गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतकपूर्ती सोहळ्याला आजपासून सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाची शतकी वाटचाल पूर्ण झाल्यानंतर आता सर्वसामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या हेतूने प्रा. टी. ए. कुलकर्णी यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नावाने १९ फेब्रुवारी १९१८ रोजी स्थापन केलेल्या गोखले एज्युकेशन सोसायटीचा शतकपूर्ती सोहळा सोसायटीच्या नाशिक कॅम्पसमध्ये १२ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.
 
कवी कुसुमाग्रज हे या संस्थेचे विद्यार्थी होते तर नाटककार वसंत कानेटकर यांनी येथे अध्यापन केले आहे. रा. भा. पाटणकर, आंबेकर अशा थोर अध्यापकांची परंपरा संस्थेस लाभली आहे. सध्या नाशिक, पालघर, मुंबई जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेस असा १२३ संस्थांचा मोठा विस्तार असलेल्या या संस्थेत लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षक, शिक्षकेतर मिळून ३ हजारांवर कर्मचारीवृंद संस्थेत कार्यरत आहे. पूर्ण स्वातंत्र्य देऊन चांगले शिक्षण देणार्‍या या संस्थेच्या कृषिक्षेत्रातील कार्याबद्दल केंद्र सरकारचा दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला आहे.
 
कृषिक्षेत्राचा वापर करून दहा हजारांवर रोजगार निर्माण करण्याचा उपक्रम संस्थेने केला आहे. सर्व विद्यार्थी प्रवेशासाठी प्रथम पसंती याच महाविद्यालयांना देतात. सोसायटीच्या शतकपूर्तीनिमित्त सचिव तथा महासंचालक सर डॉ. मो. स. गोसावी आणि सोसायटीच्या मानव संसाधन व्यवस्थापन संचालिका आणि एसएमआरके महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. दीप्ती देशपांडे यांनी विविध कार्यक्रमांची माहिती दिली. यात डॉ. गोसावी यांनी सांगितलेली माहिती वैशिष्ट्यपूर्ण आहे. येत्या दहा वर्षांत स्मार्ट शिक्षण अधिक स्मार्टर बनविण्याची योजना असून त्यासाठी पाच शाळा अविकसित भागात काढण्यात येणार आहेत. तसेच पाच महाविद्यालये वेगवेगळ्या विषयांसाठी उभारली जाणार आहेत. भारतातील आगळेवेगळे ऑडिटोरियम येथे उभारले जाणार आहे.
 
शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त नाशिक कॅम्पसमध्ये सोसायटीच्या वाटचालीचा मागोवा घेणारे ’शतपट’ सचित्र प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. सोसायटीच्या स्थापनेपासून म्हणजे मुंबईच्या गिरणगावात सुरू केलेल्या पहिल्या शाळेपासून प्रत्येक शाळेची, महाविद्यालयाची आणि इतर विविध संस्थांची माहिती, विविध उपक्रम, संस्थापक टी. ए. कुलकर्णी, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, कुलकर्णी यांचे सुरुवातीचे सहकारी आचार्य भिसे, आचार्य दोंदे, चित्रे गुरुजी, सोसायटीचे विद्यमान सचिव सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या योगदानाची माहिती आणि विचारसंदेश इत्यादी विविध बाबींचा प्रदर्शनात समावेश आहे. १२ फेब्रुवारीपासून हे प्रदर्शन खुले करण्यात येणार आहे.
 
शतकपूर्ती आणि शिवजयंतीचे औचित्य साधून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर १२ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची दररोज सायंकाळी सहा वाजता व्याख्याने होतील.
 
शतकपूर्ती सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम १९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार्‍या या मुख्य कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, सन्माननीय अतिथी म्हणून अणु-वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कीर्तनकार चारुदत्त आफळे, उत्तरकाशीचे स्वामी जनार्दन दासजी, पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विजय नारखेडे, लेखिका इंद्रायणी सावकार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोसायटीच्या शतकपूर्तीनिमित्त कॅम्पसमध्ये गुरुदक्षिणा सभागृहाची कोनशिला मान्यवरांच्या हस्ते बसविण्यात येणार आहे. याचवेळी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिवकालीन शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके सादर करण्यात येतील. समारंभात विविध प्रकाशने करण्यात येतील. ’शतंजयी’ स्मरणिका, ’झेनिथ’(महाविद्यालये), ’गॅलंट’(शाळा), ’स्वयंप्रकाश’ (संशोधन नियतकालिक), ’निबोधी’ (सर डॉ. मो. स. गोसावी यांचे इंग्रजीतील आत्मचरित्र), ’रिसोनन्स’, ’स्पेक्ट्रम’, ’अवबोध’, ’सुसंवाद’ इत्यादींचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
 
शतकपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा होणार आहे. सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. आर. एम. कुलकर्णी (नाशिक), डॉ. सुहासिनी संत (मुंबई), प्रभाकर राऊत (पालघर) आदी सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाच्या नियोजनाची धुरा सांभाळणार आहेत. विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी आदी कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेत आहेत. अशा तर्‍हेने मोठा सोहळा नाशिकमध्ये होत असून त्यामुळे शिक्षणक्षेत्रातील विविध उपक्रमांस चालना मिळणार आहे.
 
प्रदर्शनांचे आयोजन - १६ फेब्रुवारीपासून ’विज्ञान-तंत्रज्ञान’ या विषयावर प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. नाशिकरोड महाविद्यालयाच्या वतीने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन १९ फेब्रुवारी रोजी भरविण्यात येणार आहे.
 
विशेष व्याख्यान - दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. सोसायटीच्या स्थापनेचा मागोवा आणि नामदार गोपाळ कृष्ण गोखले, टी. ए. कुलकर्णी यांच्या जीवनकार्यावर प्राचार्य पंडित प्रकाशझोत टाकतील. या कार्यक्रमास उत्तरकाशीचे शंकराचार्य जनार्दन स्वामी यांचा विशेष आशीर्वाद लाभणार आहे.
 
विशेष -
 
* ’शतपट’, शिवकालीन, विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन
* १२ फेब्रुवारीपासून शिवाजी महाराजांवर व्याख्यानमाला
* १९ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यक्रम
* गुरुदक्षिणा सभागृहाचा कोनशिला
* नामदार गोखलेंना पुष्पांजली
* डॉ. माशेलकर, डॉ. काकोडकर,
* डॉ. निगवेकर, स्वामी जनार्दनदासजी आदींची उपस्थिती
 
@@AUTHORINFO_V1@@