चौफेर - छे! छे! अब्दुल्लाजी, भारत तुमच्याच बापाचा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2018   
Total Views |
‘‘भारत हा काय तुमच्या बापाचा आहे का?” असा सवाल छातीठोकपणे करणाऱ्या अब्दुल्लांना जाब कोण विचारू शकतो? आपल्या बापाचा समजून ज्यांनी काश्मिरात कधी इतर कुणाला हस्तक्षेप करू दिला नाही, तिथे कायम आपली मक्तेदारी असावी यासाठी प्रयत्न केलेत, आपल्या बापजाद्याची मालमत्ता समजून स्वत:च्या राजकारणासाठी काश्मिरातील वातावरण दूषित केले, पाकिस्तानची भलावण करीत भारताला शिव्याशाप देण्याचा उपद्व्याप अव्याहतपणे केला... त्या अब्दुल्लांना भारताच्या संदर्भात कुणी सवाल विचारलेला कसा चालेल? त्यामुळे, ‘‘पाकिस्तानचा पुळका आलेल्यांनी तिकडे निघून जावे,” असे मत विनय कटियार यांनी व्यक्त करताच, कुणीतरी चवताळून उठणे, कुणाचीतरी तिखट प्रतिक्रिया येणे अपेक्षित होतेच. अब्दुल्लांच्या श्रीमुखातून ते कडवे बोल परवा उद्धृत झालेत. ‘‘भारत हा काय तुमच्या बापाचा देश आहे का?” असा सवाल विचारताना अब्दुल्लांचा आवेश बघण्यालायक होता. विनय कटियार यांच्या बोलण्यातून त्या अर्थाची भावना का व्यक्त झाली, याच्या खोलात कुणी शिरण्याचे कारणच नव्हते. कारण त्यातून मुस्लिमांची कृत्ये ‘बेनकाब’ झाली असती! तो धोका कोण, कशाला पत्करणार? या देशात हिदूंपासून तर पारश्यांपर्यंत, शिखांपासून तर जैनांपर्यंत, ख्रिश्चनांपासून तर बौद्धांपर्यंत... कित्येक जाती-धर्माचे लोक राहतात. तरीही, वर्तणुकीवर आक्षेप नेमक्या मुस्लिमांच्याच का घेतला जातो, संशय नेहमी मुसलमानांच्याच भूमिकेवर का व्यक्त होतो, हा मुद्दा बोचरा असला तरी महत्त्वाचा आहे. मुस्लिमांच्या एकूणच वागण्यावरून भारतातच कशाला, अगदी अमेरिकेतही अतिशय सावध भूमिका घेतली जाऊ लागली आहे अलीकडे. तिथल्या विमानतळावर शाहरुख खानची तासन्तास झालेली सुरक्षा तपासणी, हा त्याच भूमिकेचा परिपाक असतो. ही अशी बिकट परिस्थिती का निर्माण झाली, हा सवाल खरंतर खूप महत्त्वाचा. पण, त्याच्या उत्तरादाखल मान शरमेने खाली जातच नाही कुणाची. उलट, हा सवाल उपस्थित करणेच गैर मानले जाते इथल्या राजकारणात. मूळ मुद्दा बाजूला ठेवून हा सवालच आक्षेपार्ह ठरविण्याचा निलाजरा प्रयत्न होतो. तो उपस्थित करणाऱ्याकडे मात्र सारा समाज जातीयवाद्यांच्या दृष्टीने बघतो. बुद्धी आणि प्रवृत्तीने संकुचित ठरवून त्याची टर उडविण्यात धन्यता मानणारे राजकारण प्रकर्षाने समोर येते. ते ओवैसी नावाचे सद्गृहस्थ! अंगार ओकणाऱ्या त्यांच्या भाषणातून काय काय बरळून जातात, पण कुणी कधी आक्षेप नोंदवलाय् त्यांच्या भाषणांवर? तसली अंगार प्रवीण तोगडियांनी ओकली की मात्र हंगामा होतो इथे! परवाच्या या प्रकरणातही, ओवैसी काय बोलले, ते किती चुकीचे होते, अशी आग ओकणे इतके महत्त्वाचे अन् गरजेचे आहे काय, असे प्रश्न विचारलेलेही इथल्या राजकारणाच्या रीतीत बसत नाही. उलट, त्यावर आक्षेप नोंदवणाऱ्यांच्या अंगावर मात्र धावून जातात लोक!
भारतात राहून पाकिस्तानबाबत आस्था बाळगण्याच्या प्रवृत्तीचे काय समर्थन करायचे? भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तान जिंकला तर भारतात आतशबाजी का व्हावी? काश्मिरातल्या श्रीनगरच्या लाल चौकात भारतीय सैनिकांवर दगडफेक करणाऱ्यांवर, केवळ ते मुस्लिम आहेत म्हणून कारवाईच करायची नाही का? झालीच कारवाई तर तो तमाम मुस्लिम समूहावरील अन्याय कसा ठरू शकतो? दगडफेकीच्या त्यांच्या कृत्याबाबत निषेधाचा चकार शब्द न काढणारे लोक, पोलिस कारवाई झाली की मात्र ढसाढसा रडतात, सैनिकांद्वारे खातमा झालेल्या एका दहशतवाद्याच्या अन्त्ययात्रेला लाखो लोकांचा समुदाय एकत्र येतो, याबाबत उर्वरित जगाने जरासेही आश्चर्य व्यक्त करू नये, संशय घेऊ नये, हा दुराग्रह कशासाठी? पाकव्याप्त काश्मीरवर कब्जा मिळवण्याची स्वप्नं भारतानं बघू नये, त्यावरील आपला हक्क सोडायला पाकिस्तान इतका कमकुवत थोडीच आहे, अशी वक्तव्ये जेव्हा अब्दुल्लांच्या तोंडून निघतात, तेव्हा त्यातून काय अर्थ काढायचा? हैदराबादच्या कुठल्याशा सभेत ओवैसींनी भारत सरकारला आव्हान देण्याच्या कृत्यावर जराशानेही विरोधी सूर उमटला कुणाचा, तर थेट हमरीतुमरीच्या पवित्र्यात येतात लोक? असे वागणाऱ्यांना इथून निघून जा म्हटलेलेही खपत नाही कुणालाच. इथे अस्तित्वात असलेल्या लोकशाही व्यवस्थेचे स्मरण होते लागलीच सर्वांना. हा देश ‘आपला’ही असल्याची आठवण व्हायलाही वेळ लागत नाही मग. आपल्या चुकीबद्दल एका शब्दाने खंत व्यक्त न करता, उलट इतरांच्या आक्षेपावरच चवताळून उठण्याची ‘आक्रमक’ भूमिका स्वीकारली जाते. आपली चूक झाकून ठेवत, समोरच्या व्यक्तीवर धावून जाण्याचा प्रकार सोपा असतो, त्यांच्यालेखी. कालपर्यंत कायम मतांच्या तराजूत मोजमाप होत राहिलेल्या इथल्या राजकारणात तो प्रकारही खपून जातो. मुजोरी करण्याचा त्यांचा अधिकारच असल्याचा गैरसमज इतरांनी करून घेतला आहे इतक्या वर्षांत. तेही, असली मुजोरी हा आपला घटनादत्त अधिकार असल्याच्या थाटात वावरतात. आपले काही चुकत असल्याचे जाणवतच नाही कुणाला. उलट, ‘‘हा देश तुमच्या बापाचा आहे का?’’ असा सवाल करण्याची हिम्मत होते त्यांची.
बाहेरून आलेल्या ख्रिश्चन आणि पारशी समूहातील लोकांनाही देश सोडून निघून जा, असे सुनावण्याची वेळ कधी या देशात आली नाही. मुस्लिमांच्या बाबतीत मात्र ती वारंवार येते. असे का व्हावे, याचा विचार झाला पाहिजे कधीतरी. डोनाल्ड ट्रॅम्प यांना, मुस्लिम विरोधाची ठाम भूमिका अशी जाहीर रीत्या का घ्यावी लागतेय्, याचा विचार एव्हाना जागतिक पातळीवर होऊ लागला आहे. त्याच्या निष्कर्षाप्रत येईलच सारे जग आज ना उद्या. पण, मुस्लिम दहशतवादाचा बळी ठरलेल्या भारतातही एखाद्या विनय कटियारांवर, मुस्लिमांना असे खडे बोल सुनावण्याची वेळ का यावी, या प्रश्नाचे उत्तर अब्दुल्लांच्या मुजोरीतूनही गवसत नाही. हा देश कटियार यांच्या बापाचा नाही, तर मग अब्दुल्लांच्या तरी बापाचा आहे का, असा सवाल अगदीच अप्रस्तुत कसा ठरेल? यातून, आमचाही या देशावर तितकाच अधिकार आहे, हे ठासून सांगण्याचा जो प्रयत्न त्यांच्या शब्दांमधून ध्वनित होतो, त्यातून अधिकार गाजविण्याची प्रवृत्तीच केवळ अधोरेखित होते. कर्तव्याबाबतचे मोठ्ठे शून्य अद्याप तसेच कायम राहिले आहे.
ज्यांना लंडनमध्ये राहूनही काश्मिरातल्या राजकारणात लक्ष घालावेसे वाटते, तिथल्या राजकीय व्यवस्थेचा वडिलांकडून लाभलेला वारसाहक्क परंपरेने आपल्या मुलाला प्राप्त व्हावा, अशी ज्यांची तीव्र इच्छा असते, ज्यांचा हुर्रियत कॉन्फरन्सच्या माध्यमातून या संपूर्ण प्रांतावर अंकुश ठेवण्याचा मानस, प्रयत्न केला तरी लपून राहात नाही, काश्मीरच्या पलीकडे ज्यांना भारतातील एकही प्रांत अन् कड घ्यायला पाकिस्तानच्या पलीकडे जगातला एकही देश सापडत नाही, त्या फारुख अब्दुल्लांना हा सारा देश ‘आपला’ वाटावा हेही खरंतर आश्चर्यच! खरंतर हा देश प्रत्येकालाच ‘आपला’ वाटावा, हेच कटियार यांनाही अपेक्षित आहे. प्रत्यक्षात तसे घडत नाही, हीच तर खंत आहे! ही कुणाला आपल्या बापजाद्याची संपत्ती वाटावी किंवा ती इतर कुणाच्याही बापाची संपत्ती नाही असे वाटावे, याहीपेक्षा ‘आपलेपणाची’ ती भावना अधिक महत्त्वाची. पण, हा देश आपला मानण्यापेक्षाही हक्क गाजवून तो लुटण्याचीच प्रवृत्ती रुजणे हे अधिक अयोग्य, घातक आणि धोकादायक आहे. अधिकार गाजवायचा असेल, तर हा देश आपला अन् तोंडी भाषा मात्र पाकिस्तानच्या हिताची, असे कसे चालेल? ओवैसी असोत की अब्दुल्ला, यापेक्षा वेगळे काय ध्वनित होते, त्यांच्या बोलण्या-वागण्यातून? का हवाय् त्यांना स्वायत्त काश्मीर? का नाही करायचा भारताने पाकव्याप्त काश्मीरवर दावा? तसा दावा भारत सरकारने करताच पोटशूळ का उठावा भारतातील मुस्लिमांना? आहे उत्तर कुणाकडे? मुस्लिम तरुणाईचा दहशतवादी कृत्यातला सहभाग, त्याला पाकिस्तानकडून मिळणारे पाठबळ, याबाबत बोलणे हा मुस्लिम विरोध ठरतो का?
फारुखसाहेब, हा देश कटियारांच्या नाही, तुमच्या बाचा आहे, असे मान्य करू या! पण, एकदा ते हुर्रियतच्या काळ्या कृत्यांना समर्थन देणे तरी बंद करा. अधिकाराची भाषा तर कायम बोलता. कधीतरी कर्तव्याचेही बोला. तुम्हाला पाकिस्तानपेक्षाही हा देश प्यारा वाटतो, हे वागण्या-बोलण्यातून झळकू द्या तुमच्या. तसे झाले तर, हा देश सोडून निघून जा, असे म्हणण्याची हिंम्मत पुन्हा कुण्या कटियारांना होणार नाही कधी अन् गरजही पडणार नाही त्याची... बस्स! एक बार...
@@AUTHORINFO_V1@@