आम्ही भीक मागत नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018
Total Views |



राम मंदिरासाठी सरकारने कायदा करावा


नवी दिल्ली : आम्ही राम मंदिरासाठी भीक मागत नसून राम मंदिर हा आमचा अधिकार आहे आणि त्याचसोबत संसद आणि सरकारची ती जबाबदारीदेखील आहे, असे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी नवी दिल्ली येथे केले. नवी दिल्ली येथील रामलीला मैदान येथे विश्व हिंदू परिषदेद्वारा आयोजित धर्म सभेमध्ये भैय्याजी बोलत होते.

 

या धर्मसभेच्या अध्यक्षस्थानी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये महामंडलेश्वर स्वामी परमानंद, जगतगुरू रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्य, साध्वी ऋतंभरा, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार, उपाध्यक्ष चंपत राय, स्वामी चिन्मयानंद सरस्वती, स्वामी अनुभूतानंद, महामंडलेश्वर स्वामी शाश्वतानंद, दिल्ली आर्य प्रतिनिधी सभेचे महामंत्री विनोद आर्य, नामधारी सद्गुरू दिलीप सिंह, जैन मुनी लोकेश मुनी, आचार्य दीपांकर आदींसह लाखो रामभक्त उपस्थित होते. यावेळी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी म्हणाले की, आम्ही काही राममंदिरासाठी भीक मागत नाही. राममंदिर हा आमचा अधिकार आहे. न्यायव्यवस्था आणि न्यायालयाची प्रतिष्ठा कायम राहायला हवी. तसेच, न्यायव्यवस्था आणि राजकीय सत्ता या दोघांनीही आपले संपूर्ण सामर्थ्य वापरून जनभावनेच्या उपेक्षेऐवजी तिचा सन्मान केला पाहिजे. तरच लोकांचा त्यांच्यावरील विश्वास कायम राहील. ‘मंदिर वहीं बनायेंगे’ हा सत्तारूढ पक्षाचाही संकल्प असल्याची आठवणही भैय्याजी जोशी यांनी यावेळी करून दिली.

 

धर्मसभेचे अध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी म्हणाले की, राममंदिरासाठी दिल्लीमध्ये जमलेल्या या जनसागराने इतिहास घडवला आहे. ‘राम’ हा हिंदू समाजासाठी मुक्ती मंत्र आहे आणि चेतना आहे. राममंदिरासाठी एकत्र झालेल्या या भावनांना सरकार आणि न्यायालयाने समजून घ्यायला हवे व त्यांचा सन्मान करायला हवा. अवधेशानंद गिरी यांनी यावेळी उपस्थित रामभक्तांना राममंदिर निर्माणासाठी संकल्पही दिला. स्वामी परमामंद महाराज यावेळी म्हणाले की, आम्ही कोणाचीही चापलुसी करत नाही. परंतु, जर राममंदिर उभारले गेले नाही, तर रामभक्त शांत बसणार नाहीत. जर भाजपवर हा आरोप होतो की ते केवळ निवडणुकीपुरता राममंदिराचा मुद्दा उचलतात, तर मग राममंदिर निर्माणासाठी सहकार्य करून भाजपने या आरोपाचा मुद्दा संपवून टाकायला हवा, असेही परमानंद यांनी स्पष्ट केले. स्वामी हंसदेवाचार्य म्हणाले की, आमच्यासाठी राममंदिरासाठीचा कायदा किंवा अध्यादेश सोडता सध्या काहीही स्वीकारार्ह नाही. जर राममंदिर ही न्यायालयाची प्राथमिकता नाही तर न्यायालय रामनवमीच्या दिवशी सुट्टी का घेतात, असा प्रश्न विचारत हंसदेवाचार्य यांनी न्यायालयाला टोला लगावला.

 

राममंदिर हा निवडणुकीचा नव्हे, आत्मसन्मानाचा मुद्दा

 

राम मंदिर हा निवडणुकीचा नव्हे तर आत्मसन्मानाचा मुद्दा असल्याचे प्रतिपादन विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले. न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा अनंत काळापर्यंत केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, संसदेने जनतेच्या आकांक्षांना डोळ्यासमोर ठेऊन राममंदिर निर्माणासाठी कायदा करावा, असेही आवाहन कोकजे यांनी यावेळी केले. विहिंपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कर्तव्याची अवहेलना करण्याऐवजी जनतेच्या आकांक्षांचा सन्मान करावा. तसेच, सर्व राजकीय पक्षांनी राम मंदिरासाठी आपला पाठींबा देऊन संसदेने येत्या हिवाळी अधिवेशनातच राममंदिर उभारणीसाठी कायदा करावा, अन्यथा आगामी निवडणुकांत जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही आलोक कुमार यांनी यावेळी दिला. विश्व हिंदू परिषदेतर्फे आयोजित या धर्मसभेसाठी राम भक्तांनी पहाटे चार वाजल्यापासूनच रामलीला मैदानावर एकत्र येण्यास सुरूवात केली होती. सभा सुरू होण्याच्या एक तास आधीच रामलीला मैदान गर्दीने भरून गेले होते.

 

आम्ही काही राममंदिरासाठी भीक मागत नाही. राममंदिर हा आमचा अधिकार आहे. न्यायव्यवस्था आणि राजकीय सत्ता या दोघांनीही आपले संपूर्ण सामर्थ्य वापरून जनभावनेचा सन्मान केला पाहिजे. मंदिर वहीं बनायेंगे’ हा सत्तारूढ पक्षाचाही संकल्प आहे.”

भैय्याजी जोशी, सरकार्यवाह, रा. स्व. संघ

 

सर्व राजकीय पक्षांनी राम मंदिरासाठी आपला पाठींबा द्यावा आणि संसदेने येत्या हिवाळी अधिवेशनातच राममंदिर उभारणीसाठी कायदा करावा, अन्यथा त्यांना आगामी निवडणुकांत जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

आलोक कुमार, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष, विहिंप

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@