तपकिरी सोनं!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018   
Total Views |



 
 

शहरात झाडांची वाळलेली पानं सर्रास जाळून टाकली जातात. त्यामुळे अगोदरच होत असलेल्या हवेच्या प्रदूषणात आणखी भर पडते. पुण्याच्या अदिती देवधर यांनी या समस्येवर एक रामबाण उपाय शोधला आहे आणि यशस्वी करून दाखवला आहे. जाणून घेऊया त्याबद्दल...

 

अलीकडे पुण्यात सकारात्मक आणि कृतीशील अशा पर्यावरण चळवळीने बाळसं धरलं आहे, ज्यात प्रकाश गोळे यांनी स्थापन केलेल्या 'इकॉलॉजिकल सोसायटी'चा मोठा वाटा आहे. दिती देवधर या इकॉलॉजिकल सोसायटीच्याच माजी विद्यार्थिनी. सध्या त्या पुण्यात 'ब्राऊन लीफ' (Brown Leaf) नामक एक अभिनव उपक्रम चालवतात, असं माझ्या कानावर पडलं होतं. हा नेमका कसला उपक्रम आहे ते जाणून घेण्यासाठी गेल्या आठवड्यात एका संध्याकाळी मी त्यांच्या घरी गेलो. सुमारे तासभर चाललेल्या गप्पांमध्ये दितीताईंनी ब्राऊन लीफ' बद्दल अगदी सविस्तर सांगितलं. सोबतीला चहा, पोहे आणि दाणेकुटाचा लाडू अशी रेलचेल असल्यामुळे गप्पा छानच रंगल्या!

 

मी: 'ब्राऊन लीफ' हा नेमका काय उपक्रम आहे?

 

दितीताई : 'ब्राऊन लीफ' हा झाडांच्या वाळलेल्या पानांची देवाणघेवाण करण्याचा उपक्रम आहे. शहरात सोसायट्यांच्या आवारात झाडांची पानगळ होऊन खाली खूप पातेरा पडतो. साफसफाई करताना ही पानं जाळून टाकली जातात. पण पानं जाळून टाकणं पर्यावरणदृष्ट्या योग्य नाही. पुण्यात आम्ही असा प्रकल्प केला आहे की, वाळलेली पानं सोसायट्यांनी पोत्यात भरून ठेवायची आणि ज्यांना कंपोस्ट खताची जरूर आहे त्यांनी ती घेऊन जायची. 'वाळलेल्या पानांचं काय करायचं?' हा प्रश्न सोसायट्यांपुढे आहे. तसंच 'कंपोस्ट खत कुठून मिळवायचं?' हा प्रश्न शहरात बागबागायती करणाऱ्यांसमोर आहे. या दोघांचा परस्परांशी संपर्क घडवून आणून पानांची एक मागणी-पुरवठा साखळी (Demand-Supply Chain) 'ब्राऊन लीफ' उपक्रमांतर्गत केली गेली आहे. यासाठी मी एक वेबसाईट, फेसबुक पेज आणि व्हॅट्स अॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर पानं उपलब्ध असणारे (Leaf Donor) आणि पानं हवी असणारे (Leaf Taker) असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. ज्याच्याकडे वाळलेली पानं असतील त्याने ती पोत्यात भरून ठेवायची आणि ग्रुपवर तसा मेसेज टाकून ठेवायचा. ग्रुपवरच्या ज्याला ती हवी असतील त्याने ती त्याच्या घरी जाऊन घेऊन जायची. यात कुठलीही पैशाची देवाणघेवाण होत नाही. Mulch-Compost-Donate ही ब्राऊन लीफप्रकल्पाची त्रिसूत्री आहे. म्हणजे झाडाची गळलेली पानं झाडाच्याच मुंधात पसरायची (Mulch) किंवा त्याचं सेंद्रिय खत करायचं (Compost), किंवा ज्याला ती हवी आहेत त्याला ती द्यायची(Donate).

 

मी : ही कल्पना तुम्हाला कशी सुचली, सुरुवात कशी झाली आणि लोकांचा प्रतिसाद कसा मिळत गेला?

 

दितीताई : आमच्या इमारतीच्या आवारातच वावळाचं एक मोठं झाड आहे. अनेक पक्षी, कीटक, खारी याचं ते आश्रयस्थान आहे. साधारणतः नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान या झाडाची भरपूर पानगळ होते. तीन वर्षांपूर्वीपर्यंत हा सगळा पातेरा गोळा करून जाळून टाकला जायचा. २०१२-१३ साली इकॉलॉजिकल सोसायटीचा Sustainable Management of Natural Resources and Nature Conservation हा कोर्स केल्यानंतर जाणवायला लागलं की, विघटनशील असलेला पालापाचोळा जाळणं चुकीचं आहे. म्हणून आमच्या सोसायटीतल्या सफाई करणाऱ्या मावशींना सांगून तो पातेरा जाळणं अगोदर बंद केलं. पण आता प्रश्न पडला की, या गोळा केलेल्या पातेऱ्याचं करायचं काय? म्हणून मी सर्व व्हॉट्स अॅप ग्रुप्सवर ''वाळलेली पानं माझ्याकडे आहेत त्याचं काय काय करता येऊ शकतं?'' असा एक मेसेज केला. त्यावर सुजाता नाफडे नावाच्या माझ्या एका मैत्रिणीचं उत्तर आलं की, तिला तिच्या घराजवळ भाजीपाल्याची शेती करण्यासाठी कंपोस्ट खताची गरज आहे. म्हणून ती एक दिवस गाडी घेऊन माझ्याकडे आली आणि चार-पाच पोती पानं घेऊन गेली. थोड्या दिवसांनी ती नेमकं काय करते ते पाहायला मी तिच्याकडे गेले. तिच्या घरासमोरच्या प्लॉटवर माझ्याकडून नेलेल्या पातेऱ्यापासून बनवलेल्या सेंद्रिय खतावर कोबी, वालाच्या शेंगा अशा टवटवीत भाज्या जोमाने वाढलेल्या पाहिल्या. ही घटना माझ्यासाठी eye-opener ठरली. त्यानंतर मी गच्चीवर बाग करणाऱ्या अनेक लोकांशी संपर्क साधला आणि २०१६च्या फेब्रुवारीमध्ये या उपक्रमाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. कंपोस्ट खत बनवण्याविषयची काही पुस्तकं मी वाचली आणि ती पूर्ण प्रक्रिया समजून घेतली. मुंबईचे अनिरुद्ध देशपांडे, अंजली लेले, रीना पटवर्धन, सुचित्रा दिवाण, सेजल शेठ, कीर्ती भावे, वसंत टोळे, नीला पंचपोर, अनुराधा गानू अशा अनेक लोकांची मदत आणि मार्गदर्शन मला मिळालं. पानांची देवाणघेवाण सुरु झाल्यानंतर बागबागायती करणारे कंपोस्ट खतावर फुलवलेली बाग आणि पिकवलेल्या भाज्यांचे फोटो टाकायला लागले. मग लोकांचा या उपक्रमावरचा विश्वास वाढायला लागला आणि प्रतिसादही चांगला मिळत गेला. आमच्या सोसायटीतही आम्ही तीन कंपोस्टर्स तयार केले आणि सोसायटीच्या आवारात पडणाऱ्या पानांचं इथेच खत तयार करणं सुरु केलं. अशा पद्धतीने हा उपक्रम अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे वाढत गेला. गेल्या वर्षभरात या उपक्रमांतर्गत आम्ही ५ हजार पोती पानांची देवाणघेवाण केली.

 

मी : या उपक्रमाचा प्रसार करण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करता?

 

दितीताई : मी एक www.brownleaf.org नावाचं एक मेंबरशिप संकेतस्थळ सुरु केल आहे, ज्यावर कंपोस्टिंगसंदर्भात खूप सारी माहिती वाचायला मिळते. हे संकेतस्थळ म्हणजे एक 'मुक्त मार्गदर्शन केंद्र' आहे. या संकेतस्थळावर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून माहितीचं आणि अनुभवांचं आदानप्रदान होत. शिवाय वाळलेल्या पानांचं आदानप्रदान, जे आत्तापर्यंत फक्त पुण्यातच होतंय ते अख्या भारतामध्ये व्हावं यासाठी एक प्लॅटफॉर्म या वेबसाईटच्या माध्यमातून उभा करण्यात आला आहे. भारतातला कुठलाही leaf donor याच्यावर नोंदणी करू शकतो आणि त्याच्या जवळपास असलेला leaf taker त्याच्याकडून पानं घेऊन जाऊ शकतो. तसंच याच वेबसाईटवर फुलं, फुलपाखरं, कीटक यांचं एक Identification Guide तयार केलं आहे. आपल्या बागेत आणि परिसरात सर्वसाधारणपणे आढळणारी फुलं, फुलपाखरं, कीटक, तसंच कंपोस्टिंग करणारे किडे यांची फोटोसहित नावं आणि वैशिष्ट्य यांचा एक संग्रह त्या गाईडमध्ये आहे. शिवाय ज्यांना आपल्या घरात किंवा सोसायटीत कंपोस्टिंग करायचंय त्यांना मी व्यक्तिशः मार्गदर्शनही करते. कंपोस्टिंगबाबत मार्गदर्शक ठरेल असं ‘Dry Leaf Composting Guide’ मी लिहिलं आहे.

 

मी : तुमच्या या उपक्रमाचं पर्यावरणीय महत्त्व काय ?

 

दितीताई : पानगळ ही झाडांची एक स्वाभाविक जीवनक्रिया आहे. झाडांची पानं श्वसनाची क्रिया करतात, तेव्हा बाष्पीभवन होऊन झाडातल्या पाण्याचं प्रमाण कमी होतं, ज्याला evapotranspiration म्हणतात. कोरड्या ऋतूत हे बाष्पीभवन होऊ नये आणि जास्तीत जास्त पाणी झाडात टिकून राहावं यासाठी झाड पानं गाळून टाकतं. भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात म्हणूनच पानगळीचं प्रमाण जास्त आहे. पानगळीमुळे जमिनीवर पानांचा थर तयार होऊन जमिनीची धूप रोखली जाते, जमिनीत ओलावा टिकून राहतो, शिवाय पानांखाली अनेक सूक्ष्मजीव आणि कीटक यांची वाढ होते. गळलेल्या पानांमध्ये झाडाने शोषलेली काही पोषणद्रव्य असतात. पानं कुजल्यानंतर हीच पोषणद्रव्य पुन्हा मातीत मिसळतात आणि झाडांनाच मिळतात. निसर्गात मुळात कचराही संकल्पनाच नाही. निसर्गातल्या एका घटकाने उत्सर्जित केलेले पदार्थ दुसऱ्या घटकासाठी खाद्य असतात. ही चक्रीय प्रक्रिया (cyclical process) जंगलात किंवा खेडेगावांमध्ये होते, पण शहरात हे शक्य नाही. 'ब्राऊन लीफ' उपक्रमाचं महत्त्व हेच की, शहरात होणाऱ्या पानगळीचं कंपोस्ट खत केल्यामुळे ही पोषणद्रव्य परत झाडांनाच मिळतात आणि निसर्गचक्र अविरत चालू राहतं. शिवाय पानं जाळावी लागत नसल्यामुळे प्रदूषणालाही आळा बसतो. आणखी एक फायदा म्हणजे शहरात कंपोस्टवर तयार केलेल्या बागेत फुलपाखरं आणि पक्षी भरपूर येतात आणि शहरातही जैवविविधता जपली जाते.

 

मी : शहर स्वच्छतेबाबत नागरिकांची कर्तव्य काय सांगाल?

 

दितीताई : लोकांनी थोडं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. आपल्या घरातला बराचसा कचरा हा विघटनशील असतो. हा कचरा कचराकुंडीत टाकता कामा नये. आपल्या जवळपास जिथे कंपोस्टिंगची व्यवस्था असेल तिथे तो आपण दिला पाहिजे. कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीसाठी प्रत्येकाने पुरेसा वेळ द्यायला हवा. केवळ शासनाला वा प्रशासनाला दोष देऊन उपयोग नाही, तर माझ्या घरात कमीत कमी कचरा कसा होईल याची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@