्र पृथ्वी भोवती. त्यामुळे ही सावली सुद्धा काही एका ठिकाणी ठरत नाही. ती पळते! पृथ्वीच्या गोलाकार पृष्ठभागावरून, डोंगरांवरून, समुद्रांवरून, ढगांवरून, वादळांवरून अलगत, सहज, चपळाईने ही सावली धावते! पृथ्वी फिरते पश्चिमे कडून पूर्वेकडे. चंद्राचा प्रवास पण पश्चिमे कडून पूर्वेकडे होत असतो. चंद्राची सावली चंद्राच्या मागे मागे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करते. या सगळ्यांचे वेगांचे एकत्रित परिणाम होऊन, चंद्राची सावली साधारण २,००० kmph च्या वेगाने पृथ्वीवरून धावते!”, आबा म्हणाले.
“आबा, ही पळणारी सावली पाहायला आपण सूर्यावर नाहीतर चंद्रावर तरी जायला हवे ना?”, सुमित म्हणाला.
“सुमित, Antartica ला जाऊन ग्रहण पाहून समाधान होत नाहीये असे दिसतंय.”, दुर्गाबाई म्हणाल्या.
“खरे बोललात दुर्गाबाई, खग्रास ग्रहणाची मजा काही Partial ग्रहणाला येत नाही. असो! तुम्हाला सांगतो, या शतकाच्या अखेर पर्यंत भारतातून एकही खग्रास सूर्य ग्रहण दिसणार नाही. पण त्या दु:खाला कंकणाकृती ग्रहणांची सोनेरी किनार आहे! २०१९ च्या डिसेंबर मध्ये एक आणि जून २०२० मध्ये एक कंकणाकृती ग्रहण भारतातून पहायला मिळेल.”, आबा म्हणाले.
“आबा, आणि हे ग्रहण चंद्रावरून किंवा अंतराळयानातून कसे दिसेल, ते पण सांगा!”, सुमितने विचारले.
“सांगायचे काय सुम्या! दाखवतो! पुढच्या वेळी तुला चंद्राची पळणारी सावली प्रत्यक्ष दाखवतो!”, आबा म्हणाले.
संदर्भ -
१. https://www.timeanddate.com
२. Lunar Shadow Size on Earth’s Surface – NASA Article
३. Shadow Speed and Earth’s Rotation – NASA Article
@@AUTHORINFO_V1@@