कष्टाला पर्याय नाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2018
Total Views |
 
 
 
स्वप्न बघितले, योजना आखल्या, त्यानुसार कष्ट केले आणि यश खेचून आणले ही संदीप यांची जीवनकहाणी. पण, यशस्वी उद्योजक होणे, हे संदीपसाठी इतके सोपे नव्हते.
 
 
फॅक्टरीमध्ये ५० कामगार आहेत, पण ते कामगार नाहीत, तर माझे कुटुंबातले सदस्य आहेत. कारण, मी त्यांचे सुखदुःख हालअपेष्टा अनुभवू शकतो. त्यांच्याशी मनाने जोडला गेलो आहे. माझ्यासोबत आजही संजय बंडबेसारखा सहकारी आहे. त्याने आणि मी आयुष्य स्वत:च्या पायावर जगण्याची धडपड एकत्र सुरू केली होती,’’ तिर्था ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संदीप वसंत पवार सांगत होते.
 
स्वप्न बघितले, योजना आखल्या, त्यानुसार कष्ट केले आणि यश खेचून आणले ही संदीप यांची जीवनकहाणी. पण, यशस्वी उद्योजक होणे, हे संदीपसाठी इतके सोपे नव्हते. कारण, संदीप यांचे वडील वसंत पवार पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला तर आई गृहिणी. परळच्या कात्रादेवी वसाहतीत संदीप यांचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती अगदीच सुमार. असे असतानाही संदीप पवार यांच्या आईवडिलांनी मुलांना कष्टाचा कानमंत्र दिला. आपल्या गरजा आपल्या कष्टातून पूर्ण कराव्यात असा दंडकच शिकवला. आपण आज झोपडपट्टीत राहतो, पण वेळ येताच आपण चांगल्या परिसरात राहायचे आहे, आज गरिबी असली तरी उद्या आपण सधन व्हायचे आहे, हे स्वप्न आपल्या मुलांच्या मनात, विचारांत पेरत असत.
 
त्याकाळी पवार कुटुंबीयांचे छोट्या पानाच्या टपरीसारखे किराणा मालाचे छोटे दुकान होते. दिवसा आई घरातले सारे काम आवरून ते दुकान सांभाळी. संध्याकाळी कामाहून आले की, ते दुकान बाबा सांभाळत. ‘‘मी घरातलं पण बघू, दुकान पण बघू किंवा मीच दिवसभर कामावर जायचं आणि रात्री आराम न करता दुकानात काम करायचे,’’ असा चुकूनही विचार संदीपचे माता-पिता करत नसत.
 
त्यामुळे कष्ट, संयम आणि व्यवहाराचे गणित संदीप यांना लहानपणापासून मिळाले. एकमेकांना आधार देत पवार कुटुंबीयांतले सर्वच जण चांगले शिकले, पण नोकरी आणि स्वत:चा छोटा का होईना, व्यवसाय यातला मूलभूत फरक संदीप यांनी लहानपणीच जाणला होता. पुढे मोठ्या भावाच्या प्रिंटिंग प्रेससाठी कामे मिळवताना संदीप यांच्या लक्षात आले की, भेटवस्तू त्यातही छोट्या पर्स, लेडिज बॅग्स, ऑफिस बॅग्स यांना बाजार चांगला आहे. बाजारातून कर्जाऊ रक्कम घेऊन संदीपनी पहिल्यांदा धारावीला आणि तिथून पुढे भिवंडीला स्वत:चा बॅग बनविण्याचा कारखाना सुरू केला. तिर्था ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. जवळपास ७० डिझाईन्सच्या बॅग्स या कंपनीत बनतात. संपर्क आणि सातत्याने नावीन्यपूर्ण मार्गाचा अवलंब करत संदीप आपल्या व्यवसायाला नव रूप देण्याचा प्रयत्न करत असतात. ते म्हणतात,’’या पाठी आईवडिलांचे पूर्ण कुटुंबाचे संस्कार स्नेह तर आहेच, पण पत्नी डॉ. स्मार्था हिची वेळोवेळची मोलाची साथही खूप महत्त्वाची आहे, तीने खूप साथ दिली.’’
 
संदीप यांनी ठरवले आहे की, येणार्‍या कालावधीत बॅग्स किंवा तत्सम उत्पादन महिला बचतगटांकडून करून घ्यायचे. महिलांना, बेरोजगार युवकांना या व्यवसायाचे सर्वतोपरी प्रशिक्षण द्यायचे. जेणेकरून ते स्वत:च्या पायावर उभे राहतील. त्यासाठी त्यांनी भिवंडीला कारखान्यात प्रशिक्षण व्यवस्थाही सुरू केली आहे. संदीप पवार यांचे कौतुक वाटते. कारण मी यशस्वी झालो ना बस्स! ‘‘माझ्या यशाचे गमक मी दुसर्‍याला का सांगू?’’ असेच मत बहुतेकांचे असते, पण संदीप याला अपवाद आहेत. ते म्हणतात,’’उत्तम गुणवत्ता, परवडणारी किंमत आणि उत्कृष्ट वेळेत दिलेली सेवा हेच यशाचे गमक.’’ वो सुबह कभी तो आयेगी, म्हणताना त्या सुबहसाठी कष्ट करायलाच हवेत.
 
 
 
- संदीप पवार 
 
@@AUTHORINFO_V1@@