‘बेलगंगा’ सुरु झाल्याने तालुक्याचा दहा वर्षांचा वनवास संपला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |

गव्हाण पूजन व ऊस गाळपाच्या शुभारंभप्रसंगी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांचे प्रतिपादन


 
 
चाळीसगाव : 
 
तालुक्याचे वैभव असलेला बेलगंगा साखर कारखाना पुन्हा सुरू होत असून सबंध तालुक्याचा गेल्या दहा वर्षांपासूनचा वनवास आज संपला असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी केले. ते शुक्रवारी अंबाजी संचालित बेलगंगा साखर कारखान्याच्या गव्हाण पूजन व ऊस गाळपाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.
 
 
यावेळी परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, बेलदारवाडी येथील हभप ज्ञानेश्वर माऊली, स्वामी केशवानंद सरस्वती, माजी गृहनिर्माणमंत्री सुरेशदादा जैन, गृह व नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ. सतीश पाटील, आ.किशोर पाटील, आ. शिरीष चौधरी, बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेशाम चांडक, वेरूळ येथील स्वामी जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्वस्त अ‍ॅड. कृष्णा ठोंबरे, माजी आ. आर. ओ. पाटील, साहेबराव घोडे, राजीव देशमुख, माजी जि.प.सभापती राजेंद्र राठोड या मान्यवरांच्या हस्ते गाळपाचा शुभारंभ करण्यात आला.
 
 
खडसे यावेळी म्हणाले की, तालुक्याचा भाग्यविधाता असलेला बेलगंगा साखर कारखाना गेल्या दहा वर्षांपासून बंद पडला होता. मात्र, तो चित्रसेन पाटील यांनी भूमीपुत्रांच्या मदतीने मोठ्या हिंमतीने सुरू करून दाखविला आहे.
 
 
हा कारखाना सुरू न होण्यासाठी अनेकांनी पुण्य खर्च केले. कारखान्याच्या नावावर राजकीय पोळ्या भाजल्या. काहींनी पदयात्रा काढली. मात्र, शेतकर्‍यांचा भाग्यविधाता असलेला बेलगंगा साखर कारखाना सुरू करण्याचे भाग्य चित्रसेन पाटील यांना मिळाले.
 
 
कारखान्याला यापुढे कुठलीही आर्थिक मदत लागली तर जिल्हा बँकेकडे मागणी करा, ताबडतोब पैसे देतो. पैसे थकित ठेवू नका असा विश्वासही त्यांनी चित्रसेन पाटील यांना दिला.
 
त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे संचालक म्हणून राजेंद्र राठोड यांना घेण्यात येईल अशी घोषणाही नाथाभाऊंनी केली. तालुक्यातील खडसे समर्थकांनी तसेच परिसरातील नागरिक, शेतकर्‍यांची मोठी गर्दी झाली होती. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना चेअरमन चित्रसेन पाटील यांचे कौतुक केले.
शेतकर्‍यांना 2 हजार रूपये भाव : चेअरमन चित्रसेन पाटील
 
आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. तालु्क्यातील ज्या नेत्यांनी हा प्रकल्प उभारला त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून हा वारसा पुढे न्यायचा आहे.
 
कारखाना विक्री प्रक्रियेत भाग घेण्यापासून ते कारखाना सुरु करण्यापर्यंत लागलेला पैसा आणि मिळालेेले सहकार्य यांचा आढावा चेअरमन चित्रसेन पाटील यांनी आपल्या मनोगतातून घेतला.
 
पुढच्या तीन वर्षात 5 लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. भविष्यात शेतीपूरक उद्योग तसेच दुधावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरु केला जाईल.
 
उस उत्पादक शेतकर्‍यांना कमीतकमी 2 हजार रूपये व कन्नडपेक्षा दोनशे रूपये जास्त भाव दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. सूत्रसंचालन प्रा. एम. एम. पाटील यांनी तर आभार भाजप नेते यु. डी. माळी यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@