विश्वास ठेव...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Dec-2018
Total Views |



टेलिव्हिजन, इंटरनेट, सोशल मीडिया आणि अशा सहज उपलब्ध माध्यमांतून अनेक आकर्षणे उमलत्या वयाच्या मुलांसमोर येत आहेत. नुकत्या जन्मलेल्या मुलालाही केवळ भावी ग्राहक या दृष्टीने पाहणाऱ्या उपभोक्तावादी समाजात गरजेपेक्षा जास्त पर्याय मुलांसमोर मांडले जात आहेत.


आठवीच्या वर्गाला शिकवणाऱ्या एका शिक्षिकेने पालकसभेत पालकांना प्रश्न विचारला, “तुमचा तुमच्या मुलांवर विश्वास आहे का?” पालक विचारात पडले. काही वेळाने थोडी कुजबुज झाली. मग एका आईने सांगितले की, तिची मुलगी तिच्याबरोबर सगळे काही शेअर करते. अजून काही आयांनी याला दुजोरा दिला. ज्यांना मुलगे आहेत अशा पालकांचे मत याबद्दल वेगळे होते. परंतु, शिक्षिकेने विचारलेल्या प्रश्नाचा रोख वेगळा होता. त्यांनी काही दिवसांपूर्वी मुलांना त्यांच्या आई-बाबांशी पत्राद्वारे संवाद साधण्याचा सराव करायला दिला होता. मित्रमंडळींबरोबर एका सहलीला जाण्याची परवानगी मागणारे पत्र मुलांना लिहायला सांगितले होते. बऱ्याचशा मुलांनी पत्रातील अनेक वाक्यांची सुरुवात, “आई, विश्वास ठेव मी अमुक तमुक करणार नाही,” अशी केली होती. हे शिक्षिकेने सांगितल्यानंतर मात्र पालक अंतर्मुख झाले. आजूबाजूच्या वाढत्या आकर्षणाच्या काळात, आपल्या ‘टीनएजर’ मुलांवर किती आणि कसा विश्वास ठेवावा, हा प्रश्न पालकांना पडतो. आपल्या आईवडिलांचा आपल्यावर विश्वास आहे, ही भावना मुलांसाठी खूप आश्वासक असते. परंतु, पूर्ण आंधळा विश्वास ठेवून सगळे निर्णय अवघड वयातल्या मुलांवर सोपवणे हेदेखील काही वेळा घातक ठरू शकते. पालकत्वाच्या प्रत्येक टप्प्यावर अंगीकारावा लागणारा समतोल इथेही भेटतोच आपल्याला. पौगंडावस्थेतील मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी ‘नाही’ म्हणणे हे त्यांची वाढ खुंटवणारे आहे. त्यांना विविध प्रकारच्या संधी मिळायला हव्यात, काही वेळा अवघड परिस्थितीला तोंड देता यायला हवे, मित्रमंडळींच्या दबावाच्या विरुद्ध उभे राहता यायला हवे, यासाठी त्यांना मोकळीक देणे आवश्यक आहे.

 

थोडेसे खरचटवून घेऊन बाकी हाती-पायी धड घरी आलेल्या मुलाला ‘आज माझा अपघात झाला’ हे खरे सांगण्याची मोकळीक असायला हवी. त्यावर लग्गेच, ‘‘गाडी चालवायचं वय आहे का तुझं?” ‘‘कुणाची गाडी होती?” ‘‘थांब, तुझ्या या मित्राच्या वडिलांनाच फोन करतो” ‘‘काही वाईट-साईट झालं असतं म्हणजे?” ‘‘आता मित्रांबरोबर बाहेर जाणं बंद” ‘‘जिथे कुठे जायचंय तिथे मी सोडायला आणि घ्यायला येईन,” असा प्रश्नांचा आणि कारवाईचा भडिमार एक तर मुलांना, ‘मला काहीच धड जमत नाही. माझं मी काही करताच कामा नये,’ अशी भावना देतो किंवा ‘आता यापुढे कधी यांच्याशी खरं बोलण्यात काही अर्थ नाही. उगीच प्रवचन ऐकायला लागतं,’ असा विचार आणि त्यावर तशीच कृती करायला लावणारा होतो. अशा प्रसंगी सर्वप्रथम जखमांची काळजी घेण्याचा प्रथमोपचार शांतपणे व प्रेमाने करणे आवश्यक आहे. त्यातून पालकांची काळजी जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त होते. त्यानंतर अपघाताचा प्रसंग मुलाने कसा हाताळला हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यातून मुलाची प्रसंगावधान, संवाद, संयम अशी कौशल्ये लक्षात येऊन पालकांना त्याचा अभिमानच वाटू शकतो. मी ‘चूक कशी केली’ यापेक्षा ‘चूक कशी सुधारली’ हे जाणण्यामध्ये माझ्या पालकांना जास्त रस आहे, हे मुलांचा आत्मविश्वास वाढवणारे ठरते. त्यानंतर मग असे प्रसंग किती धोकादायक ठरू शकतात, ते टाळण्यासाठी काय खबरदारी घेणे गरजेचे आहे हे मोजक्या शब्दांत, शांतपणे व स्पष्टपणे मुलांना सांगण्यातून खूप चांगला व दीर्घकालीन प्रभाव निर्माण होऊ शकतो.

 

टेलिव्हिजन, इंटरनेट, सोशल मीडिया आणि अशा सहज उपलब्ध माध्यमांतून अनेक आकर्षणे उमलत्या वयाच्या मुलांसमोर येत आहेत. नुकत्या जन्मलेल्या मुलालाही केवळ भावी ग्राहक या दृष्टीने पाहणाऱ्या उपभोक्तावादी समाजात गरजेपेक्षा जास्त पर्याय मुलांसमोर मांडले जात आहेत. ‘चलता है’ नावाच्या बिनबुडाच्या दृष्टिकोनातून आजूबाजूच्या व्यक्तींकडे, वस्तूंकडे बघण्याची संवेदनशीलता कमी होताना दिसत आहे. अशा या जगात आपल्या मुलांना विश्वासपात्र व्यक्ती म्हणून घडवायचे असेल, तर आधी पालकांनी त्यांच्यावर विश्वास टाकणे महत्त्वाचे नाही का? या वयातील मुलांसमोर ‘आमच्या वेळी...’ नावाच्या सुवर्णकाळाची (?) उदाहरणे देत राहून पालक मुलांमधील दुरावा वाढवण्यापेक्षा, मुलांच्या भोवतालच्या परिस्थितीला ते कसा प्रतिसाद देतात हे जोखत राहिले, तर पालक-मुलांचे नाते जास्त विश्वासार्ह व समावेशक होईल.

 

- गुंजन कुलकर्णी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@