मातृभाषेतून संस्कारयुक्त शिक्षण देणारी ‘किलबिल’ अ‍ॅकेडमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

रावेरच्या वृंदावनधामनगरात विद्या भारती शाखेचा आनंदायी उपक्रम: सुसज्ज निवासी शाळा उभारण्याचा संकल्प


 
रावेर : 
 
बालकांना संस्कारासह उत्तम माणूस घडविणारे शिक्षण मातृभाषेतून आणि तेही हसत खेळत , विनाताण देण्याचे कार्य कर्तव्यभावनेने बजावत आहे यशवंत प्रतिष्ठान रावेर संचलित आणि अखिल भारतीय शिक्षा संस्थान नवीदिल्ली संचलित विद्या भारती, देवगिरी प्रांताचा ‘किलबिल अ‍ॅकेडमी’ हा सेवाभावी प्रकल्प.
 
रावेर-बर्‍हाणपूर मार्गावर इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपसमोरच्या परिसरातील वृंदावनधाम नगरात ही ‘किलबिल अ‍ॅकेडमी’ आहे. तिची 2005 मध्ये उभी राहिलेली नवी देखणी व कलात्मक समर्पक चित्रशैली चितारलेली आणि गेल्या दिवाळीनिमित्त लहानशा आकाशकंदिलांनी नटवलेली वास्तू प्रथमदर्शनीच कुणीही प्रेमात पडावी आणि प्रभावित व्हावी, एवढी छान आहे.
 
यशवंत प्रतिष्ठान रावेर संचलित आणि अखिल भारतीय शिक्षा संस्थान नवीदिल्ली संचलित विद्या भारती, देवगिरी प्रांताचा हा सेवाभावी व उदात्त भावनेने कार्यरत प्रकल्प आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांतर्फे व्यापक सामाजिक हिताच्या विचाराने 2011 मध्ये किलबिलची स्थापना झाली. उद्घाटन तत्कालीन कुलगुरु प्रा.डॉ. के.बी.पाटील आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप रामू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
 
विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते निलेश चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. त्यांच्या मातोश्री सुमनताई या सचिवपदाची जबाबदारी मातेच्या ममतेने पाहताहेत.
 
प्रधानाचार्य , प्राचार्या आहेत उच्च विद्या विभूषित (एम.ए., डी.एड.,बी.एड सौ.नयना निलेश पाटील. त्यांच्या मदतीला अध्यापनासाठी आचार्य म्हणून 8 सहकारी आहेत.
 
त्यांच्या अध्यापनातील मातेचा भाव, वेगळेपण, कुशलता कौतुकास्पद आहे, असा एकूणच विद्यार्थी व पालकांचा अनुभव, सूर आहे. सध्या प्लेगृप, नर्सरी, के.जी.-1, के.जी.-2 एकूण असे 4 वर्ग असून विद्यार्थी संख्या एकूण 100 वर आहे.
 
जो आधी त्याला प्रवेश...असे सूत्र असल्याने संबंधित पालक ‘प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार?...’ या घोषणेकडे नजर ठेवून असतात.
 
 प्रथम दर्शनी प्रधानाचार्याचे कार्यालय आहे. आणखी 3 खोल्या आणि बेचेंसची बैठक असलेला 1 वर्ग आहे. सर्वच वर्गखोल्या पाठांतरासाठी उपयुक्त, विविध तक्ते, चित्रमय तक्ते आणि कलात्मक, हस्तकौशल्यात्मक वस्तूंनी सजलेल्या आहेत.
 
 
सुंदर सुविचार आहेय. बालमन आणि देहधर्म लक्षात घेऊन आवश्यक बाब म्हणून 2 स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे. अर्थात तेही स्वच्छ आहेत.
 
कल्पक उपक्रम
 
सुजाण, जागृत, ज्ञानी, बहुश्रुत नागरिकांची जडणघडण व्हावी, या हेतूने भारतीय संस्कार व संस्कृतीची जपणूक वर्षभर विविध उपक्रम होतात. पहिल्या दिवशी सरस्वतीपूजन होते. मातृसंस्था रा.स्व.संघाचे वर्षभरातील 6 प्रमुख उत्सव साजरे होतात. शिवाय कृष्णाष्टमी, शिक्षक दिन, गुरुपौर्णिमाही साजरी होते. चिमुरड्यांचा आनंद विलक्षण असतो.
 
निवासी विद्यालयाचे स्वप्न
 
भविष्यात अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज निवासी विद्यालय, उद्यान, सभागृहासह उभारण्याची जिद्द आहे. त्यासाठी शासकीय व सोयीची जागा मिळावी, याकामी सर्वच लोकप्रतिनिधी,दानशूर, समाजसेवी संस्था आणि नागरिकांची भरीव मदत मिळावी, अशी विश्वस्त, कार्यकर्ते व स्नेहीजनांची अपेक्षा आहे.
 
अनुदान मिळण्याचीही आस
 
शैक्षणिक विश्वातील तसेच नोकरी-रोजगारविषयक तीव्र स्पर्धा विचारात घेता रावेरसारख्या निमशहरी क्षेत्रातील आणि ग्रामीण भागातील मुलांना मातृभाषेतून सहजसोप्या रितीने शिक्षण मिळायला हवे आहे. यासाठी पूर्व प्राथमिक शाळा-वर्ग सुरु करण्याचाही मनोदय आहे. त्यासाठी शासनाच्या धोरणानुसार अनुदान मिळावे, अशी विश्वस्त मंडळाची अपेक्षा आहे.
(संपर्क- निलेश चंद्रकांत पाटील 8208001565)
संस्कार, संस्कृतीचे जतन आणि संवर्धनावर भर...
 
संस्कार, संस्कृती जतन आणि संवर्धन तसेच एकूणच मुलांच्या बौद्धिक व भावनिक उन्नयनासाठी वर्षभर रा.स्व.संघाचे सर्व 6 उत्सव आणि अन्य प्रमुख सणवार व उपक्रम होतात.
 
रोज सकाळी सुरुवातीला 40 मिनिटात राष्ट्रगीत, प्रार्थना, शारदा वंदना, योगसाधना,ओंकारमय ध्यान घेतले जाते. राष्ट्रीय उत्सवदिनी समूहनृत्य व गीतगायन, नाटिका तसेच थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथी आदी उपक्रम होतात.
 
वर्षभरात मुलांची एक छानशी सहल होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होतो, त्यात विद्यार्थी पालकांच्या मदतीने मातीची मूर्ती बनवून आणतात. दिवाळीला सेवावस्त्यांवर फराळ आणि कपडा बँकेद्वारे कपड्यांचे वाटप होते.
 
‘शैक्षणिक परिवार’ या संकल्पनेनुसार विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून सर्व उपक्रम होतात. माता-पालक सभाही होतात. विद्याभारतीचे प्रतिनिधी, पदाधिकारीही या परिवाराशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी, भावना समजून घेतात.
रुजावा पर्यावरणाचा विचार...
 
मुलांना कळत्या वयापासून कलात्मक दृष्टी आणि आनंद लाभावा, यासाठी हस्तकौशल्यावर भर देणारे उपक्रम आहेतच पण काळाची गरज म्हणून पर्यावरणाचा विचारही रुजावा, यासाठी दरवर्षी ‘एक विद्यार्थी, एक झाड‘ या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने हव्या त्या ठिकाणी वृक्ष लावावा, तो जगवावा, त्याचा फोटो व्हाट्स्अपवर पाठवावा,
पुढे त्याची पाहणीही केली जाते.
@@AUTHORINFO_V1@@