मेहरुण तलाव बनतोय जीवघेणा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018
Total Views |

प्रशासनाचा कानाडोळा, पाण्यात साचलाय गाळ आणि शेवाळ


 
 
जळगाव : 
 
शहरातील मेहरुण तलाव परिसरात अनेक तरुण फिरायला येतात. त्यातच शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी तरुण युवक-युवतींची मोठी गर्दी असते.
 
पण या तलावातील पाण्यात शेवाळ आणि गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. शेवाळामुळे पाण्यात पाय घसरुन पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे.
 
अशा घटना घडल्याही आहेत. दिवसेंदिवस मेहरुण तलाव जीवघेणा बनत आहे. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
 
 
येथे तलावात पोहण्यासाठी शहरातील अनेक तरुण कधीकधी येतात. काही वेळा त्यांच्यासोबत नवखे तरुणही पाण्यात उतरतात. दरम्यान, काही अनुचित प्रकार घडल्यास परिसरात दूरवर कोणीही दिसत नाही.
 
 
त्यामुळे काही अघटित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारतात. तलाव परिसरात सुरक्षारक्षक नियमित असावा, असे अनेक नागरिकांनी ‘तरुण भारत’शी बोलतांना सांगितले.
 
शहरातील मुख्य आकर्षण म्हणून मेहरुण तलावाकडे बघितले जाते. गणेशोत्सव आणि दुर्गोत्सवनिमित्त मनपा प्रशासनाकडून मेहरुण तलावातून गाळ काढण्यात येतो.
 
परंतु त्यानंतर गाळ साचत जातो. गाळ काढण्याची प्रक्रिया दरमहा व्हावी जेणेकरुन पाण्याचा साठा वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
रोडरोमियोंचा वाढता वावर
 
तलाव परिसरात शहरातील अनेक तरुण मुलं-मुली येत असतात. तसेच रोडरोमियोंचाही याठिकाणी वावर वाढला आहे. क्षुल्लक कारणावरुन त्यांच्यात वाद होत असतात.
 
वाद वाढल्याने अनेकवेळा मारहाण आणि शिवीगाळ होते. त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, पोलीस व्हॅन परिसरात फिरत असते परंतु पुन्हा त्यांचे तेच व्यवसाय सुरु असतात. यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी आहे.
 
 
शहरातील अनेक स्विमिंग टँक बंद
 
शहरातील अनेक स्विमिंग टँक बंद अवस्थेत आहेत. मेहरुण परिसरातील शासकीय स्विमिंग टँक बर्‍याच महिन्यापासून बंद पडलेला आहे. त्यामुळे पोहण्याचा छंद असलेल्या जळगावकरांना जवळच दुसरा पर्याय मिळत नाही. हा स्विमिंग टँक लवकर सुरु करावा, अशीही मागणी होत आहे.
 
परिसरात अस्वच्छता
 
सुट्टीनिमित्त किंवा मित्रांसोबत अनेकजण मेहरुण तलाव परिसरात येतात. परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छता आहे. त्यामुळे दूरवर दुर्गंधी पसरलेली असते. त्यातून डासांची उत्पत्ती होत असून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. परिसरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात यावी अशीही मागणी होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@