धर्मांधांचा धार्मिक खेळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |
 

पाकिस्तान भारतासोबत जे धार्मिक कार्ड खेळतोय, त्याची जबर किंमत पाकला मोजावी लागेल. कर्तारपूर असो किंवा इमरान खानची मुस्लीमविरोधी असल्याची टीका, वळणाचे पाणी वळणालाच अशी यांची गत आहे.

 

जेरूसलेमच्या ओल्ड सिटीला गेले की, पिवळ्या दगडांनी वसविलेले शहर दिसते. नीट डोळे उघडून पाहिले की, लक्षात येते ते म्हणजे जगाच्या नकाशाचा आकार बनविणारे आणि बिघडविणारे तीन धर्म एका लहानशा भूमीच्या तुकड्यासाठी कसे रेटारेटी करीत असतात. धर्माचे महत्त्व हे असे आहे. मार्क्सने तो नाकारला असला तरी कुठल्याही नागरी संस्कृतीला त्याचे अस्तित्व पूर्णपणे नाकारता आलेले नाही. अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे धर्मच अस्तित्वाचे कारण होऊन बसतो. कारण, धर्माचा संबंध धारणेशी आहे. अर्थात, केवळ धर्म हा कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीचे एकमात्र निमित्त किंवा घटक होऊ शकत नाही. त्यासाठी तितकेच अन्य समृद्ध असे प्रवाहदेखील रसरशीतपणे राष्ट्रजीवनात वाहत राहणे गरजेचे आहे. हे न होता एखादे राष्ट्र केवळ धर्माच्या आधारावर निर्माण झाले तर काय होते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तान.

 

मूळ निर्मिती प्रक्रियेतच खोट असली की त्याच्या आधारावर उभा राहिलेला देश कसा पोकळ आणि बनावटी होतो, हे आपल्याला आजच्या पाकिस्तानकडे पाहिल्यावर दिसू शकेल. जिनांनी पाकिस्तानचा पाया रचला तो एक मुस्लीम राष्ट्र म्हणूनच! फाळणीची शोकांतिका घेऊन भारत स्वतंत्र झाला आणि पाकिस्तान एक इस्लामी राष्ट्र म्हणून आपली मार्गक्रमणा करू लागला. कल्पनातीत अशा उलथापालथी पाकिस्तानने पाहिल्या आहेत. सध्या इमरान खान या देशाचे पंतप्रधान आहेत. जे धार्मिक कार्ड जिनांनी भारतासमोर वापरले, तेच आता उलट्या पद्धतीने भारताविरुद्ध वापरून आपल्या खुर्चीचे डळमळीत पाय भक्कम करू पाहात आहे. पाकिस्तानात बाकी काही असले तरी जो सर्वात जास्त भारतद्वेष दाखवू शकतो, तोच सर्वात लोकप्रिय राजकारणी होऊ शकतो. आपल्याकडे देवेंद्र फडणवीससुद्धा ‘मी पुढची पाच वर्षे हमखास आहे,’ असे आत्मविश्वासाने सांगू शकतात. मात्र, हा इसम एक तर मारला जाऊ शकतो किंवा त्याला पोरकिडे पडलेली धान्याची पोती पडवीत फेकली जातात, तसे कुठेतरी फेकला जाऊ शकतो.

 

भिकेचा कटोरा घेऊन कुठे जावे आणि कुठे नको, अशा स्थितीत असलेल्या या महाशयांनी आता भारतावर टीका करणे सुरू केले आहे आणि तेही धर्माचा आधार घेऊन. आपल्या सत्ताग्रहणाला चार महिने पूर्ण होण्याच्या प्रसंगी इमरान खान यांनी ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. पत्रकाराने खान यांना विचारले, “भारताशी संबंध ताणलेलेच आहेत?” यावर इमरान खान म्हणतात की, “भारतात पाकिस्तान विरोधी सरकार अस्तित्वात आहे आणि भारताची राज्यकर्ती पार्टी असलेली भाजप मुस्लीम विरोधी आहे.” आपल्याकडे काय चालते, याचा अंदाज घेत घेत या महाशयांनी तारे तोडले आहेत. पाकिस्तानात काहीही सुरू झाले की, आपल्याकडचे काही बेडूक पत्रकार खुश होतात. पाऊस येणार असल्यास बेडूक खुश होतात तसेच. भाजपविषयी ही मंडळी जी भाषा बोलत असतात तेच आता इमरान खान बोलू लागले आहेत.

 

देशातल्या काही राज्यांत सध्या निवडणुकींचा माहौल आहे. अशा स्थितीमध्ये पक्षीय मतभेद प्रकर्षाने समोर येत आहेत. मात्र, पाकिस्तानशी संबंध सुधारण्यावरून आपल्या देशातील सर्वच पक्षांचे एकमेकांविषयी कधीच दुमत नव्हते. ज्यांना आज ‘पाकविरोधी’ म्हटले जात आहे, त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनीदेखील पुरेसा पुढाकार घेतला होता. मात्र, या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचे काम पाकिस्तानातील दहशतवादी गट, पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि तिथल्या भारतद्वेष्ट्या राजकारण्यांनी केले. ज्या देशाला मुस्लीमविरोधी ठरविण्याचा अश्लाघ्य प्रयत्न पाकिस्तानातून केला जात आहे, त्या देशात भारतापेक्षा जास्त मुसलमान दरवर्षी निरनिराळ्या कारणांमुळे मारले जातात. राजकीय नेत्यांच्या हत्यांची तर चर्चा न केलेली बरीएकाच प्रकारचे प्रारब्ध घेऊन हे दोन्ही देश वाटचाल करू लागले. मात्र, भारताने आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर इथवर वाटचाल केली आणि पाकिस्तानातील बजबजपुरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ‘आम्ही कुणाचीही बंदूक खांद्यावर घेणार नाही,’ असा जो काही आव आज इमरान खान आणत आहेत, तो मुळात आता कुणाच्या तरी आधारावरच आहे. ‘अमेरिकेला ठणकावले,’ वगैरे असा जो काही बनाव आहे, तो चीनच्या जिवावरच सुरू आहे. महामार्ग निर्मितीचे चीनचे जे काही स्वप्न आहे, त्यात त्याला पाकिस्तान सोबत हवाच आहे. ट्रम्प सत्तेत आल्यापासून त्यांनी जागतिक मूल्यांची पोपटपंची न करता सरळ अमेरिकेचे हित जोपासायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानला दिल्या जाणार्‍या मदतीबाबतचे काटेकोर धोरण आखण्याबाबत ते आणि त्यांचे प्रशासन स्पष्ट आहे. अशा वळणावर पाकिस्तान येऊन ठेपलेला असताना आपल्या जुन्या वळणावर जाणे निश्चितच आहे.

 

पाकिस्तानची निर्मितीच धार्मिक विद्वेषाच्या गुणसूत्रांवर झाली आहे. कर्तारपूरचा मुद्दासुद्धा पाकिस्तानच्या नियतीचीच साक्ष देतो. शीख बांधवांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि श्रद्धेच्या या मुद्द्यावरून पाकिस्तानने असेच राजकारण चालविले आहे. याआधीही तिथे जे घडले ते पाहाता पाकिस्तान याचा पुरेपूर राजकीय वापर करणार, हे सिद्धच होत होते. या सगळ्या प्रकरणाला एक किनार लागली ती म्हणजे नवज्योतसिंग सिद्धू प्रकरणाची. सत्ताधारी भाजपला खिजवण्यासाठी इमरान खानने या विदूषकाला आपल्या शपथविधीला बोलावले. तिथे जाऊन तिथल्या लष्करप्रमुखाला मिठ्या मारण्याचे माकडचाळे सिद्धूने केले. पुन्हा तेच उद्योग त्याने कर्तारपूर सोहळ्यात केले. विवेकाचे वांदे असलेल्या सिद्धूने जे केले, त्यामुळे मोदींना आपण खिजविले असे या मंडळींना वाटते. वस्तुत: घोर अंधःकाराकडून घनघोर अंधःकाराकडे पाकिस्तानची वाटचाल सुरू आहे. ज्या धार्मिकतेचे परिणाम पाकिस्तान भोगतो आहे, त्याला त्यापासून दूर नेण्यापेक्षा पुन्हा त्याच खाईत लोटणारा पंतप्रधान आता या देशाला मिळाला आहे. त्यामुळे याचे परिणाम काय असणार, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@