उपाय आहे, त्यांना घरी बसवणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2018   
Total Views |



संविधान बदलण्याचे भाजपचे षड्यंत्र हाणून पाडा, असे जाणतेपणाने अजाणत्या राजाने म्हटले आहे. तथाकथित पुरोगामी आणि निधर्मी नसलेल्या व्यक्तींनी (म्हणजे आपण हो) वयाने ज्येष्ठ असलेल्या कोणाही व्यक्तीचा आदरच करायचा असतो. त्यानुसार शरद पवार साहेबांचाही आदरच करायला हवा. तसेही साहेबांच्या बोलण्यावरूनच ११९३ बॉम्बस्फोटाचे सत्य दोन दशकांनंतर जनतेला कळले. साहेबांच्या मते सगळेच स्फोट हिंदू वस्तीत झाले होते, उगीच एका धर्मालाच टारगेट केले, असे वाटू नये म्हणून मुस्लीम वस्तीतही स्फोट झाला, असे त्यांना त्यावेळी सांगावे लागले. पवारांनी सत्य लपवले. तसेही सत्य, विश्वास ही मूल्ये सगळ्यांच्याच जीवनात असतात का? याचे उत्तर हवे असेल तर अभ्यासूंनी आणि चिकित्सकांनी शरद पवारांचे आयुष्य अभ्यासावे. असो, विषयांतर झाले. तर शरद पवारांना वाटते की, भाजप सरकार संविधान बदलणार आहे. त्यांना तसे का वाटते? अर्थातच स्वभावाप्रमाणे ते सांगणारच नाहीत. तसेही मागच्या तीन चार वर्षांपासून (म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने गटांगळ्या खाल्ल्यापासून) संविधानाशी सुतराम संबंध नसलेल्या विषयावर वादळ निर्माण करण्याची देशात नुसती चढाओढ निर्माण झाली आहे. ज्यांना सत्तेत वाटा मिळाला नाही, त्या नैराश्यग्रस्तांमध्येच ही चढाओढ निर्माण झाली आहे, हे सांगायला नकोच. या लोकांना सत्ताधारी पक्षाच्या विरोधातले काही मुद्दे मिळतात की नाही? कारण, सगळे विरोधी पक्षाचे नेते संविधान बचाओ, संविधान बचाओ म्हणत अचानक जागे झाले आहेत. या सगळ्याचा उद्देश संविधान प्रेम नसून संविधानाआड समाजात वैचारिक अस्थिरता माजवण्यावर आहे. तसे नसते तर संविधान बचाव म्हणताना या सगळ्यांनी संविधानाला धोका कसा आहे, संविधानाची चौकट का, कशी आणि कोणत्या कलमानुसार मोडली जाणार आहे, हे सांगितले असते. पण शरद पवारांसकट सगळे ‘संविधान बचाव’वाले हे कोणीही सांगताना दिसत नाहीत. कसे सांगणार, कारण मुळात संविधान पूर्ण शक्तीनुसार अबाधित आहे आणि त्याला कोणताही धोका नाही. खरे तर संविधान ‘खतरें में’ नाही तर संविधानाच्या नावाने राजकारण करत, लोकभावनांशी खेळणारे राजकारणी ‘खतरें में’ आहेत. या संधिसाधू राजकारण्यांना संवैधानिक मार्गाने पुन्हा घरी बसवणे, हाच संविधान बचावसाठीचा मोठा उपाय आहे.

 

स्मशानातले उथळ लग्न

 

आ. सतीश जारकिहोळ आणि मानव बंधुत्व संघटनेच्या पुढाकाराने नुकताच बेळगावच्या सदाशिवनगर स्मशानभूमीत एक आंतरजातीय विवाह पार पडला. वरकरणी पाहता असे दिसते की, स्मशानात लग्न लावले तर लोकांना भुताची, स्मशानाची भीती वाटणार नाही. यासाठी हा स्मशानविवाहाचा उपक्रम असावा. पण खोलात गेल्यावर या घटनेचे अनेक कंगोरे दिसून येतात. मुळात जातीअंताच्या लढाईत आंतरजातीय विवाह हे प्रमुख साधन आहे. पण विवाह हा दोन कुटुंबांचा आणि अगदी दोन जिवांचा खूप खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. तो काही प्रदर्शनाचा, जाहिरातबाजीचा विषय नसतो. या विवाहाच्या आडून राजकारणी आ. सतीश जारकिहोळ यांनी स्वतःच्या नावाचे सूप चांगलेच वाजवून घ्यायचा प्रयत्न केला आहे. असो, दुसरा मुद्दा असा की, या विवाहित नवदाम्पत्यास आ. जारकिहोळ यांनी ५० हजार रुपये रोख आहेर दिला. सगळ्यांना माहिती आहे की, हुंड्याप्रमाणेच आहेर ही अशी पद्धत आहे की त्यामुळे सर्वसामान्य भारतीय समाजाला कर्जही काढावे लागते. या आहेराचे प्रस्थ काय असते, हे भारतीय समाजाला माहिती आहे. या विवाहात आहेरही दिला गेला. या गोष्टींमुळे स्मशानातल्या विवाहाचा उथळपणा लक्षात येतो. स्मशानात विवाह केला म्हणून समाजात काही बदल होणार आहे का? देशभर, महाराष्ट्रात तर सोडाच अगदी बेळगावच्या सदाशिवनगरीत तरी स्मशानात विवाह करण्याची प्रथा पडणार आहे का? नाहीच पडणार. अण्णाभाऊ साठेंनी ‘स्मशानातलं सोनं’ ही कथा लिहिली होती. त्या कथेतले नायक आजही समाजात जिवंत आहेत. त्याचप्रमाणे मसनजोगी म्हणवून घेत स्मशानात राहणारा समाज आजही वंचितांचे गूढ आयुष्य जगत आहे. स्मशानात केलेल्या विवाहाने यापैकी कुणाचेही जीवन बदलेल का? अर्थात फुकटची प्रसिद्धी मिळवू पाहणार्‍यांना समाजाच्या या दुःखाशी काही देणेघेणे नसेलच. कारण समोर एक चिता जळत असताना या लोकांनी चितेसमोरच मंगलाष्टकं म्हणत विवाह केला. ज्यांच्या घरी तो मृत्यू झाला, ते घर या गावातलेच असणार. गावातल्या परिचित बांधवांचे दुःखही यांच्या मनाला भिडले नाही तर परिघाबाहेरच्या समाजाचे दुःख यांना काय जाणवेल? असंवेदनशील आणि प्रसिद्धीला हपापलेल्या या लोकांचा आणि विवाहाचा निषेध!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@