अर्थव्यवहार : फिचने घटविला भारताच्या जीडीपी वाढीचा दर !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

 
 
फिच या आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीने सद्य आर्थिक वर्षातील भारताच्या देशांतर्गत सकल उत्पन्नात(जीडीपी)वाढीचा अंदाज घटवून 7.2 टक्के इतका जाहीर केला आहे.
 
याचे कारण म्हणजे वाढलेला वित्तीय खर्च आणि घटता कर्जपुरवठा हे होय. आपल्या जागतिक आर्थिक दृष्टिक्षेपात फिचने म्हटल्यानुसार 2019-20 व 2020-21 या आर्थिक वर्षांमध्ये भारताची जीडीपी वाढ अनुक्रमे 7 व 7.1 टक्के इतकीच राहण्याची शक्यता आहे.
 
एप्रिल ते जून या तिमाहीतील 8.2 टक्क्यांच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत अवघी 7.1 टक्केच जीडीपी वाढ अपेक्षित असल्याचेही फिचचे मत आहे. मात्र देशांतर्गत गुंतवणुक वाढीच्या संदर्भात समाधानही व्यक्त केले आहे.
 
 
आयातीत होत असलेली वाढही जीडीपीच्या वाढीत अडथळा ठरत आहे. त्यामुळे रुपयाचे अवमूल्यन होत असून 2019 या वर्षाच्या अखेेरीस रुपया पुन्हा प्रति डॉलर 75 रुपयांपर्यंत घसरण्याचीही शक्यता फिचने व्यक्त केली आहे.
 
 
फिचच्या म्हणण्यानुसार देशातील बँकिंग क्षेत्राला अजूनही अनार्जित मालमत्तां(एनपीए)च्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तर बिगर बँकिंग वित्तीय संस्थां(एनबीएफसी)पुढे रोखतेची समस्या उभी ठाकलेली आहे.
 
याचे कारण म्हणजे आयएल अ‍ॅण्ड एफएसमधील पेंचप्रसंग होय. भारतीय रिझर्व बँकेनेही यात हस्तक्षेपास नकार दिल्याने या एनबीएफसींची कोंडी झालेली आहे.
 
 
फिचच्या अंदाजानुसार आगामी काळात चलनफुगवटा काही प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. तसेच चालू खात्यातील वाढत्या तुटीमुळे रुपयावरील दबाव वाढून तो पुन्हा घटण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
 
तामिळनाडूतील तुतीकोरिन येथील स्टरलाईट कॉपर(तांबे)चा कारखाना बंद पडल्याने औद्योगिक क्षेत्रात अत्यंत गरजेच्या असलेल्या सल्फ्युरिक अ‍ॅसिड व फॉस्फॉरिक अ‍ॅसिडच्या किंमती कडाडल्या आहेत.
 
त्यामुळे रासायनिक व खत उद्योगाला फटका बसलेला आहे. वेदांता कंपनीच्या या कारखान्यापुढे प्रचंड निदर्शने व हिंसाचारही झाल्याने राज्य सरकारने तो बंद करण्याचे आदेश मे मध्येच जारी केले आहेत.
 
 
सल्फ्युरिक अ‍ॅसिडची प्रति टन किंमत 3000 रुपयांवरुन तब्बल 12 हजार रुपयांपर्यंत म्हणजे चौपटीने वाढलेली आहे. तर फॉस्फॉरिक अ‍ॅसिडचा दर सहा महिन्यांपूर्वीच्या 43 हजार रुपये टनांवरुन 53 हजार रुपये टनांपर्यंत म्हणजेच 23 टक्क्यांनी वाढलेला आहे.
 
 
या कारखान्यामुळे देशाची सल्फ्युरिक अ‍ॅसिडची 80 ते 90 टक्के तर फॉस्फॉरिक अ‍ॅसिडची 15 टक्के गरज भागविली जात होती. तो बंद पडल्यामुळे ही आम्ले खूपच महागली आहेत.
 
 
प्रति वर्षी 4 लाख टन क्षमतेच्या या कारखान्यात कॉपर(तांब्या)चे उत्पादन केले जात होते. त्याद्वारे देशाची 30 टक्के कॉपरची मागणी पूर्ण केली जात होती. तर या दोन्ही आम्लांची सहनिर्मिती (बाय प्रॉडक्शन) करण्यात येत होती.
 
 
त्याद्वारे सल्फ्युरिक अ‍ॅसिडचे 12 लाख टन तर फॉस्फॉरिक अ‍ॅसिडचे 2 लाख 30 हजार टन उत्पादन केले जात होते. फॉस्फॉरिक अ‍ॅसिड हे औषधांसह अनेक रसायने निर्मितीसाठी उपयुक्त असते.
 
 
ट्रम्प प्रशासनाने एच-1 बी
 
 
कायद्यात मोठे बदल केले आहेत. हा कायदा अधिक कठोर करण्यात आला आहे. यामागचे कारण असे की, अमेरिकेचा व्हिसा फक्त त्याच लोकांना मिळाला पाहिजे जे कुशल आणि सगळ्यात जास्त वेतनविदेशी कर्मचार्‍यांना देत असतील. भारतीयआयटी कंपन्या आणि व्यावसायिकांमध्ये हा व्हिसा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झालेली आहे.
 
 
अमेरिकेच्या प्रशासनाने एका वर्षाची एच-1 बी व्हिसा मिळवण्याची कमाल मर्यादा ठरविली आहे. त्यानुसार एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 65,000 एच-1बी व्हिसा देण्यात येणार आहेत.
 
 
तसेच अमेरिकेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणार्‍या किंवा उच्च शिक्षण घेणार्‍या विदेशी विद्यार्थ्यांना दरवर्षी 20,000 एच-1 बी व्हिसा दिला जाणार आहे.हे 20 हजार व्हिसा अतिरिक्तआहेत. त्यांचा 65 हजार व्हिसांमध्ये समावेश नाही.
 
 
नवीन नियमां नुसार अमेरिकेतील उच्च शिक्षण घेण्यासाठीच्या 65 हजार व्हिसांमध्ये सुट द्यायची की नाही, हे ठरविण्याचा अधिकार नागरिकत्व आणि निर्वासितांना सेवा देणार्‍या विभागाला देण्यात आला आहे. नवीन नियमांबद्दल एक नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानुसार एच-1 बी व्हिसावरविदेशी कर्मचार्‍यांची नियुक्ती करणार्‍या कंपन्यांना संबंधित विभागाकडे ई-नोंदणी करावी लागेल.
पुढील नाणेधोरण फेरआढाव्यात रिझर्व बँक घटविणार व्याजदर ?
 
भारतीय रिझर्व बँक येत्या फेबु्रवारी किंवा एप्रिलमधील नाणेधोरण फेरआढाव्यात व्याजदर 0.25 टक्क्यांनी घटविण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. गेल्या ऑक्टोबरात आणि आता डिसेंबरातही बँकेने व्याजदर ‘जैसे थे’च ठेवले आहेत.
 
 
दरम्यान रिझर्व बँकेच्या व्याजदरात बदल न करण्याच्या धोरणामुळे काल झालेल्या शेअरबाजाराच्या घसरगुंडींची तीव्रता आज गुरुवारी 6 रोजी अधिकच तीव्र राहिली.
 
 
त्याच्या निर्देशांकात मोठी घट झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेंसेक्स) व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) हे आज सकाळी अनुक्रमे35 हजार 694 बिंदू व 10 हजार 718 बिंदूंवर उघडून दिवसभरातील व्यवहारात 35 हजार 707 बिंदू व 10 हजार 722 बिंदूंच्या उच्च आणि 35 हजार 266 बिंदू व 10 हजार 588 बिंदूच्या निम्न पातळीवर जाऊन आल्यानंतर अनुक्रमे तब्बल 572 बिंदू व 181 बिंदूंनी घटून 35 हजार 312 बिंदू व 10 हजार 601 बिंदूंवर बंद झाले. बँक निफ्टीही 321 बिंदूंनी घसरुन 26 हजार 198 बिंदूंवर बंद झाला.
@@AUTHORINFO_V1@@