५८ वर्षांच्या दूरदर्शनसमोरचे आव्हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Feb-2018
Total Views |
 

 
ज्या प्रकारच्या घडामोडी आज घडत आहेत त्या पाहता भारत आशियाचे नेतृत्व करेल, अशी चिन्हे दिसत आहेत. असे असताना भारताच्या विविध घटकांची जगाला ओळख करून देईल, अशा वृत्तवाहिनीची गरज मोठी आहे. एकेकाळी बीबीसीने युरोपच्या बाबतीत जी भूमिका पार पडली तशीच भूमिका पार पाडेल, अशी वृत्तवाहिनी आज भारताची गरज निर्माण झाली आहे. भारतीय माध्यमांची आजची स्थिती पाहाता अशी अपेक्षा केवळ दूरदर्शनकडूनच ठेवता येईल. बहुसंख्य वाहिन्या आज मजकुराच्या बाबतीत उधारीवरच चालू आहेत. व्हॉट्‌सऍपवरच आलेले व्हिडिओे पाठवून अनेकांची गुजराण सुरू आहे.
 
केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये जे विधान केले ते विचार करायला लावणारे आहे. जागातिक बाजारपेठ तयार आहे. गरज आहे ती दूरदर्शनसारख्या सरकारी वृत्तवाहिन्यांनी कात टाकण्याची. लोकसंख्येच्या दृष्टीने जगातला दुसरा मोठा देश. लाखो बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांची बाजारपेठ. जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करणारी पर्यटनस्थळे. कितीतरी विकसनशील देशांतल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी शिक्षणव्यवस्था. असे आजच्या भारताचे चित्र असताना त्याचे प्रतिबिंब जगाच्या पाठीवर पडावे, असे कुठलेही प्रभावी माध्यम आपल्याकडे नाही. जी आहेत ती केवळ भारतापुरतीच मर्यादित आहेत. ज्या प्रकारच्या घडामोडी आज घडत आहेत त्या पाहता भारत आशियाचे नेतृत्व करेल, अशी चिन्हे दिसत आहेत. असे असताना भारताच्या विविध घटकांची जगाला ओळख करून देईल, अशा वृत्तवाहिनीची गरज मोठी आहे.
 
एकेकाळी बीबीसीने युरोपच्या बाबतीत जी भूमिका पार पडली तशीच भूमिका पार पाडेल, अशी वृत्तवाहिनी आज भारताची गरज निर्माण झाली आहे. भारतीय माध्यमांची आजची स्थिती पाहता अशी अपेक्षा केवळ दूरदर्शनकडूनच ठेवता येईल. बहुसंख्य वाहिन्या आज मजकुराच्या बाबतीत उधारीवरच चालू आहेत. व्हॉट्‌सऍपवरच आलेले व्हिडिओे पाठवून अनेकांची गुजराण सुरू आहे. बातम्यात मिसळले जाणारे रंग, बातम्या अधिक चालाव्या म्हणून निर्माण केले जाणारे सनसनाटी वातावरण, एका विशिष्ट विचारसरणीतून केले जाणारे काम आणि त्यातून पुन्हा आपल्याला न पटलेल्या विचारसरणीबाबत खेळले जाणारे घाणेरडे डाव यामुळे सध्या भारतातील दूरचित्रवाणी माध्यमे त्रस्त आहेत. टीआरपीबाबत सर्वच दूरचित्रवाहिनी माध्यमे स्वत:बाबत काहीही दावे करीत असली तरी विश्वासार्हतेचा उतरता आलेख ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. दूरदर्शन सरकारी माध्यम असल्याने सरकारच्या विरोधात त्यांनी कधीही भूमिका घेतली नसली तरी सवंगतेचा अनुनय दूरदर्शनने कधीही केलेला नाही. दूरदर्शन किंवा त्यासारख्या अन्य प्रादेशिक वाहिन्यांनी एकेकाळी प्रबोधनाचे मोठे काम केले आहे. आजही ते सुरूच आहे, असे म्हणायला वाव आहे. १९५९ साली युनेस्कोच्या मदतीने पहिले दूरचित्रवाणी केंद्र सुरू करण्यात आले. सुरुवातीला केवळ शैक्षणिक स्वरूपाचे कार्यक्रम अशा स्वरूपाचे हे काम होते. नंतर हळूहळू मनोरंजनाच्या कार्यक्रमांनाही सुरुवात करण्यात आली. हवामान, खते, बियाणे यासारखे कार्यक्रम दूरदर्शनच्या माध्यमातून त्यांना देण्यात येऊ लागले. अल्पावधीतच या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला.
 
१९८० च्या सुमारास दूरदर्शनला जोड मिळाली ती मालिकांची. हमलोग, बुनियाद, महाभारत, मालगुडी डेज, रामायण, करमचंद, नुक्कड, वागले की दुनिया, रजनी यासारख्या कितीतरी मालिकांनी भारतीय रसिकांची मने जिंकली व स्वत:चे असे एक अढळ स्थान निर्माण केले. राष्ट्रीय व प्रादेशिक वाहिन्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले एक अढळ स्थान निर्माण केले ते याच आधारावर. भारतीय वृत्तवाहिन्या आज गतीने सवंगतेकडे सरकत आहेत. अशा स्थितीत परदेशी नव्हे तर भारतीय प्रेक्षकांसाठीदेखील चांगला व सशक्त पर्याय निर्माण करणे गरजेचे आहे. सरकारी वाहिन्यांनी १९९० पर्यंत जे कामकेले त्यानेच भारतीय वृत्तवाहिन्यांचा पाया रचला गेला. १९९० नंतर आपण मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली व खाजगी वृत्तवाहिन्यांना देखील या क्षेत्रात यायला वाव दिला. सरकारी वृत्तवाहिन्या इथेच थिजल्या. खरे तर त्यांनी असे करण्याचे काहीच कारण नव्हते. सीएनएन, स्टार टीव्ही यासारख्या परदेशी वाहिन्यांनी भारतात यासाठी भरपूर गुंतवणूक केली व या क्षेत्रातले निकषच बदलून टाकले. हा कित्ता पुढे भारतीय उद्योगसमूहांनी गिरवला. यातून झी, इटीव्ही, सन टीव्ही यांनीही आपले सॅटेलाईट प्रक्षेपण सुरू केले. यानंतर वृत्तवाहिन्यांचा महापूर आला. आज १०० हून अधिक वाहिन्या ४० कोटी प्रेक्षकांना स्वत:मध्ये गुंतवून आहेत. ही गुंतवणूक केवळ भावनिक, सामाजिक नाही तर ती आर्थिकदेखील आहे. जाहिराती, इव्हेंट्‌स या आणि अशा कितीतरी लहानमोठ्या उपक्रमातून अब्जावधी कोटींची उलाढाल यातून होत आहे. सरकारी वाहिन्यांनीदेखील आता यात उतरणे आवश्यक आहे. विश्वासार्हता हीच त्यांची खरी मालमत्ता असल्याने त्यांनी यात उतरले पाहिजे. उतरताना एक नवा प्रवाह लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे इंटरनेट वाहिन्यांचा. रटाळ लग्नाळू, सासू-सुनांच्या कुरापती अशाच भानगडीत भारतीय मनोरंजन विश्व गुंतून पडले आहे. रिऍलिटी शोची जी कल्पना आपल्याकडे पाश्चिमात्त्यांकडून उचलली गेली. तिची अत्यंत भ्रष्ट नक्कल आपल्या मंडळींकडून सादर केली जात आहे. महिलांचे वेश परिधान करून कला सादर करणारे नट पाहिले की, गंधर्वयुग पुन्हा अवतरते की काय? असे उपहासाने म्हणावे लागेल. मात्र या अभिव्यक्तीचा दर्जा इतका सुमार आहे, की त्यावर हसावे की रडावे तेच कळत नाही. या अशा कार्यक्रम व मालिकांमुळे काही वर्षांपूर्वी आलेला सेट टॉप बॉक्सचा महिमा आता संपत आला आहे. त्याची जागा इंटरनेटवर चालणारे फायर स्टिक घेत आहे. अनेक अभिजात दर्शक सेटटॉप बॉक्सला सुट्टी देऊन या नवमाध्यमाकडे वळले आहेत. आताच्या घडीला ऍमेझॉन व नेटफ्लिक्स या आंतरराष्ट्रीय कंपन्याच यात आघाडीवर आहेत. भारतीय कंपन्याही यात उतरत असल्या तरी त्या वृत्तवाहिन्यांच्या व मनोरंजन वाहिन्यांच्याच वेब आवृत्त्या आहेत.
 
नेटफ्लिक्ससारख्या आंतराष्ट्रीय वेबवाहिन्या ज्या दर्जाचे माहितीपट आज सादर करीत आहेत, त्याला तोड नाही. इतिहास, विज्ञान, सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय, वन्यजीवविषयक यासारख्या कितीतरी विषयांवर एकामागोमाग एक अत्यंत दर्जेदार मालिका इथे सादर केल्या जात आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनाचेही मोठे दालन इथे सादर केले जात आहे. त्यामुळे पुढची पिढीही याच माध्यमाची अनुयायी झाली तर अचंबित व्हायला नको. त्यातून काही बोध घेऊन नेताजी बोस यांसारख्या महापुरुषांच्या आयुष्यातले नाट्य चित्रित करण्याचा प्रयत्नही काही भारतीय माध्यमे करीत आहेत पण परिप्रेक्ष्य वाढणे गरजेचे आहे. पुन्हा वळून दूरदर्शन व सरकारी वाहिन्यांचा विचार करायचा झाल्यास इतकी सारी आव्हाने त्यांच्यासमोर आहेत. आता याचा विचार दूरदर्शनसारखे माध्यम कसे करते, ते पाहाणे औचित्याचे ठरेल.
 
@@AUTHORINFO_V1@@