जेजेचे ‘कास’ प्रदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Feb-2018
Total Views |



नेमेचि येतो मग पावसाळा...॥ या उक्तीप्रमाणेच, सर जजी उपयोजित कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कला प्रदर्शन दि. १३ फेब्रुवारीला सुरु होत असून दि. १८ फेब्रुवारीपर्यंत ते सर्वांना, विनामूल्य पाहण्यासाठी खुले आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात या शासकीय कला महाविद्यालयाचे प्रदर्शन संपन्न होत असते. मात्र, प्रदर्शनातील कल्पनारम्य, आशयगर्भ कलाकृती मात्र दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर बद्ध असतात. म्हणून प्रदर्शन जरी दरवर्षी होत असले तरी त्या प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृती मात्र नाविन्यपूर्ण आहेत.

पण, या कला महाविद्यालयाच्या ८३ वर्षांच्या इतिहासात यावर्षी एक ऐतिहासिक घटना घडली. या वर्षापासून ‘कौन्सिल ऑफ ऍप्लाईड आर्ट स्टुडंटस्’ अर्थात ’CAAS' ‘कास’ या नावाने जेजेच्या जागरुक कला विद्यार्थ्यांनी नोंदणीकृत संस्था स्थापन केली. या संस्थेची धर्मादाय आयुक्त, वरळी मुख्य कार्यालय येथे रितसर नोंदणी करत पॅन नंबर देखील मिळविला. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने उपक्रम राबविण्यास सुलभ झाले. सर्वच अधिकृत आणि कायदेशीर झाल्यामुळे समाजातील विविध संघटनांनी, इंडस्ट्रीने आणि कंपन्यांनी प्रायोजक स्वीकारण्यास तयारी दाखविली. या कामी महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी प्रणीत कांबळे, सर्वेश पवार, यु. आर. विनित महाजन आणि एस. आर. कोमल जयस्वाल या विद्यार्थी प्रतिनिधींनी खूपच मेहनत घेतली.

दि. १३ फेब्रुवारीला उद्घाटन होणार्‍या या प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर आणि प्रमुख अतिथी कमलेश पांडे, फिल्म जगातील पटकथा लेखक आणि कॉपीरायटर म्हणून मोठं वलय असलेली व्यक्ती यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.


या प्रदर्शनामध्ये सुमारे ४० पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रथम वर्ष बी.एफ.ए. (उपयोजित कला) ते एम.एफ.ए पर्यंतच्या वर्गांमध्ये कलाध्यापन करणार्‍या सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना या प्रदर्शनात सहभागी करुन घेण्यात आले आहे. या प्रदर्शनात एकंदर तीन हजार कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
 



पेन्सिल स्केचिंग, पेन्सिल रेंडरिंग, कलर पेन्सिल रेंडरिंग, जलरंग, ऍक्रेलिक रंग, फॅब्रीक रंग, चारकोल, संगणकीय कौशल्यांसह विविध वैविध्यपूर्ण माध्यमांमध्ये कलाकृती साकारलेल्या आहेत, तर पोस्टर्स, मासिक तसेच वृत्तपत्रीय जाहिराती, होर्डिंग्ज, टिव्ही कर्मर्शिअल, पी.पी.टी., थ्रीडी मॉडेल्स प्रतिकृती अशा विविध प्रकारांतून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पना साकारल्या आहेत.

या प्रदर्शनात प्रतिष्ठेचे समजले जाणारे शासनाचे प्रथम पारितोषिक रू ५००० चे आकाश येवले या विद्यार्थ्यास, दुसरे रू ३००० मानसी खाडे आणि तिसरे रू.२००० चे मुकुंद नारकर या विद्यार्थांच्या कलाकृतींना मान मिळाला. उर्वरित पारितोषिके ही रू. एक हजार याप्रमाणे सुमारे ३८ विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहेत.


या प्रदर्शनाचे निमंत्रण पत्र हे सीडी पेपरवर छापण्यात आलेले असून जेव्हा काम झाल्यानंतर रद्दीमध्ये हा पेपर पडल्यास आणि मातीत कुजविल्यास त्यातून पुनश्‍च एखादं फुलाचं रोपटं उगवेल. म्हणजेच, तो पेपर पुन्हा उपयोगात येईल. क्यूआर कोडचा उपयोग करून या वर्षीचे निमंत्रण छापले असून अशा प्रकारचे इकोफ्रेंडली छपाई करून पाहुण्यांना निमंत्रण देणारे अखिल भारतीय भारतातील हे प्रथमच कला महाविद्यालय असेल. अत्याधुनिकता आणि पारंपरिकता यांचा अनन्यसाधारण संबंध म्हणजेच हे निमंत्रण कार्ड होय.
 


या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कॉर्पोरेट जगातील आणि औद्योगिक साहित्य कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जून येत असतात. या प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृती आशयगर्भ असून त्यांच्या कल्पनारम्यतेबद्दल लिखाण करायचे झाल्यास एका ग्रंथनिमिर्तीपर्यंत पोहोचावे लागेल. म्हणून या प्रदर्शनाला समक्ष भेटण्याशिवाय पर्याय नाही. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य खुले असून सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत रोज दि. १८ फेब्रुवारीपर्यंत पाहता येईल. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी अधिष्ठाता संतोष क्षीरसागर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे.

- प्रा. गजानन शेपाळ
@@AUTHORINFO_V1@@