विझत्या दिव्यांची फडफड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018
Total Views |



पश्चिम बंगालमध्ये दहा वर्षांपूर्वी ६ टक्के मते मिळवतानाही भाजपला संघर्ष करावा लागत असे. पण यंदाच्या इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पसंतीचा पक्ष ठरला आणि ममतांच्या पायाखालची वाळू सरकली. भाजपच्या या यशामागचे श्रेय अर्थातच अमित शाह यांचेच. म्हणूनच ममतांनी आता शाह यांची रथयात्रा रोखण्याचा उद्योग केला.


आपल्या अस्तित्वाला आव्हान देणारा कोणी उभा ठाकला की, अस्तित्वहीन होऊ पाहणारा अस्तित्व टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जातो. सध्या हा कोणत्याही थराला जाण्याचा उद्योग तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठ्या जोमाने चालवल्याचे दिसते. विशेष म्हणजे याचा पुनर्प्रत्यय कालपरवाच आला. ममतांच्या विकासविरोधी व तुष्टीकरणाच्या राजकारणाला वैतागलेल्या जनतेला सोबत घेऊन भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वात बंगालमधल्या कूचबिहार येथूनलोकशाही वाचवा’ या नावाने रथयात्रा काढण्यात येणार होती. ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या रथयात्रेच्या माध्यमातून राज्यातील सर्वच २९४ विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचा व ममता बॅनर्जींच्या एकाच धर्मीयांना झुकते माप देण्याच्या राजकारणाचा बुरखा फाडण्याचा भाजपचा मनोदय होता. पण या रथयात्रेमुळे आपल्या सगळ्याच चित्रविचित्र उद्योगांचा पर्दाफाश होतो की काय, या भयाने पछाडलेल्या ममता बॅनर्जींनी शाह यांच्या रथयात्रेला परवानगी नाकारली. उठसूट लोकशाहीचा, संविधानाचा धोषा लावणाऱ्यांनीच आपल्या अशा प्रकारच्या वागण्यातून पक्षीय अभिव्यक्तीचा गळा घोटल्याचेच यावरुन सिद्ध होते. पण ममता पुरोगामी, धर्मनिरपेक्ष टोळक्यातल्या असल्याने विचारवंती गोटातून त्यांच्या रथयात्रा रोखण्याच्या या निर्णयाविरोधात मात्र चकार शब्दही निघाला नाही, हे त्यांच्या वृत्तीला साजेसेच. शिवाय कोलकाता उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर शाह यांच्या रथयात्रेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असे म्हणत रथयात्रेला परवानगी देता येणार नसल्याचे ममता सरकारने सांगितले. सुरुवातीला न्यायालयानेही शाह यांच्या रथयात्रेला परवानगी नाकारली, पण नंतर भाजपने त्याविरोधात पुन्हा अपील केल्यानंतर या प्रकरणी अंतिम निर्णय ९ जानेवारीला घेण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे ममता बॅनर्जी यांना चांगलाच दणका बसला. अर्थात याआधीही न्यायालयाने ममतांच्या आक्रस्ताळ्या राजकारणाला फटकारत त्यांना तोंडावर आपटले होतेच. पण त्यातून कोणताही धडा न घेता ममतांनी आपल्या आततायीपणाचा परीघ अधिकाधिक व्यापक करण्याचाच प्रयत्न केला. आताही तसेच झाले.

 

पश्चिम बंगाल म्हणजे डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असे चित्र गेल्या ३५ वर्षांपासून देशात तयार झाले होते. डाव्यांच्या राजकारण आणि सत्ताकारणाचे वैशिष्ट्य म्हणजे उद्योगधंद्यांना, भांडवलदारांना विरोध करायचा आणि लोकांना आभासी वर्गसंघर्षाच्या नादी लावून आपापसात भिडवायचे. केरळसह बंगालमध्ये डाव्यांनी हाच कित्ता वर्षानुवर्षे गिरवला. डाव्यांच्या याच राजकारणाशी विकासाच्या मुद्द्यावर विरोध करत ममता बॅनर्जींनी झुंज दिली आणि राज्याची सत्ताही आपल्याकडे खेचून आणली. पण ज्या विकासाच्या मुद्द्यावर ममतांनी निवडणूक लढवली व जनतेला प्रगतीची स्वप्ने दाखवली, त्याला ममतांनीच तिलांजली दिली. राज्यात कोणतेही मोठे उद्योगधंदे ममता आणू शकल्या नाहीत, ना रोजगार देऊ शकल्या. उलट रोझ व्हॅली आर्थिक अफरातफर, शारदा चिट फंडासारखे घोटाळे समोर आले. निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाही की, साहजिकच जनता विरोधात जाऊ शकते, हे ओळखलेल्या ममतांनी पुढे नवाच डाव मांडला. विकासाची कुठलीही परिमाणे उभी करू न शकल्याने जनतेला आपल्यामागे खेळवत ठेवण्यासाठी ममतांनी धर्मनिरपक्षतेचा घोष करणाऱ्यांचे लाडके असे मुस्लीम तुष्टीकरणाचे हत्यार उपसले. यातूनच डाव्यांच्या लाल झेंड्याला धुळीस मिळवणाऱ्या जनतेच्या नशिबी ममतांच्या राजकारणाचा हिरवा झेंडा आला आणि तिथल्या मूळ संस्कृतीचा, अस्मितेचा रंग मात्र फिका पडू लागला. ममतांनी आपल्या दाढी कुरवाळू राजकारणाला पोषक खेळी करत दुर्गापूजेवरही निर्बंध घालण्याचा प्रकार केला. मोहरमच्या जुलूससाठी दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीवरही बंधने लादली. दुसरीकडे मालदा, इलम बजार, हाजीनगर, घुलगड, जालंगी, मिदनापूर, बुर्दवान इथल्या दंगलींबाबतही ममतांचे वर्तन हिंदूविरोधीच राहिले. आसाममधील एनआरसीच्या मुद्द्यावरूनही ममतांनी गोंधळ घातला. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या बांगलादेशी मुसलमानांचा कळवळा ममतांना दाटून आला. ममतांच्या या सगळ्याच उचापत्या मुसलमानांना खुश करणाऱ्या आणि हिंदूंना डिवचणाऱ्या होत्या. परिणामी राज्यातल्या हिंदूंची बाजू ऐकणाऱ्या, हिंदूंच्या न्याय्य मागण्यांसाठी लढा देण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या आणि दुसऱ्या बाजूला विकासाचा मंत्र देणाऱ्या भाजपकडे जनमत वळणे स्वाभाविकच होते.

 

मुसलमानांच्या शिरखुर्म्याची चव चाखण्याची हौस बाळगणाऱ्या ममतांना हिंदूंच्या एकत्रित शक्तीचा परिचयदेखील यंदा झालेल्या निवडणुकांत आणि एका संस्थेने केलेल्या जनमत चाचणीवरून आला. आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर ‘सी व्होटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून भाजपला ३१ टक्के मतांसह लोकसभेच्या ४२ पैकी १६ जागा मिळतील, हे समोर आले. या अंदाजानुसार २००९ साली भाजपला मिळालेल्या मतांपेक्षा सहा पट आणि २०१४ च्या मतांपेक्षा दुप्पट मते मिळतील हे स्पष्ट झाले. ‘सी व्होटर’च्या या चाचणीतून भाजप हाच पश्चिम बंगालच्या जनतेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पात्र पक्ष असल्याचे सिद्ध झाले. शिवाय यामुळे भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या २२ जागा जिंकण्याच्या उद्दिष्टालाही बळकटी मिळाली. दुसरीकडे १० वर्षांपूर्वी भाजपला राज्यात जिथे ६ टक्के मते मिळवतानाही संघर्ष करावा लागत असे, तिथे यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला व काँग्रेसला मागे टाकून भाजप राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. भाजपच्या या सगळ्याच यशाचे श्रेय निःसंशयरित्या अमित शाह यांचेच. शाह यांच्या संघटनकौशल्यामुळे आणि कार्यकर्त्यांनी उपसलेल्या कष्टांमुळेच भाजपला बंगालमध्ये ही मजल मारता आली. भाजपच्या या घोडदौडीमुळे अर्थातच सध्या राज्याच्या सत्तेवर ठाण मांडून बसलेल्या ममतांचा जळफळाट झाला नसता तरच नवल! आताच्या अमित शाह यांच्या रथयात्राबंदीमागे ही कारणे आहेत. शाह यांच्या रथयात्रांमुळे आपल्या शिरावरील सत्तासुंदरीचा ताज निखळला तर? आपल्या मुस्लीम लांगूलचालनाचा चेहरा उघडा पडला तर? आपल्या विकासविरोधी नीती-धोरणांना जनतेसमोर नेत भाजपचा वारू चौखूर उधळला तर? अशी प्रश्नांची मालिकाच ममतांच्या डोळ्यासमोर नाचू लागली. परिणामी आतापर्यंत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली खेळलेल्या जातीयवादी राजकारणाची तिरडी बांधली जाणार, या चिंतेतून ममता बॅनर्जींसारख्या विझत्या दिव्यांनी शेवटची फडफड करत अमित शाह यांची रथयात्रा रोखण्याचे काम केले. पण उगवणाऱ्या सूर्याला तुम्ही पांघरून घेऊन झाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो उगवतोच आणि तळपतोही! हे ममतांनी लक्षात ठेवलेले बरे!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@